शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (14:23 IST)

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?

जोनाथन बेर
ऑफिसमध्ये अजिबात झोपायचं नाही, असं अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे. पण आता या गोष्टीचा परत विचार करण्याची वेळ आली असल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत.
 
ऑफिसमधल्या डुलक्यांवर कडक कारवाई करण्याचं अमेरिकन सरकारने ठरवलंय.
 
फेडरल कर्मचाऱ्यांनी (अमेरिकन सरकारी कर्मचारी) ऑफिसमध्ये झोपणं वा डुलकी काढणं याकडे पूर्वीपासूनच 'अजिबात न करण्याची गोष्ट' म्हणून पाहिलं जात असलं, तरी आतापर्यंत कधीही त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती.
 
या महिन्याच्या सुरुवातीला जनरल सर्व्हिसेस अॅडमिनिस्ट्रेशनने प्रसिद्ध केलेल्या एका सूचनेत म्हटलं होतं, 'एजन्सीच्या एखाद्या अधिकाऱ्याने परवानगी दिल्याखेरीज फेडरल कार्यालयांमध्ये झोपण्याची सर्वांना मनाई आहे.'
 
नेमकं काय घडल्यामुळे अशी सूचना देण्यात आली हे अजून स्पष्ट नाही कारण यावर काहीही प्रतिक्रिया द्यायला या कार्यालयाने नकार दिलाय. पण कर्मचाऱ्यांनी झोप काढण्यावर एखाद्या सरकारने पावलं उचलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
 
2018मध्ये कॅलिफोर्निया राज्याच्या ऑडिटरने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. 'डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेईकल्स'मधल्या रोज 3 तास झोपणाऱ्या एका कर्मचाऱ्याबद्दलचा हा अहवाल होता. या कर्मचाऱ्याच्या झोपेमुळे चार वर्षांच्या कालावधीमध्ये राज्याच्या कामाचे तास वाया गेल्याने तब्बल 40,000 डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
 
ही महिला कर्मचारी झोपी गेल्याने तिच्या सहकाऱ्यांना तिचं काम करावं लागत असल्याचं अहवालात म्हटलं होतं.
 
पण तिच्या तब्बेतीच्या तक्रारींमुळे तिला असा थकवा येत असल्याचं तिच्या सुपरव्हायजरचं म्हणणं असल्याने तिला कामावरून काढून टाकण्यात आलं नाही.
 
कामावर असणाऱ्या सगळ्यांनी थोडावेळ झोप काढणं हे अनेकांना विचित्र वाटू शकतं. पण यामुळे कामाचा दर्जा खालावत नाही तर उलट कामाचा दर्जा वाढत असल्याचं सांगितलं जातंय.
 
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन अॅण्ड मेडिकलचे माजी अध्यक्ष आणि बोस्टन मधल्या ब्रिघम अॅण्ड विमेन्स हॉस्पिटलमधील क्लिनिकल स्लीप मेडिसिनचे मेडिकल डायरेक्टर डॉ. लॉरेन्स एपस्टीन यांच्यामते 70 कोटी अमेरिकन लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे.
 
अमेरिकेतल्या इंडियाना राज्यातील बॉल स्टेट युनिव्हर्सिटीने नुकताच याविषयीचा एक अभ्यास प्रसिद्ध केला. यासाठी दीड लाख लोकांनी स्वतःच्या झोपेच्या सवयींविषयी माहिती दिली होती. यावरून असं आढळलं की रोज रात्री सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण हे 2010च्या 30.9% वरून वाढून 2018मध्ये 35.6% झालं आहे. ही माहिती पुरवणाऱ्या लोकांपैकी अर्धेजण हे पोलीस अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी होते. आपल्याला पुरेशी झोपच मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
 
बीबीसीशी बोलताना एपस्टिन यांनी सांगितलं, "काही कंपन्यांना या परिस्थितीची कल्पना आहे आणि यावर तोडगा काढण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. पण दुर्दैवाने आपल्या(अमेरिकन) सरकारला असं वाटत नाही."
 
"ही अशी अडचण आहे जी लवकरात लवकर सोडवायला हवी पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही."
 
पुरेशी झोप न झाल्यास त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होऊ शकतोच पण अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.
 
स्थूलपणा, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघातासारख्या अनेक विकारांचा आणि सतत अस्वस्थ असणं (Anxiety), नैराश्य यासारख्या मानिसक आजारांचा संबंध हा अपुऱ्या झोपेशी आहे.
 
2016मध्ये रँड कॉर्पोरेशनने याविषयीचं एक विश्लेषण प्रसिद्ध केलं होतं. कर्मचाऱ्यांना पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला दरवर्षी 411 अब्ज डॉलर्सचा फटका बसत असल्याचं यात म्हटलंय. यामध्ये वाया जाणाऱ्या कामाच्या तासांचाही समावेश आहे.
 
कामावर असताना कर्मचाऱ्यांना लहानशी डुलकी घेऊ देणं हा यावरचा उपाय असल्याचं एपस्टिन आणि इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
"अर्धवट झोप झालेली लोकं उत्तम काम करू शकत नाहीत. यामुळे कामाच्या ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढतो परिणामी कंपनीला येणारा खर्चच वाढण्याची शक्यता असते कारण अशा कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या जास्त अडचणी भेडसावतात," एपस्टिन म्हणतात.
 
पण इतर देशांमध्ये मात्र अशी डुलकी काढण्याबाबत फारसे कठोर नियम नाहीत. जपानमध्ये तासनतास काम करणाऱ्या लोकांना कामाच्या जागी थोडावेळ आराम करता यावा म्हणून कंपन्या 'साऊंड प्रुफ पॉड्स' बसवत आहेत.
 
हळुहळू ही कल्पना लोकप्रिय होत आहे.
 
बेन अॅण्ड जेरीज या आईस्क्रीम कंपनीने कर्मचाऱ्यांना आराम करता यावा यासाठी 'नॅप रूम्स' तयार केलेल्या आहेत. 10 बाय 10 च्या या खोल्या फारशा आरामदायी नसल्या तरी यामध्ये झोपायला एक साधं आणि पातळ ब्लँकेट आहे. या खोल्यांना 'द विंची रूम' म्हटलं जातं.
 
इथे झोपायला येणारे 20 मिनिटांची डुलकी काढू शकतात. जर कोणी आजारी असेल, कोणाला जास्त झोपायचं असेल तर त्यांना घरी पाठवलं जातं.
 
पण असं असलं तरी 'कामावर असताना झोपणं' याविषयी लोकांची भावना फारशी चांगली नसल्याचं बेन अॅण्ड जेरीजच्या प्रवक्त्या लॉरा पीटरसन यांनी सांगितलं.
 
अशा प्रकारे कामावर डुलकी काढण्यासाठी लोकांना आपलं नाव रजिस्टरमध्ये लिहावं लागत असे. पण खरं नाव उघड होऊ नये म्हणून लोकांनी 'डॉनल्ड डक'सारखी वाट्टेल ती नावं लिहायला सुरुवात केल्यानंतर ही पद्धत बंद करण्यात आल्याचं त्या सांगतात.
 
"आपण ही सेवा वापरतो, असं मान्य करायला फारसं कोणाला आवडत नाही," पीटरसन म्हणतात. तीन वर्षांपूर्वी कंपनीमध्ये रूजू झाल्यापासून आजवर त्यांनी चार वेळा या नॅप रूमचा वापर केलेला आहे.
 
"मी कधीकधी झोपतो आणि मी जास्त वेळ झोपू नये म्हणून मला फोनवर गजर लावून ठेवावा लागतो. ही थोडीशी विश्रांती चांगली वाटते आणि मग मी काम करायला ताजातवाना होतो."
 
त्यांचे सहकारीही याला दुजोरा देतात.
 
"पहिल्यांदा मला ही खोली वापरताना काहीसं विचित्र वाटलं होतं. पण याचा परिणाम इतका छान होता की मग नंतर अवघडल्यासारखं वाटलं नाही," कॉपोरेट ऑफिसमध्ये काम करणारे बेन अॅण्ड जेरीजचे कर्मचारी रॉब मिखलाख म्हणतात.
 
"मी दुसऱ्यांदा जेव्हा द विंची रूम वापरली तेव्हा मी योग्य निर्णय घेतल्याची मला जाणीव झाली. कारण मग मी फ्रेश होत पुन्हा कम्य्पुटर स्क्रीनसमोर डोळे ताणत काम करायला तयार होतो."
 
हे सगळं सुरू असताना उत्तर अमेरिकेत्या काही कंपन्यांनी या डुलकी काढण्याचाच व्यवसाय सुरू केलाय.
 
कॅनडामध्ये नुकताच 'नॅप इट अप' नावाचा पहिला 'नॅपिंग स्टुडिओ' सुरू झाला. बँकेमध्ये तासनतास काम करत असताना आपल्याला या स्टुडिओची कल्पना सुचल्याचं याच्या संस्थापक मेहजबीन रहमान म्हणतात.
 
टोरांटोच्या गजबजलेल्या भागात असणाऱ्या स्टुडिओमध्ये जाऊन कर्मचारी 25 मिनिटांसाठी एक मोठा बेड भाड्याने घेऊ शकतात. यासाठी 10 कॅनेडीनय डॉलर्स आकारले जातात. स्टुडिओतल्या दोन बेड्स दरम्यान जाडजूड पडदे असल्याने इथे झोपणाऱ्यांना एकांत मिळतो. शिवाय खोलीमध्ये चित्त शांत करणाऱ्या अत्तराचा सुगंध दरवळत असतो.
 
'मेट्रोनॅप्स' कंपनीने ही संकल्पना एक पाऊल पुढे नेलीय. या कंपनीच्या आकर्षक दिसणाऱ्या पॉड्समध्ये लोकांना आरामात रेलून झोपता येतं.
 
24 तास सुरू राहणारे हॉस्पिट्लस, कंपन्या, विमानतळांसारख्या ठिकाणी असे पॉड्स लोकप्रिय होत आहेत. पण आपल्याला हेल्थ कल्ब्स आणि विद्यापीठांकडूनही मागण्या येत असल्याचं मेट्रोनॅप्सचे सीईओ क्रिस्टोफर लिंडोल्म म्हणतात.
 
"आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं. कारण आम्ही कामाच्या ठिकाणी झोपण्याचं मार्केटिंग करत होतो. पूर्वी तुम्ही कामावर याल तेव्हा कामासाठी फिट असाल असं कंपन्या गृहित धरत होत्या." लिंडोल्म म्हणतात.