गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

श्रीलंका : ‘हल्लेखोरानं UK आणि ऑस्ट्रेलियात घेतलं आहे शिक्षण’

श्रीलंका हल्ल्यात ज्यांच्या समावेश आहे, त्या हल्लेखोरांपैकी एक जणाचं UK आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण झालं आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
 
"ऑस्ट्रेलियात एक कोर्स पूर्ण करण्यापूर्वी हल्लेखोरानं UKमध्ये शिक्षण घेतलं," असं श्रीलंकेच्या उप-संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागे इस्लामिक स्टेट अर्थात आयएसचा हात असू शकतो असं पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे.
 
या स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
 
परदेशात असलेल्या दहशतवादी गटांच्या मदतीशिवाय स्फोट घडवणं शक्य नाही, असा विश्वास श्रीलंका सरकारला असल्याचंही रनिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे.
 
इस्लामिक स्टेटनं मंगळवारी या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. मात्र त्यासाठी कुठला पुरावा दिलेला नाही.
 
दरम्यान रविवारी झालेल्या हल्ल्यांनंतर देशाच्या सुरक्षेची पुनर्बांधणी करण्याची घोषणा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी केली आहे.मंगळवारी टीव्हीवरून दिलेल्या संदेशात राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी पुढच्या 24 तासात सगळ्या सैन्यदलाच्या प्रमुखांची उचलबांगडी केली जाईल असं स्पष्ट केलंय.
 
तसंच गुप्तचर यंत्रणांनी जो हल्ल्याचा इशारा दिला होता, त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली नाही, आणि अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही सिरिसेना म्हणाले.
 
आज काय-काय घडलं?
1. 9 हल्लेखोरांपैकी 8 जणांची पोलिसांना ओळख पटली आहे. यांतील एक महिला आहे.
 
2. यांपैकी बहुतेक जण हे उच्चशिक्षित आणि मध्यमवर्गीय आहेत.
 
3. देशातील USच्या राजदुतांनी म्हटलं की, देशात सतत हल्ले घडवून आणण्याची योजना होती.
 
4. पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना ताब्यात घेतलं आहे.
 
पंतप्रधानांनी काय म्हटलं आहे?
श्रीलंकेत झालेल्या स्फोटांना सरकारनं स्थानिक इस्लामी नॅशनल तोहिद जमातला जबाबदार धरलंय.
 
"हे हल्ले केवळ स्थानिक कट्टरवाद्यांनी केले असल्याची शक्यता नाही, त्यांना जे उत्तम ट्रेनिंग आणि त्यांच्यातील समन्वय यामागचं कनेक्शन आपल्याला याआधी दिसलेलं नाही."
 
आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी 40 जणांना ताब्यात घेतलं आहे. ते सगळे श्रीलंकेचे नागरीक आहेत. अनुचित घटना किंवा संभाव्य हल्ले टाळण्यासाठी देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
 
"आतापर्यंत हल्ल्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आलेले नागरीक श्रीलंकेचे आहेत. मात्र काही जणांनी हल्ल्याआधीच देश सोडला असल्याची शक्यता आहे." असं पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे.
 
"या हल्ल्यात परदेशातील काही गटांचा हात असल्याचे स्पष्ट संकेत आणि पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्याच्या मुळाशी जाऊन तपास करू."
 
नेगोम्बोतील हल्ल्यात ज्यांनी नातेवाईक आणि आप्तेष्ट गमावले आहेत, अशा शोकात बुडालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना काही संस्था आणि स्वयंसेवक पाणी, अन्न आणि इतर सुविधा पुरवत आहेत.
 
कोलम्बोत तीन चर्चेस आणि तीन मोठ्या हॉटेलांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. ईस्टरच्या प्रार्थनेसाठी यावेळी चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
 
दरम्यान ज्या चौथ्या हॉटेलात स्फोट घडवण्याचा कट रचण्यात आला होता, तो सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावल्याचं पंतप्रधान विक्रमसिंघेंनी सांगितलं आहे.
 
तसंच रविवारच्या हल्ल्यांनंतरही देशात काही हल्लेखोरे स्फोटकांसह लपले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
हल्ल्यामागे नेमकं कोण आहे?
अमाक न्यूजच्या माध्यमातून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना इस्लामिक स्टेटनं म्हटलंय की, "आम्ही इस्लामविरोधात असलेल्यांना आणि श्रीलंकेतील ख्रिश्चनांना या हल्ल्यात लक्ष्य केलं आहे."
 
दरम्यान हा दावा करताना कुठलाही पुरावा इस्लामिक स्टेटनं दिलेला नाही. मात्र हल्ल्यात सहभागी असलेल्या आठ जणांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
इस्लामिक स्टेटचा शेवटचा सुभाही नेस्तनाबूत केल्याचा दावा मार्चमध्ये करण्यात आला होता. मात्र हा इस्लामिक स्टेटचा किंवा त्यांच्या विचारधारेचा अंत आहे असं म्हणता येणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
 
दरम्यान नॅशनल तोहिद जमात हा याआधी कट्टरवादी इस्लामी ग्रुप जेएमआयशी जोडला गेलेला होता, अशी माहिती संरक्षणमंत्री विजयवर्धने यांनी संसदेत दिली.
 
प्राथमिक तपासानुसार हे हल्ले न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटांचा बदला म्हणून घेण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येतंय असंही विजयवर्धने म्हणाले.
 
मोठ्या हल्ल्यांची कुठलीही पार्श्वभूमी किंवा इतिहास नॅशनल तोहिद जमातचा नाहीए. मात्र गेल्यावर्षी बुद्धपुतळ्याची नासधूस केल्यानंतर ही संस्था डोळ्यावर आली होती. दरम्यान रविवारचे हल्ले आपणच घडवल्याची कुठलीही कबुली किंवा दावा नॅशनल तोहिद जमातनं केलेला नाही.
 
दरम्यान हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता, त्यानंतरही कुठलीही कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने सध्या श्रीलंकन सरकार टीकेचं धनी बनलं आहे.
 
सुरक्षा यंत्रणा नॅशन तोहिद जमातवर लक्ष ठेऊन होत्या असं सांगितलं जातंय, मात्र त्याबाबतची कुठलीही माहिती पंतप्रधान किंवा कॅबिनेटला देण्यात आलेली नव्हती.
 
बीबीसीच्या संरक्षण आणि सुरक्षा प्रतिनिधी गॉर्डन कोरिया यांचं विश्लेषण
श्रीलंकेतील दोन स्थानिक गटांनी हे हल्ले घडवले असावेत असं श्रीलंकन सरकारनं म्हटलंय. मात्र या हल्ल्यांचं स्वरूप आणि त्याचा आवाका पाहता यामागे आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि गटांचा हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
याआधी इस्लामिक स्टेटनं कुठलाही संबंध नसतानाही किंवा आयएसची प्रेरणा घेऊन ज्यांनी हल्ले घडवले अशा घटनांचीही जबाबदारी स्वीकारलेली आहे. श्रीलंकेत अनेक वर्ष घडत असलेल्या हिंसेपेक्षा रविवारी झालेले हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या विचारधारेशी किंवा त्यांच्या कार्यपद्धतीशी सुसंगत वाटतात.पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.
 
काही स्थानिक तरूण इस्लामिक स्टेटशी खरंच संबंधित आहेत का? त्यांना इस्लामिक स्टेटकडन काही सपोर्ट मिळतो का? ते सीरिया किंवा इतर देशांमध्ये जाऊन आलेत का? श्रीलंकन सरकारनं असा दावा केला आहे की, काही जण परदेशात जाऊन आले आहेत. पण आताच्या हल्ल्यांशी त्याचा थेट संबंध जोडता येऊ शकतो का?
 
या प्रश्नांची उत्तरं मिळणं केवळ श्रीलंकेसाठीच नव्हे तर इतर देशांसाठीही महत्त्वाचं आहे. कारण तशा अर्थानं लहान असलेले कट्टरवादी ग्रुप अशा प्रकारचे मोठे हल्ले करण्याची क्षमता ठेवतात का? हे त्यातून लक्षात येईल.
 
पीडित कोण आहेत?
मंगळवारी देशातील काही ठिकाणी सामूहिक दफनविधी करण्यात आला. तसंच काल श्रीलंकेत राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात आला. हल्ल्यात जे मरण पावलेत त्यातले बहुतेक लोक हे श्रीलंकन आहेत. जे ईस्टर संडेदिवशी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आले होते.
 
हल्ल्यात ज्यांचा जीव गेला त्यात 38 जण हे परदेशी नागरिक आहेत. ज्यात 10 भारतीय आणि 8 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. नेगोम्बोच्या सेंट सेबॅस्टियन चर्चमधील हल्ल्यात मरण पावलेल्या 30 जणांचा सामूहिक दफनविधी काल पार पडला. हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रीय ध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला होता.