मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जवाब वाचून दाखवला. ते म्हणाले, "मनसुख हिरेन यांच्यासंदर्भात जो एफआयआर दाखल झाला आहे त्याच्यासोबत पत्नीने जवाब दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे."
मनसुख यांच्या पत्नी म्हणतात, "आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने, पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीचे ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर 2020मध्ये सदर कार वापरण्याकरता दिली होती. सदर कार 5 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांच्या चालकामार्फत पाठवून माझ्या पतीच्या ताब्यात दुकानावर आणून दिली. चार महिने ही गाडी सचिन वाझे यांच्याकडे होती."
26 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हे अधिकारी सचिन वाझेने माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले. साडे दहाला आले. परत सचिन वाझेसोबत आले. दिवसभर सचिन वाझे यांच्यासोबत होते. असे मला पतीने घरी आल्यावर सांगितलं.
27 फेब्रुवारीला सकाळी पुन्हा माझे पती सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई गुन्हे शाखेत गेले. तिथून रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी आले. 28 फेब्रुवारीला ते सचिन वाझे यांच्याबरोबर गेले. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. कॉपी घरून आणून ठेवली. त्यानंतर सचिन वाझे यांचे नाव आणि सही त्याच्यावर आहे. दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वाझे यांच्यासोबतच होते.
2 मार्च रोजी माझे पती दुकानातून घरी आल्यानंतर, पतीने सांगितलं की सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते. सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून अडव्होकेट गिरी यांच्याकडून वारंवार पोलिसांकडून आणि मीडियातून फोन येत असल्याने त्रास होत असल्याबद्दल मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांच्या नावे तयार करून घेण्यात आले. ही तक्रार दिली असल्याचं पतीने सांगितलं.
तक्रारही वाझे यांनी हिरेन यांच्यासाठी तयार करून घेतली असं फडणवीस यांनी सांगितलं.
हिरेन यांच्या पत्नीने केलेली तक्रार देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली.
"सदर तक्रार अर्जाची प्रत मी हजर करत आहे. पोलिसांनी मारहाण केली का हे विचारण्यात आलं. पोलिसांनी मारहाण केली नाही. 3 तारखेला माझे पती नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात गेले. नेहमीप्रमाणे 9 वाजता दुकान बंद करून घरी आले.
"पतीने सांगितले की, सचिन वाझे म्हणत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो. दोन तीन दिवसांमध्ये मी तुला जामीन मिळवून देतो. मी पतीला सांगितले की तुम्ही अटक होण्याची गरज नाही. आपण कोणातरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते."
"4 मार्चला, पतीने माझ्या मोबाईलवरून विनोद हिरेन, माझे दीर यांच्या पत्नीला फोन करून कदाचित मला अटक होईल तरी माझ्यासाठी चांगल्या वकिलाची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न कर असे सांगितलं. पती दुकानात निघून गेले. आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्व जामिनाची आवश्यकता नाही."
मनसुख यांच्या पत्नीने केलेला आरोप गंभीर स्वरुपाचा आहे. त्यांनी सांगितलं की, "माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करत आहे."
'ओहोटीमुळे मृतदेह सापडला'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, "चाळीस लाखांची खंडणी मागितल्यासंदर्भात एफआयआर आहे. धनंजय गावडे आणि सचिन वाझेंचं त्यात नाव आहे. हिरेन यांचं शेवटचं लोकेशन गावडे यांच्या घराचे आहे. गावडेंचं घर चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. हिरेन यांना तिथे जावं लागण्याचं कारण काय? मग हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. याच्यापेक्षा अधिक पुरावे काय हवे आहेत?"
"201कलमाअंतर्गत तात्काळ सचिन वाझेंना अटक व्हायला हवी. हिरेन यांची हत्या गाडीमध्येच करण्यात आली असा संशय आम्हाला आहे. खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आला. भरती असती तर मृतदेह वाहून गेला असता मात्र ओहोटीमुळे मृतदेह परत आला. हाती लागला. वाझे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असं फडणवीस म्हणाले.
मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी -अनिल परब
फडणवीस यांचं वक्तव्य झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ते म्हणाले, "हिरेन यांना मृत्यूपश्चात न्याय मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ही चांगली गोष्ट आहे मात्र भाजप खासदार मोहन डेलकर यांनी महाराष्ट्रात येऊन मुंबईत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये नावं लिहिली आहेत. त्याप्रकरणीही चौकशी व्हावी".
मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
गदारोळ वाढत गेल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.