शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:44 IST)

Ind Vs Aus Test : टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकली; ऋषभ पंतची धडाकेबाज खेळी

ऋषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेवियावर तीन विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला. ऋषभ पंतने नाबाद 89 करत टीम इंडियाला खळबळजनक विजय मिळवून दिला.
 
या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशी जिंकली. शुभमन गिलने 91 रन्सच्या खेळीसह विजयाचा पाया रचला. चेतेश्वर पुजाराने 56 रन्सची संयमी खेळी केली.
 
पाचव्या आणि अंतिम दिवशी, टीम इंडियाला 324 रन्सची आवश्यकता होती. टीम इंडियाने धोका न पत्करता मात्र त्याचवेळी आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. पंतने 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 89 रन्सची खेळी करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
 
तब्बल 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथे टेस्ट मॅच गमावली आहे.
 
ब्रिस्बेन टेस्टचा शेवटचा तास उत्कंठावर्धक वळणावर असून, ऋषभ पंत टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाला मिळवून देण्याची चिन्हं आहेत.
 
17 ओव्हर्सचा खेळ शिल्लक असून, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 80 रन्सची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सची आवश्यकता आहे.
 
ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये शेवटची टेस्ट 32 वर्षांपूर्वी म्हणजेच १९८८ मध्ये गमावली आहे. टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये 6 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी 5 टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर एक टेस्ट अर्निणित झाली होती.
 
चौकार,षटकार आणि एकेरी-दुहेरी यांचा मिलाफ ऋषभने आपल्या खेळीत दाखवला आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं.
 
ब्रिस्बेन टेस्टमध्ये पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर 98 ओव्हर्समध्ये 324 रन्सचं लक्ष्य आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताला 262 धावांची गरज होती.
 
पाचव्या दिवशी खेळताना शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केलीय. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा गिलच्या साथीने सध्या पिचवर आहे. त्यानंतर भारताची धावसंख्या 83 वर 1 अशी आहे.
 
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मार्नस लबूशेनने दोन जीवदानांच्या बळावर केलेल्या शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाने 369 रन्सची मजल मारली. कर्णधार टीम पेनने 50 रन्सची खेळी केली. टीम इंडियातर्फे पदार्पणवीर टी.नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह शार्दूल ठाकूरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाची अवस्था 186/6 अशी झाली होती. मात्र पहिली टेस्ट खेळणारा वॉशिंग्टन सुंदर आणि दुसरी टेस्ट खेळणारा शार्दूल ठाकूर यांनी 100 रन्सची भागादारी केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत संघाचा डाव सावरला. सुंदरने 7 चौकार आणि एका षटकारासह 62 तर शार्दूलने 9चौकार आणि 2 षटकारांसह 67 रन्सची खेळी केली. टीम इंडियाचा डाव 336 रन्समध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला अल्प आघाडी मिळाली.
 
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 रन्समध्ये आटोपला. स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 55 रन्स केल्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने डावात 5 विकेट्स घेण्याची करामत पहिल्यांदाच केली. त्याने स्मिथ, मार्नस लबूशेन, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद केलं.
 
शार्दूल ठाकूरने 4 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. टीम इंडियाला विजयासाठी 328 रन्सचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवशी पावसामुळे 20 ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही.
 
मालिकेत काय घडलं?
अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियाचा 36 रन्समध्येच खुर्दा उडाल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली. पॅटर्निटी लिव्हसाठी कर्णधार विराट कोहली या मॅचनंतर मायदेशी परतला. फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.
 
चार बदल आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अजिंक्य रहाणेची शतकी खेळी या विजयाचं वैशिष्ट्य ठरली. मोहम्मद सिराजने पदार्पणात पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स पटकावल्या.
 
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रेक्षकांकडून शेरेबाजी होत असल्याची तक्रार केली. भारतीय संघव्यवस्थापनाने मॅचरेफरींकडे यासंदर्भात तक्रार केली.
 
सिडनी इथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने चिवटपणे प्रतिकार करत टेस्ट अर्निणित राखली. रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तास किल्ला लढवत टेस्ट अनिर्णित राखली.
 
दुखापतग्रस्त संख्या वाढतच गेली आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला फिट अकरा खेळाडू उभे करता येतील का अशी शक्यता निर्माण झाली होती.