शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (08:26 IST)

कोनेरू हंपी ठरल्या यावर्षीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या मानकरी

बीबीसी तर्फे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी यांना जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
हंपी सध्या जागतिक रॅपिड चेस स्पर्धेच्या विजेत्या आहे. तलंच केर्न्स कपही त्यांच्या नावावर आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी मोलाचा आहे. बुद्धिबळ हा क्रिकेटसारखा मैदानी खेळ नाही. मात्र या पुरस्कारामुळे जगाचं लक्ष बुद्धिबळाकडे वेधलं जाईल असा मला विश्वास आहे.”  
 
त्या पुढे म्हणाल्या, “आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी अनेक स्पर्धा जिंकल्या. महिला खेळाडूंनी खेळाची साथ सोडू नये. लग्न आणि मातृत्व या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे आयुष्याची दिशा बदलायला नको.” हंपी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बुद्धिबळमधलं त्यांचं प्राविण्य त्यांच्या वडिलांनी लहानपणीच ओळखलं होतं. 2002 साली वयाच्या पंधराव्या वर्षी सर्वात युवा ग्रँडमास्टर हा खिताब मिळवून त्यांनी हे सिद्ध केलं होतं. चीनच्या होऊ युफान यांनी हा विक्रम 2008 मध्ये मोडला होता. 
 
व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात बीबीसीचे महासंचालक टीम डेव्ही यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ते म्हणाले, “ बीबीसीतर्फे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकल्याबद्दल कोनेरू हंपी यांचं खूप खूप अभिनंदन. कोनेरू हंपी यांचं बुद्धिबळातलं योगदान मोठं आहे आणि त्यामुळे त्या या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी आहेत. भारतीय महिला खेळाडूंचं यश जोखण्यात बीबीसी आघाडीवर आहे याचा मला आनंद आहे. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा फक्त एक पुरस्कार नाही, तर समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचं प्रतिनिधित्व मिळावं आणि त्या अनुषंगाने आपण ज्या जगात राहतो त्याचं प्रतिबिंब आमच्या पत्रकारितेत पडावं या आमच्या संपादकीय धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.” 
 
यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार अव्वल अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांना देण्यात आला. भारतातील खेळातलं महत्त्वाचं योगदान आणि प्रेरणादायी खेळाडूंच्या पिढ्या घडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2003 मध्ये उंच उंडी या क्रीडाप्रकारासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेतल्या त्या एकमेव भारतीय विजेत्या खेळाडू आहेत. 
 
“या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली याबद्दल मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. खेळातल्या यशस्वी कारकीर्दीप्रती मला कृतकृत्य वाटतं आहे,माझ्या पालकांनी आणि पतीने या प्रवासात मला मोलाची साथ दिली होती. त्याशिवाय हा प्रवास अशक्य होता. ते कायमच माझ्या पाठीशी उभे राहिले. मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, तरीही कष्ट आणि सातत्य यांना पर्याय नाही हा महत्त्वाचा धडा या अडचणींनी दिला. इच्छाशक्ती आणि प्रेरणा असली की सगळं काही शक्य आहे.” अंजू बॉबी जॉर्ज त्यांचं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या. 
 
या पुरस्कारांबरोबरच यावर्षीचा उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मनू भाकर यांना देण्यात आला. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने या पुरस्काराची घोषणा केली. BBC ISWOTY पुरस्कारांमध्ये या श्रेणीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. भाकरने अवघ्या 16 व्य वर्षी 2018 मध्ये इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे घेण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकली. त्याचबरोबर त्याच वर्षी युथ ऑलिंम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलं. तसंच कॉमनवेल्थ स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळालं. 
 
“हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या कष्टांचं चीज होतंय आणि माझी कामगिरी लोकांपर्यंत पोहोचतेय. अंजू बॉबी जॉर्ज यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळतोय याचाच अर्थ प्रतिभेला कुठेतरी आकार मिळतोय” असं मनू भाकर मनोगत व्यक्त करताना म्हणाली. 
 
व्हर्च्युअल पद्धतीने हा सोहळा पार पडला. बीबीसीच्या संचालक (बातम्या) फ्रॅन अन्सवर्थ यांनी या पुरस्कार सोहळ्याचा भाग होण्याबद्दल आनंद व्यक्त केला. या वर्षी BBC Sports Hackathon या उपक्रमाअंतर्गत 50 महिला खेळाडूंच्या कामगिरीची नोंद विकिपिडियात केली गेली. जवळजवळ 300 नोंदी विकिपिडियात नोंदवण्यात आल्या. सात भाषांमध्ये झालेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केलं. BBC ISWOTY 2021 या प्रकल्पाचं हे मुख्य वैशिष्ट्य होतं. 
 
BBC ISWOTY या प्रकल्पाची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. भारतातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.
 
फेब्रुवारी 2021 मध्ये या पुरस्कारासाठी पाच नामांकनं जाहीर करण्यात आली होती. त्यात धावपटू द्युती चंद, बुद्धिबळ खेळाडू  कोनेरू हंपी, नेमबाज मनू भाकर, कुस्तीगीर विनेश फोगट आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी यांचा या नामांकनात समावेश होता.