गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (13:24 IST)

फडणवीस बहुमत सिद्ध करू शकणार नाही: शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना असे घडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात शरद पवार यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. 30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अजूनही एकत्र आहेत. पुढेही एकत्रच राहाणार आहेत. असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
 
आज सकाळी शपथविधीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी आपल्याला शपथविधीची काहीच कल्पना नव्हती असं या पत्रकारपरिषदेत सांगितले. 'रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. सकाळी सातला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. त्यानंतर एका ठिकाणी जायचंय असं सांगण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत कशासाठी जातोय याची कल्पना नव्हती. तिथे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिथे होते. थोड्याच वेळात शपथविधी झाला. आम्ही अस्वस्थ होतो. शपथविधी झाल्यानंतर तात्काळ पवार साहेबांकडे आलो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत', असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.
 
अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं असे म्हणत सकाळच्या शपथविधीसाठी दहा ते अकरा आमदार आम्हाला फोटोत दिसले. तीनजण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. आणखी काही आमदार परत येत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.