रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (15:41 IST)

उद्धव ठाकरे यांच्याशिवाय शिवसेनेकडून कोणकोण आहे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत?

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पुढची पाच वर्षं राहील असं संजय राऊत यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
 
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता स्थापनेची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचा दावा तिन्ही पक्षांकडून केला जात आहे.
 
अशात आता शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
 
अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं.
 
तर मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली, त्यावेळीसुद्धा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचाच मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला.
 
पण उद्धव ठाकरे यांनी जर बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवण्याचा निर्णय घेतला तर मात्र संभाव्य नावं कुठली असतील?
संजय राऊत
संजय राऊत यांच नाव यामध्ये आघाडीवर असल्याचं कळतंय. त्यांच्या नावाला शरद पवार यांची सुद्धा पसंती असल्याचं वृत्त वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या चालवत आहेत.
 
संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास त्यांचा प्रवास आहे.
 
शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच्या माहितीनुसार, संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत.
 
शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.
 
संजय राऊत हे सध्या सगळीकडे शिवसेनेची भूमिका मांडत असले, तरी ते कधीच लोकांमधून निवडून आलेले नेते म्हणून ओळखले जात नाहीत.
 
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "संजय राऊत यांची नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना संघटना बांधणीमध्ये अपयश आलं. तरीही शिवसेनेनं पक्ष संघटनेत त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. राज्यसभेची खासदारकी दिली आहे. अर्थात, यामागे 'मातोश्री'वर त्यांना असणारा अॅक्सेस हे महत्त्वाचं कारण आहे."
 
"दुसरं म्हणजे राऊत माध्यमस्नेही आहेत. अनेकदा सामनामधून किंवा मीडियासमोर उद्धव ठाकरे जे थेट बोलू शकत नाहीत, ते संजय राऊतांच्या माध्यमातून बोललं जातं. सामनामधून पीकविमा, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी यांसारख्या अनेक विषयांवर सरकारविरोधी भूमिका घेण्यात आली होती. याच कारणासाठी संजय राऊत हे पक्ष संघटनेत आपलं स्थान टिकवून आहेत."
 
संजय राऊत यांचा संपूर्ण राजकीय प्रवास तुम्ही इथं वाचू शकता. संजय राऊत : क्राइम रिपोर्टरपासून शिवसेनेचे नेते होण्यापर्यंतचा प्रवास
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे. गेली अनेक वर्षं ते शिवसेनेत कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे सलग दोनवेळा लोकसभेत निवडून गेले आहेत.
 
ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेत निवडून जात आहेत.
 
2014 साली सुरुवातीच्या काळाता शिवसेना विरोधी पक्षात असताना त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली होती.
 
शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री झाले आणि यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं(एमएसआरडी) आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण ही खाती सोपविण्यात आली.
 
2018 साली त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली.
सुभाष देसाई
सुभाष देसाई शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसैनिक आहेत.
 
बॉम्बे आणि बंबईचं नामकरण मुंबई असं व्हावं यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
 
1972 साली त्यांनी प्रबोधन गोरेगाव ही संस्था सुरू केली. त्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरु करण्यात आलं.
 
शिवसेनेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांनी शिवसेना नेते, शिवसेना प्रवक्ता, शिवसेना सरचिटणीस अशी पदं भूषविलेली आहेत.
 
ते सर्वांत प्रथम ते 1990 साली गोरेगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर 2004, 2009 सालीही त्यांचा विजय झाला मात्र 2014 साली त्यांना भाजपच्या विद्या ठाकूर यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला.
 
2009-14 या कालावघीत ते शिवसेनेचे विधिमंडळ नेते होते. 2014 साली त्यांच्याकडे राज्याच्या उद्योग खात्याची जबाबदारी आली. ते मुंबई (शहर) जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.
 
सुभाष देसाई बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेतील एक उच्चपदस्थ नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेच्या वाटाघाटी सुरू असताना त्यामध्ये सुभाष देसाई सहभागी झाले होते.
 
1990 साली रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यावेळेस शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झाला होता. संभाव्य वादंग टाळण्यासाठी तत्कालीन संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सुभाष देसाई यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला होता आणि संमेलन पार पडलं.
आदित्य ठाकरे
'मला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे,' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जन आशीर्वाद यात्रा केली.
 
'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या,' असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. आता ते 29 वर्षांचे आहेत आणि शिवसेनेचे नेते झाले आहेत.
 
आदित्य गेल्या सहा वर्षांपासून राजकारणात आहेत.
 
2010च्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली.
 
गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत.
 
2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं.
 
याव्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यासाठीचा आग्रह धरला.
 
मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.
 
2019च्या विधानसभा निवडणुकीत ते वरळीतून विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.