शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:41 IST)

उद्धव ठाकरे सरकारचे चौकशी आणि आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले 7 नेते आणि त्यांचे नातेवाईक

महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. पण, गेल्या वर्षभरात आघाडी सरकारचे 7 नेते आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
 
गेल्या वर्षभरात अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या नोटीसा आल्या आहेत.
 
काही नेत्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशीसुद्धा झाली आहे. त्यात संजय राऊत, प्रताप सरनाईक यांच्या नातेवाईकांच्या चौकशा झाल्या आहेत.
 
तर बुधवारी ( 13 जानेवारी 2021) नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाली. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाचं प्रकरण ताजं असतानाच मलिक यांच्या जावयाला अटक झाली आहे.
नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा
1. अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार सिचंन घोटाळ्याप्रकरणी रडारवर आहेत. पुन्हा सत्तेत आल्यानंतर मे 2020 मध्ये ईडीने अजित पवारांविरोधात मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
राज्याच्या एँटी करप्शन ब्यूरोने मात्र अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिनचीट दिली होती.
राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टलाही ईडीने विरोध दर्शवला आहे.
 
2. धनंजय मुंडे
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप एका महिलेने केलाय.
धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेच्या बहिणीशी सहमतीने संबंध असल्याचं मात्र मुंडे यांनी मान्य केलं. पण, बलात्काराचा आरोप असल्याने मुंडे यांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्य स्थितीत मुंबई पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
 
3 आदित्य ठाकरे
बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजूपत मृत्यूप्रकरणी भाजप नेत्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर आरोप केले. आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळून लावले.
भाजप खासदार नारायण राणेंनी सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली तर ते कोठडीत जातील, असं वक्तव्य केलं होतं. आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप का होत आहेत ?
 
4. प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. कथित टॉप सिक्युरीटी घोटाळ्याप्रकरणी सरनाईक आणि त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी केली आहे.
 
5. एकनाथ खडसे
भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात एकनाथ खडसेंना ईडीने चौकशीसाठी नौटीस बजावली. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी चौकसीसाठी ईडीने त्यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
नेत्यांचे नातेवाईक चौकशीच्या फेऱ्यात
 
6. संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशी केली. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मैत्रीणीकडून घेतलेल्या 50 लाखांच्या कर्जाप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्षा राऊत यांना समन्स बजावला होता. या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
 
7.नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने बुधवारी (13 जानेवीरी) अटक केली आहे. ड्रग्ज ट्रफिकिंग प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने दिली आहे. ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीसोबत समीर खान यांनी आर्थिक व्यवहार केले असा त्यांच्यावर आरोप आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली होती. त्यात चव्हाण यांच्याकडून मागील 10 वर्षातील संपत्तीची माहिती आयकर विभागाने मागवली आहे.