गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 1 जानेवारी 2020 (13:29 IST)

2020 New Year: नवीन वर्षातल्या अशा घडामोडी ज्यावर असेल सर्वांची नजर

2020 चा पहिला दिवस उजाडला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी काही वर्षांपूर्वी 'व्हिजन 2020' ची संकल्पना मांडली होती. ते वर्ष आता उजाडलं आहे. कलाम आता आपल्यात नाहीत. पण त्यांच्या स्वप्नातला भारत आपण निर्माण केलाय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
2019 हे वर्ष प्रचंड घडामोडींचं होतं. आता नवीन दशकांत प्रवेश करताना अनेक गोष्टी समोर येतील, अनेक गोष्टी नव्याने घडतील, काही गोष्टी मागच्या पानांवरूनच पुढे जातील. या वर्षात होणाऱ्या काही महत्त्वांच्या घटनांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्र
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सध्या भारतातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मागच्या वर्षी आलेल्या या कायद्याने देशभरात विरोधाची लाट आली. ठिकठिकाणी निदर्शनं झाली. या कायद्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि बिहार या राज्यातील निवडणुका यावर्षी होणार आहेत.
 
गेल्यावर्षी झारखंड, महाराष्ट्र अशी महत्त्वाची राज्यं गमावल्यानंतर आता या दोन राज्यांमध्ये विजय मिळवणं हे भाजपसमोर एक मोठं आव्हान असेल. अयोध्येत राम मंदिर उभारणं आणि कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरमधलं आयुष्य सुरळीत करणं हे केंद्र सरकारसमोरचं आणखी एक मोठं आव्हान असेल.
 
गेल्या वर्षी मंद अर्थव्यवस्थेमुळे देशभरात नाराजीचे सूर उमटले. अनेक उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी याबाबत सरकारला इशारे दिले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला.
 
त्याचे परिणाम काय होतील हे पुढच्या 365 दिवसांत पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या वर्षी अनेक बँकांचं विलीनीकरण सरकारनं जाहीर केलं होतं. त्यामुळे अनेक बँकांची ओळख पुसली जाईल. पुढच्या महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या उपाययोजनांचं प्रतिबिंब पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागचं वर्ष महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व होतं दीर्घकाळ चाललेला सत्तासंघर्ष, त्यात झालेल्या नाट्यमय घडामोडी, महाविकास आघाडीचं सरकार अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या जनतेने पाहिल्या. अगदी तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
 
अद्याप खातेवाटप जाहीर झालं नसलं तरी तीन पक्षांतील 42 मंत्री महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे कोणते निर्णय घेतील यावर सगळ्यांची नजर आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी त्याची अंमलबजावणी कशी होतं हे पहावं लागेल. त्याबरोबर आरे मेट्रो कारशेड, समृद्धी महामार्ग यासारखे गेल्या अनेक वर्षांतले प्रलंबित विषय मार्गी लावणं हे महाविकास आघाडीसमोरचं आव्हान आहे.
ब्रेक्झिट होणार का?
आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे वर्षं निवडणुकांनी भरलं आहे. त्यातही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. प्रतिनिधीगृहाने ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव संमत केला आहे. आता दुसऱ्या सभागृहात काय होईल यावरही जगाचं लक्ष आहे.
 
इंग्लंडमधील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. बोरीस जॉन्सन पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. ब्रेक्झिटचं आता पुढे काय होतंय यावरही जगाची नजर आहे. 2020 च्या फेब्रुवारी पर्यंत ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे.
 
या राजकीय घडामोडींशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वाच्या परिषदा पार पडतील. 27 एप्रिल ते 22 मे दरम्यान न्यूयॉर्कमध्ये NPT review conference पार पडेल. आण्विक नि:शस्त्रीकरणच्या दृष्टीने हा करार आणि पर्यायाने ही परिषद महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षात भारत-पाकिस्तान, अमेरिका-इराण आणि अमेरिका- उत्तर कोरिया या देशात सुरू असलेल्या तणावामुळे ही परिषद महत्त्वाची आहे. तसंच BRICS ची परिषद सेंट पीट्सबर्गला होणार आहे. नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये G20 परिषद आहे.
बायोपिकचं पीक
खेळाबरोबर करमणुकीच्या क्षेत्रातही यावर्षी अनेक महत्त्वाच्या घटना घडण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' नावाचा चित्रपट येणार आहे. या निमित्ताने दीपिका चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. अॅसिड हल्ल्यातून सावरुन जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या लक्ष्मी अगरवालची भूमिका दीपिका करत आहे.
 
वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा यांच्या विवाहाची चर्चा आहे. त्याचप्रमाणे रणवीर कपूर आणि आलिया भट यांच्याही लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. यावर्षी अनेक तारे तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी, अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया बेदी यांचा समावेश आहे.
 
यावर्षी अनेक चित्रपटांचा सिक्वेलही येणार आहे. बागी 3, भूलभुलैय्या 2, सडक 2, हंगामा 2, दोस्ताना 2 तसंच कुली नं 2 या सिक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
 
यावर्षीही बायोपिकचं पिक येणार आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे, तसंच उधमसिंह यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात विकी कौशलची भूमिका आहे.
 
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटात कंगना राणावतची मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर कोंढाण्याच्या ऐतिहासिक लढाईवर तान्हाजी हा चित्रपट याच महिन्यात येणार आहे.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानातली भरारी
विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात मागच्या वर्षी चांद्रयान मोहिमेचं अपयश सगळ्यात जास्त चर्चिलं गेलं. यावर्षी पुन्हा चांद्रयान 3 मोहीम आखल्याची चर्चा आहे. 17 जुलैला मंगळावरचं आयुष्याचा वेध घेण्यासाठी मंगळ 2020 हे मिशन अस्तित्वात येणार आहे.
 
यावर्षी जगातल्या सगळ्यांत मोठ्या इमारतीचं बांधकाम यावर्षी पूर्ण होईल. सध्या बूर्ज खलिफा ही दुबईमधील सगळ्यात मोठी इमारत आहे. मात्र हा विक्रम 2020 मध्ये मोडला जाणार आहे. सौदी अरेबियामधील जेद्दाह टॉवरची उंची 3303 फुट आहे. तसंच इस्रोतर्फे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L-1 नावाचं मिशन लाँच करणार असल्याची चर्चा आहे.
 
सध्याचं जग इंटरनेटमय झालं आहे. त्यात 4G नंतर आता 5G तंत्रज्ञानाचे वेध लागले आहेत. भारतात हे तंत्रज्ञान 2022 मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता असलेलं वेगवान जग आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातही आता इलेक्ट्रिक कारचे वारे वाहू लागले आहेत. त्या दिशेने काही पावलं सरकारतर्फे उचलली जात आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न जगभरातले पर्यावरणवादी कार्यकर्ते करताना दिसत आहेत. पण यावर्षी लक्ष वेधून घेतलं ते एका 16 वर्षाच्या मुलीने. ग्रेटा थुनबर्गने पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याची मोहीम उघडली त्यात विद्यार्थी लाखो संख्येने सहभागी झालेले दिसले. ग्रेटाच्या या कार्यासाठी तिला टाइम पर्सन ऑफ द इअर हा बहुमानही मिळाला तसंच ग्रेटाला नोबलसाठी नामांकित करण्यात आलं होतं.
पण ग्रेटा थुनबर्गची सर्व बाजूंनी स्तुती होत होती असं नाही. तिच्याविरोधात अनेक लोक होते. त्यांनी तिच्यावर टीका केली. काही नेत्यांनी अशी टीका केली की ग्रेटाचं आंदोलन हे स्वयंस्फूर्तीतून नाही ती मोठ्या लोकांच्या हातचं खेळणं आहे. तर ग्रेटा देखील म्हणाली होती की, जगभरातल्या नेत्यांनी आम्हाला निराश केलं आहे.
 
ऑलिपिंकमध्ये काय होणार?
2020 वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी महत्वपूर्ण आहे. यंदाच्या वर्षी क्रीडा जगतातली सर्वोच्च स्पर्धा अर्थात ऑलिंपिंक होणार आहे. चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.
 
परंतु फक्त दोन भारतीयांना पदकावर नाव कोरता आलं होतं. चार वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. आतापर्यंत 62 भारतीय खेळाडू ऑलिपिंकसाठी पात्र ठरले आहेत. ही संख्या वाढत जाईल. मनू भाकेर आणि सौरभ चौधरी हे युवा नेमबाज भारतीय पथकाचा केंद्रबिंदू असतील.
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू पदक मिळवून देण्यासाठी आतूर आहेत. युवा वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत प्रियांक गर्गच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ छाप उमटवण्यासाठी आतूर आहे. भारतीय संघाने चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
 
यंदा भारतात नेमबाजी वर्ल्डकप, हॉकी सीरिज फायनल आणि U17 महिला फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय महिला आणि पुरुष संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील.
 
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहे. भारतीय टेनिसचा आधारस्तंभ लिएंडर पेस यंदा निवृत्त होणार आहे. डेव्हिस चषक आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये भारताची धुरा समर्थपणे वाहणाऱ्या पेसच्या निवृत्तीमुळे पोकळी निर्माण होणार आहे.
 
या महत्त्वाच्या क्षेत्राशिवाय माध्यमं, समाजमाध्यमातून येत असलेला माहितीचं भांडार यावर्षीही अव्याहतपणे सुरू राहील. भारतात असलेली बेरोजगारी, हाँगकाँगमधील आंदोलनं, नरेंद्र मोदी सरकारचे धोरणात्मक निर्णय, यामुळेही 2020 हे वर्ष भरगच्च घडामोडीचं असेल यात शंका नाही.