शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (13:14 IST)

एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना ज्यांचं नाव घेतलं, ते 'ठाण्याचे बाळ ठाकरे' कसे झाले होते?

-श्रीकांत बंगाळे
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मरण करून, आई-वडिलांच्या पुण्याईने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन..."
 
अशा शब्दांत शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
काही महिन्यांपूर्वीची ही गोष्ट. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी 'शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते,' असा आरोप केला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. आणि या आनंद दिघेंवरून शिवसेना आणि राणेंमध्ये घमासान सुरू झालं.
 
28 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर एकनाथ शिंदेंनी "धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मरण करून" शपथ घेतली.
 
कोण होते आनंद दिघे?
"आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे त्याहून वेगळं आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमची माफी मागावी," हे वाक्य होतं विजयपत सिंघानिया यांचं. त्यांनी हे उद्गार का काढले असावेत?
 
सिंघानिया हे ठाण्यातील सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटलचे मालक. 2001मध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका शिवसैनिकावर उपचार सुरू होते.
 
उपचारादरम्यान शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या शिवसैनिकाच्या 1500 चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली.
 
हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका, 200 बेड बेचिराख करण्यात आले. याच उद्विग्नतेतून सिंघानिया यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे माफीची मागणी केली होती.
 
कोण होता हा शिवसैनिक?
ज्या शिवसैनिकाच्या निधनानंतर हा उद्रेक झाला, त्यांचं नाव होतं आनंद चिंतामणी दिघे.
 
दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे.
 
"बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि 70च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही," असं ठाणे वैभव या वर्तमानपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात.
 
शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुलटाईम कार्यकर्ता मिळाला होता. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली.
 
"दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं. जिथं कार्यालय होतं, तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे," असं दिघेंना जवळून ओळखणारे ठाण्यातील पत्रकार सोपान बोंगाणे सांगतात.
 
जिल्हाप्रमुख ते 'धर्मवीर'
यादरम्यान दिघे यांनी टेंभी नाका परिसरात 'आनंद आश्रमा'ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात 'जनता दरबार' भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे.
 
"आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत म्हटल्यावर त्यांनी हातही उगारलेला आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला," मुक्त पत्रकार रवींद्र पोखरकर सांगतात.
 
"देवा-धर्माच्या बाबतीत दिघे अतिशय कडक धोरण अवलंबवायचे. त्यांनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू केला. सर्वांत पहिली दहीहंडी सुरू केली. या सगळ्या धार्मिक कार्यातून त्यांची 'धर्मवीर' अशी ख्याती पसरली. शिवाय, ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. स्वयंरोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले. त्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले," रवींद्र पोखरकर पुढे सांगतात.
 
'ठाण्याचे बाळ ठाकरे'
"दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत असं चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, असं धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती," दिघेंच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
 
"आनंदच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न नाही. आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेविषयी शंका नाही, पण आनंद ज्या पद्धतीनं कारभार करत आहे त्याबद्दल प्रश्न आहे," असं त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटलं होतं. तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो, असं दिघे यांनी म्हटलं होतं.
 
"दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते 'ठाण्याचे बाळ ठाकरे' झाले होते, असं फ्रंटलाईन या मासिकात छापून आलं होतं.
 
'तुझा खोपकर करू का?'
आनंद दिघे 1989च्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राज्यभर प्रकाशझोतात आले.
 
या निवडणुकीत महापौरपदासाठी प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं.
 
आनंद दिघे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्यानं परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
 
पण परांजपे यांचा फक्त एका मतानं पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेची काही मतं फुटल्याचं समोर आलं. या पराभवानंतर बाळासाहेब खवळले आणि त्यांनी 'गद्दार कोण?' असं विचारायला सुरुवात केली.
 
बाळासाहेबांनी जाहीरपणे म्हटलं की, "ज्यांनी फंदफितुरी केली आहे, त्यांना आम्ही क्षमा करणार नाही," देसाई सांगतात.
 
काही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी स्वत:च्याच पक्षाशी प्रतारणा करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं आणि त्यामुळे मग शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं, अशी चर्चा सुरू झाली.
 
महिन्याभरानंतर खोपकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. याप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना टाडा कायद्याअंतर्गत (Terrorist And Disruptive Activities Prevention Act, 1987)अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांच्या मृत्यूपर्यंत ही केस सुरू होती.
 
"या प्रकारानंतर ठाण्यात काही वाद झाला तर 'तुझा खोपकर करू का?'असं म्हटलं जायचं," असं हेमंत देसाई सांगतात.
 
टक्क्यांचं राजकारण
ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि आनंद दिघे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी स्वत:च्याच पक्षातील नगरसेवकांविरोधात आरोप केला.
 
"ठाणे महापालिकेत 41 टक्के भ्रष्टाचार चालतो. ठाण्यामध्ये पालिकेचे ठेके देताना टक्केवारी कमिशन नगरसेवक खातात," असा त्यांचा आरोप होता.
 
यावरून मग शासनाचे सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली.
 
"वर्षभराच्या चौकशीनंतर नंदलाल समितीचा अहवाल आला. पण तोवर दिघेंचा मृत्यू झाला होता. दिघेंच्या आरोपात तथ्य आढळून आलं, पण नंतरच्या काळात हे सर्व गुंडाळलं गेलं," पोखरकर सांगतात.
 
'आनंद दिघे आपल्यातून गेले'
24 ऑगस्ट 2001ची पहाट. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला.
 
अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली.
 
संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे 50 वर्षांचे होते.
 
आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की, "आनंद दिघे आपल्यातून गेले."
 
उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिलबाहेरील दिघेंच्या 1500 चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं. यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटक करण्यात आली.
 
दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं. असं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले.
 
दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या (2001) शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.''