बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Updated : बुधवार, 12 एप्रिल 2023 (15:01 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या

babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या होत्या वाचूयात पूर्ण माहिती  ?
 
कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते.
 
 प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 
 
डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. 
 
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वत्ता लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आणि १९२३च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यांचा शैक्षणिक वर्षांचा प्रवास हा २७ वर्षांचा आहे. या २७ वर्षांमध्ये प्रचंड हाल-अपेष्ट आणि कष्ट सहन करून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करणारे अद्वितीय असे ज्ञानोपासक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी बी.ए., एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी., डी.एस्सी. आणि बार अ‍ॅक्ट लॉ अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प स्कूल येथे १८९६ला सुरू झाले. पुढे सातारा हायस्कूल येथे १९००मध्ये त्यांनी पाचवीत प्रवेश घेतला. कुमारवयामध्ये हॉकी, क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यामध्ये त्यांना विशेष रूची होती. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावीपर्यंतचा (जुनी मॅट्रीक) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना या शाळेत संस्कृत भाषा घेता आली नाही म्हणून त्यांनी पार्शियन भाषा निवडली. 
Ambedkar
१९०७मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती बी.ए. होण्यासाठी प्राप्त झाली. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रीव्हीयसच्या वर्गात प्रवेश घेतला. १९१३मध्ये ते बी.ए. उत्तीर्ण झाले. पुढे वडिलांच्या दु:खद निधनानंतर अमेरिकेत जाऊन बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीद्वारे उच्चशिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९१३ला अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षणासाठी अर्थशास्त्र शाखेत प्रवेश मिळविला. तेथे त्यांनी अर्थशास्त्राच्या जोडीला दुय्यम विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. या विषयांचा अभ्यास त्यांनी तेथे केला. १९१३ ते १९१६पर्यंत तीन वर्षांत त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्यांचा अभ्यास केला. एम.ए.च्या पदवीसाठी त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार (Ancient Indian Commerce) या विषयावर लघुप्रबंध लिहिला या प्रबंधाआधारे १९१५मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना एम.ए.ही पदवी दिली. ही पदवी मिळताच त्यांनी 'भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक व विश्लेषणात्मक अध्ययन' (The National Dividend of India : A Historical and Analytical Study) या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळविली. सोबतच त्यांनी १९१६ला एम.एस्सी. ही उच्च पदवी आणि डी.एस्सी. अतिउच्च पदवी मिळविण्याच्या हेतूने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. लंडन विद्यापीठातून एम.एस्सी., डी.एस्सी. पदव्यांचा अभ्यास करीत असतानाच बॅरिस्टर या कायद्याच्या क्षेत्रातील अतिउच्च पदवीचाही अभ्यास करण्यासाठी त्यांनी १९१६ला ग्रेज इन या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. १९१७मध्ये त्यांना कोलंबिया विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली. परंतु, पीएच.डी.चा प्रबंध छापून काही प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्यानंतरच ही पदवी बहाल केल्या जाईल, अशी अट टाकण्यात आली. 'ब्रिटीश भारतातील परकीय प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' या नावाने बाबासाहेबांचा पीएच.डी.चा प्रबंध पी. एस. किंग अ‍ॅण्ड कंपनी लंडन यांनी १९२५मध्ये प्रकाशित केला. त्या छापील प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. पुढे ८ जून १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर जाहीर झाली. 
 
डी.एस्सी. साठी त्यांनी 'रुपयाचा प्रश्न' (The Problem of Rupee) नावाचा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला. १९२३मध्ये त्यांना डी.एस्सी. पदवी मिळाली. डी.एस्सी.नंतर त्यांनी 'बार अ‍ॅक्ट लॉ'ची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन 'बॅरिस्टर' ही पदवी मिळविली. डॉ. बाबासाहेबांनी बी.ए. ही एकच पदवी भारताच्या मुंबई विद्यापीठातून मिळविली. एम.ए., पीएच.डी. या त्यांच्या पदव्या अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाच्या आहेत. एम.एस्सी., डी.एस्सी. या त्यांच्या पदव्या ब्रिटनमधील लंडन विद्यापीठाच्या आहेत आणि 'बार अ‍ॅक्ट लॉ' ही त्यांची कायद्याची सर्वोच्च पदवी ग्रेज इन या कायदाविषयक शिक्षण संस्थेची आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित अशा त्यांच्या उच्च-अतिउच्च पदव्या ह्या विदेशातीलच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयांमध्ये प्रबंध लिहिले ते विविध विषयांचे पुढे महान ग्रंथ म्हणून पुढे आलेत. 
 
डॉ. बाबासाहेबांची ज्ञानग्रहण करण्याची भाषा ही प्रामुख्याने इंग्रजी होती. त्यांना फ्रेंच, जर्मनी, पार्शियन, पाली, हिंदी, गुजराती आणि मराठी इत्यादी भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या. बाबासाहेबांची ज्ञानलालसा आणि त्यांचे समाजोद्धाराचे प्रचंड कार्य बघून ५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठाने एलएल.डी. (डॉक्टर ऑफ लॉज्) ही सन्माननीय पदवी आपल्या जागतिक कीर्तीच्या माजी विद्यार्थ्याला सन्मानाने बहाल केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी हैदराबाद येथे त्यांना समारंभपूर्वक डी.लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय पदवी प्रदान केली. भारत सरकारने या विश्व मानवाला त्याच्या जागतिक तोडीच्या कार्यकतृर्त्वाचा सन्मान म्हणून १९९०मध्ये मरणोपरांत 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानीत केले. 
 
डॉ. बाबासाहेबांची प्रचंड ज्ञानलालसा, त्यांचा वाचन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्वामधील विविधांगी व्यासंग बघितल्यावर त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडू शकत नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव ज्ञानव्रती आहेत. त्यांचे सर्व संशोधनात्मक लेखन जागतिक पातळीवर गौरविल्या गेले आहे. त्यांच्या ज्ञानलालसेचा वारसा संपूर्ण विश्वाने घेतला पाहिजे. आज आपल्या देशात 'गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे', अशी जी ओरड होत आहे, त्याला पर्याय देण्यासाठी बाबासाहेबांसारखी ज्ञानलालसा वृद्धिंगत करणे हाच त्यावरचा एकमेव मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे अठरा-अठरा, विस-विस तास स्वत:ला अभ्यासामध्ये गुंतवून घेत असत. प्रचंड वाचन, प्रत्येक क्षण अन् क्षण हा ज्ञान ग्रहणासाठीच असला पाहिजे, असा कटाक्ष त्यांनी पाळला. आयुष्यभर निर्व्यसनी राहून जीवनाच्या शेवटपर्यंत बाबासाहेब ज्ञानाचे उपासक राहिले. आजन्म विद्यार्थी असणारा हा ज्ञानयोगी, हजारो पदव्या आणि उपाधींच्या पुढे होता. कारण तो ज्ञानोपासक होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor