मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (18:28 IST)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीतल्या 7 गमतीशीर गोष्टी

- सिद्धनाथ गानू
महाराष्ट्रात अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांच्या आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत. पण या तीन पक्षांच्या आघाडीबद्दल अजूनही अनेक प्रश्न आहेत.
 
या निवडणुकीत भाजपबरोबर असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर टीका करणारी सेना, 1999 साली काँग्रेसमधूनच फुटून निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी आणि आता 'हिंदुत्व' मानणाऱ्या पक्षाशी आघाडी करणारी काँग्रेस यांची ही आघाडी किती एकजीव आहे हा प्रश्न अनेकांना आहे.
 
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर या तिन्ही पक्षांचे आमदार पहिल्यांदाच एकत्र, एका ठिकाणी दिसले मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये. 'आम्ही 162' या कार्यक्रमात भाजपला आपली ताकद दाखवणाऱ्या महाआघाडीच्या गोटातही अनेक गंमतीशीर घटना घडत होत्या. अशाच गंमती घडल्या मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करतानाच्या बैठकीत. तीन पक्षांच्या या आघाडीतल्या याच गंमतीजमतींवर आणि काही 'ऑकवर्ड' प्रसंगांवर आपण नजर टाकू या.
 
1. 'आज आनंदी आनंद झाला...'
बुधवारी सकाळी विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. शपथविधी समारंभासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
 
विधानभवनाच्या प्रांगणात सुप्रिया सुळे खुद्द स्वागतासाठी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी, काँग्रेस तसंच शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचं त्यांनी बाहेरच स्वागत केलं. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
पण यात सगळ्यात लक्षवेधक भेट ठरली ती म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची. मेटल डिटेक्टर पार करून येताच या भावा-बहिणींनी एकमेकांची गळाभेट घेतली. अजित पवारांनी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा सुप्रिया सुळेंनी 'घर आणि पक्ष दुभंगला' अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर हे मनोमीलन लक्षवेधक ठरलं.
 
 
2. 'पहिलीच भेट झाली...'
महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदासाठीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी. ही घोषणा करताना ते म्हणाले, "मी यापूर्वी उद्धवजींना भेटलो नव्हतो. अलिकडेच माझी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच भेट झाली आणि मला त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं."
 
सरकारस्थापना दृष्टीपथात आल्यानंतर महाआघाडीच्या घरोब्याची सुरुवात ही अशी गोड शब्दांनी झाली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात 'ज्यांना 30 वर्षं विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला' असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती केली. हा कौतुक सोहळा पाहून अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या 'पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची' या भावगीताची आठवण झाली.
 
3. जेव्हा भुजबळ म्हणाले की 'मला माझे मित्र भेटले'
उद्धव ठाकरेंच्या नावाची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन छगन भुजबळ यांनी केलं.
 
'आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. मला माझे अनेक मित्र भेटले' असं भुजबळांनी म्हटल्यावर हॉटेल ट्रायडेंटच्या सभागृहात एकच हशा पिकला. शिवसेना ते काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या भुजबळांच्या या एका वाक्यात मोठा इतिहास आणि तितकीच गुंतागुंतीची केमेस्ट्री आहे. या तीन पक्षांच्या गंमतीदार समीकरणाचं हे एक बोलकं उदाहरण आहे.
 
शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या मोठ्या नावांपैकी एक होतं छगन भुजबळ यांचं. भुजबळांनी शिवसेना सोडण्याची घटनाही मोठी नाट्यमय होती.
 
बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ गृहमंत्री होते. 2019 च्या निवडणूक प्रचारात अजित पवारांनी भुजबळांचं नाव न घेता बाळासाहेबांच्या अटकेमागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हट्ट होता असा आरोपही केला होता. पण हा सगळा इतिहास झाला.
 
सोमवारी हयात हॉटेलमध्ये छगन भुजबळ आले तेव्हा उद्धव ठाकरे आधीच शरद पवार यांच्या शेजारी पहिल्या रांगेत बसले होते. एरव्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भुजबळ हे शरद पवारांच्या जवळच्याच खुर्चीत बसलेले आढळतात. सोमवारी पवारांशेजारी होते उद्धव ठाकरे आणि उद्धव यांच्यापासून तीन खुर्च्या सोडून बसले होते भुजबळ. या दोन्ही नेत्यांमध्ये काही संवाद झालेला मात्र कॅमेऱ्यांच्या नजरेला तरी दिसला नाही.
 
4. राजकीय घराण्यांची पुढची पिढी
हयात हॉटेलमध्ये तिन्ही पक्षांचे आमदार 'आम्ही 162' साठी जमणं फोटोग्राफर्ससाठी पर्वणी होती. यातले काही फोटो विशेष लक्षवेधी ठरले. शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे हे एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
 
रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे दोघेही पहिल्यांदाच विधानभवनात प्रवेश करतायत. हॉटेल हयातमध्ये त्यांनी खांद्याला खांदा लावून आणि विजयी मुद्रा दाखवत फोटो काढून घेतला. याशिवाय डी वाय पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील, विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख तसंच सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यावेळी एकत्र दिसून आले.
 
5. 'छोड आये हम...'
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक नेत्यांनी नव्या पक्षांमध्ये घरोबा केला. पण निवडणूक निकालांनंतर समीकरणं बदलली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी जशी जनतेसाठी आश्चर्यकारक होती तशीच ती काही नेत्यांसाठीही ठरली असणार.
 
वरळीत मोठा जम असलेले सचिन अहिर हे निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. सोमवारच्या शक्तीप्रदर्शनाच्यावेळी एकीकडे राष्ट्रवादीची सगळी नेतेमंडळी हजर होती आणि शिवबंधन बांधलेले सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंची सोबत करत होते.
 
अशीच काहीशी कथा काही काळपर्यंत काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या प्रियंका चतुर्वेदींची. निवडणुकीपूर्वी त्या शिवसेनेत आल्या. एकेकाळी काँग्रेस मुख्यालयात मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्रकार परिषदांना चतुर्वेदी हजर असत. सोमवारी हयात हॉटेलमध्ये दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते आणि प्रियंका चतुर्वेदी वावरत होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेससोडून शिवसेनेत गेलेले भास्कर जाधव आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तारही तिथं आजीमाजी सहकाऱ्यांशी चर्चा करत होते.
 
 
6. उद्धव ठाकरेंची 'भगवी बोली'
मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होत असताना आणि त्याआधी सोमवारी हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी जमलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी परवलीची असणारी 'भगव्याची' भाषा केली होती.
 
सोमवारी त्यांनी म्हटलं, 'आमचा शिवशाहीचा जो भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत.' काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये कायमच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा प्रकारची भाषा होत असते.
 
निवडणूक प्रचारादरम्यानही भाजप-शिवसेनेच्या हिंदुत्वावर या आघाडीतल्या पक्षांनी टीका केली होती. पण आता पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, शिवशाही आणि भगव्याशी इमान ही विशेषणं वापरणारे पक्ष एकत्रितपणे वाटचाल करताना दिसतायत.
 
महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं हे भाषण सुरू असताना पहिल्या रांगेत बसले होते ते समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी. याच अबू आझमी यांनी आतापर्यंत कायम शिवसेनेच्या राजकारणाचा विरोध केला आहे. पण ते आता या सरकारचे पाठिराखे आहेत.
 
 
7. महाविकास आघाडीचा 'शपथविधी'
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी जरी 28 नोव्हेंबरला होण्याचं योजलं असलं तरी सोमवारी हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाडांनी 'महाविकास आघाडी'च्या सगळ्या आमदारांना संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शपथ घ्यायला सांगितलं. संविधानाच्या शपथेनंतर आणखी एक शपथ दिली गेली. ती म्हणजे महाविकासआघाडीतल्या तीन प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आघाडीशी प्रामाणिक राहण्याची.
 
आपल्या जाहीर सभांमधून ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर आणि त्यांचा निर्णय मानतात म्हणून काँग्रेस नेत्यांवर टोकाची टीका केली होती त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार, इतकंच नव्हे तर त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सुद्धा सोनिया गांधींच्या नेतृत्वाशी प्रामाणिक असण्याची शपथ घेताना दिसले.
 
सोनिया गांधींच्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहण्याची शपथ शिवसेनेने घेणं ही त्यांची सत्तेसाठीची लाचारी दाखवतं अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी केली. याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं, 'तुम्हाला ज्या मुद्द्यांवर बोलायचंय ते घेऊन कुठल्याही मैदानात या, मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही, मी सगळी उत्तरं देईन'.
 
सोमवारच्या शक्तीप्रदर्शनासाठी तिन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांच्या हॉटेल्समधून बस गाड्यांमध्ये बसवून हयात हॉटेलवर आणलं गेलं होतं. आमदार फोडोफोडीचा धोका लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी आपापल्या आमदारांना कडोकोट बंदोबस्तात ठेवलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सगळ्या आमदारांनी आपापल्या बस गाड्यांमध्ये बसून आपापल्या ठिकाणी जायचंय अशी घोषणा केली.
 
"गर्दीचा फायदा घेऊन मूल्यवान वस्तू पळवणाऱ्यांपासून सावधान!" या सूचनेच्या चालीवर ही महाविकास आघाडीची "गर्दीचा फायदा घेऊन आमदार पळवणाऱ्यांपासून सावधान!" घोषणा होती की काय असंच यातून वाटत होतं.
 
स्थिर सरकार देण्यासाठी अनेक बाबतीत परस्परविरोधी भूमिका असणाऱ्या तीन पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात आघाडी केली आहे. आता त्यांच्यातली ही केमिस्ट्री कशी फुलते आणि अडचणींच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यात तसंच एकमेकांशी फारसं सख्य नसणाऱ्या नेत्यांना सांभाळण्यात या नव्या आघाडीला किती यश येतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.