रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:42 IST)

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? मग हे वाचाच

-सरोज सिंह
कोरोना लस टोचून घेण्याबाबत तुमच्या मनात साशंकता आहे का? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं
 
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन दोन दिवस झालेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 2 लाख 24 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
 
दरम्यान 447 लोकांना लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम जाणवला आहे. एकूण लस घेतलेल्या लोकांपैकी हे प्रमाण 0.2 टक्के एवढंच आहे. म्हणजे 0.2 टक्के लोकांना लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला आहे.
 
भारत सरकार लसीकरण अभियानाअंतर्गत ठरवण्यात आलेल्या लक्ष्याच्या 64 टक्केच काम पूर्ण झालं आहे. पहिल्या दिवशी सरकार 3 लाख 16 हजार लोकांना लस देऊ इच्छित होती.
 
मात्र प्रत्यक्षात 2 लाख 24 हजार लोकांनाच लस देण्यात आली.
 
अनेक राज्यांमध्ये लस देणारी माणसं लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचलेत नाहीत. दिल्लीची स्थिती पाहिली तर निर्धारित लोकांपैकी 54 टक्के लोकांना लस देण्यात आली.
 
लस घेतल्यानंतर प्रतिकूल परिणाम जाणवल्याने लस घेणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे का? का अन्य काही कारणं आहेत?
 
आरोग्य मंत्रालयानुसार, कोणत्याही देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वाधिक लोकांना लस देण्याचं प्रमाण भारतात आहे. ही आकडेवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सपेक्षाही जास्त आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे की adverse effect following immunization काय असतं? असा त्रास होणं सर्वसाधारण आहे की नाही?
 
Adverse effect following immunization काय असतं?
 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासासंदर्भात सविस्तरपणे सांगितलं.
 
लस टोचल्यानंतर माणसाला होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या वैदयकीय अडचणीला 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन' असं म्हटलं जातं. हा त्रास लशीमुळे होऊ शकतो, लसीकरण प्रक्रियेने होऊ शकतो किंवा अन्य काही कारणाने होऊ शकतो. साधारणत: याचे तीन प्रकार असतात- किरकोळ, गंभीर आणि अतिगंभीर.
 
त्यांच्या मते, बहुतांश तक्रारी या किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्यांना मायनर अॅडव्हर्स इफेक्ट असं म्हटलं जातं. कोणत्याही स्वरुपाचं दुखणं, इंजेक्शन देण्यात आलं त्याठिकाणी सूज, हलका ताप, अंगदुखी, घाबरायला होणं, अलर्जी, अंगावर पुरळ येणं अशा तक्रारी जाणवतात.
 
मात्र काही तक्रारी गंभीर असतात. त्यांना सीव्हिएर केस मानलं जातं. अशा केसेसमध्ये लस घेतल्यानंतर प्रचंड ताप येतो. ऐनफलैलिक्सची तक्रार असू शकते. याही स्थितीत जीवावर बेतेल असे परिणाम नसतात. अशा गंभीर केसेसमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते.
 
मात्र अतिगंभीर केसेसमध्ये लस दिलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशा केसेसना अतिगंभीर मानलं जातं. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो किंवा आजीवन एखाद्या स्वरुपाचा त्रास भोगावा लागू शकतो. अशा स्वरुपाच्या केसेस खूपच मर्यादित प्रमाणात असतात. मात्र अशा केसेसचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर पाहायला मिळतो.
 
देशात सुरू झालेल्या लसीकरण प्रक्रियेदरम्यान केवळ तीन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यापैकी दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
 
दिल्लीतल्या राजीव गांधी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी. एल. शेरवाल यांच्या मते, "लसीकरण प्रक्रियेत अशा स्वरुपाचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतात. संपूर्ण लसीकरण प्रक्रियेदरम्यान 5 ते 10 टक्के अॅडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळणं सामान्य गोष्ट आहे."
 
ऐनफलॅक्सिस काय आहे?
 
बीबीसीशी बोलताना डॉ. शेरवाल म्हणाले, "लस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गंभीर अॅलर्जीचे परिणाम दिसू लागतात त्या स्थितीला ऐनफलॅक्सिस म्हणतात. याचं कारण लसीकरण नसतं. एखाद्या औषधाची अॅलर्जी झाल्याने अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो."
 
अशा अवस्थेत अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्यूनायझेशन किटमध्ये इंजेक्शनचा वापर केला जातो. याची तशी आवश्यकता भासत नाही. सीव्हिअर म्हणजे अतिगंभीर केसेसमध्ये असं करायला लागू शकतं.
 
अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्यूनायझेशन प्रक्रियेत काय होतं?
 
यासंदर्भात एम्समधील ह्यूमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांच्याशी आम्ही संवाद साधला. 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन'साठी आधीच प्रोटोकॉल निश्चित केले जातात. लसीकरण केंद्रात अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करायचं याचं प्रशिक्षण डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना देण्यात येतं.
 
त्यांनी सांगितलं की, "लस दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला अर्धा तास केंद्रातच थांबवलं जातं. जेणेकरून शरीरावर परिणाम जाणवला तर त्यावर उपचार करता येतील. प्रत्येक लसीकरण केंद्रात अशी परिस्थिती हाताळण्यासाठी किट तयार ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. ऐनफलैक्सिसची अवस्थेतून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी काही इंजेक्शन्स, पाणी देण्यासाठी ड्रिप आणि अन्य उपकरणं आवश्यक असतात."
 
कोणत्याही स्वरुपाची आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जवळच्या रुग्णालयाशी संपर्क करण्यात येतो. को-विन अपमध्ये संबंधित व्यक्तीची सगळी माहिती दिलेलं असणं अनिवार्य आहे. असं प्रोटोकॉलनुसार ठरवण्यात आलं आहे.
 
अशी स्थिती टाळण्यासाठी लस सुरक्षित पद्धतीने साठवणं आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला लस देण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपशील घेण्यात यावा. एखाद्या औषधाची अलर्जी येत असेल तर त्या व्यक्तीला केंद्र सरकारच्या नियमांनुसार लस देता येत नाही.
 
लस देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला नंतर काय स्वरुपाचा त्रास होऊ शकतो याची कल्पना देण्यात यावी. सरकारद्वारा जारी करण्यात आलेलं गाईडलाईन्सनुसार, लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही माहिती देण्यात येते.
 
सीरियस अॅडव्हर्स इफेक्ट
एवढंच नव्हे अतिगंभीर म्हणजे सीरीयस अॅडव्हर्स इफेक्ट जाणवू लागल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नॅशनल एईएफआयच्या नियमावलीनुसार, याप्रकरणाचा तपास करण्यासाठी डॉक्टरांच्या पॅनेलची नियुक्ती करण्यात आलेली असते.
 
गंभीर प्रकरणात, लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं नाही तर कुटुंबीयांच्या परवानगीने शवविच्छेदन करावं असं नमूद करण्यात आलं आहे. कुटुंबीय याकरता तयार नसतील तरीही एक स्वतंत्र फॉर्म भरून घेणं आवश्यक आहे.
 
लसीकरणानंतर, सीरियस अॅडव्हर्स इफेक्टमुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्यास, नियमावलीनुसार संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणं अपेक्षित आहे. अॅडव्हर्स इफेक्ट लशीत वापरण्यात आलेल्या औषधामुळे झाला आहे का लशीचा दर्ज्यात गडबड झाल्यामुळे झाला आहे हे स्पष्ट होतं. लस देताना काही गडबड झाली आहे का? का अन्य कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला आहे ते स्पष्ट होतं.
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन'मध्ये गडबड असेल तर लवकरात लवकर त्याची माहिती देणं अत्यावश्यक आहे.
 
अॅडव्हर्स इफेक्ट काय असतात हे कसं ठरवलं जातं?
एम्समधील ह्यूमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांच्या मते, अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशनसाठी जे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले आहेत ते आतापर्यंतच्या ट्रायल डेटाच्या आधारे करण्यात आले आहेत.
 
लॉँग टर्म डेटाच्या आधारे प्रोटोकॉल निश्चित करण्यात येतात. देशात कोरोना लसी दिली जात आहे त्यासंदर्भात लाँग टर्म स्टडी डेटाचा अभाव आहे. त्यामुळे तूर्तास जितकी माहिती उपलब्ध आहे, त्याआधारे 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन' प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे.
 
प्रत्येक लसीकरण अभियानात एकसारखे अॅडव्हर्स इफेक्ट दिसून येतात का?
प्रत्येक लसीकरण मोहिमेनंतर अॅडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळतीलच असं नाही. अनेकदा वेगवेगळी लक्षणं अनुभवायला मिळतात. लस तयार करण्याची प्रक्रिया काय आहे? ज्या व्यक्तीला लस देण्यात आली त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे?
 
जसं बीसीजीची लस दिल्यानंतर तोंडात फोड येण्यासारखा त्रास होतो. डीपीटीच्या लशीनंतर काही मुलांना हलका ताप येतो. ओरल पोलिओ डोस दिल्यानंतर कोणत्याही स्वरुपाचे अडव्हर्स इफेक्ट दिसत नाही. कोरोनाच्या लशी-कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या अडव्हर्स इफेक्ट एकसारखे असतीलच असं नाही.
 
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे अॅडव्हर्स इफेक्ट काय आहेत?
कोव्हॅक्सिनची ट्रायल प्रक्रिया डॉ. संजय राय यांनी स्वत: जवळून अनुभवली आहे. त्यांच्या मते, कोव्हॅक्सिन लशीचे गंभीर अॅडव्हर्स इफेक्ट तीन टप्प्यांमध्ये तरी पाहायला मिळालेले नाहीत. तिसऱ्या टप्प्याचा डेटा अद्याप सर्वांशाने उपलब्ध झालेला नाही. तिसऱ्या टप्प्यात 25हजार लोकांना ही लस देण्यात आली होती.
 
कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर काहीजणांनी जी लक्षणं जाणवली ती म्हणजे- अंगदुखी, इंजेक्शन देण्यात आलं त्याठिकाणी सूज, हलका ताप, पुरळ अशा किरकोळ तक्रारी. अशा त्रास झालेल्यांचं प्रमाण 10 टक्के असेल. लस देण्यात आलेल्या 90 टक्के लोकांना कोणताही परिणाम जाणवला नाही.
 
कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर हलका ताप आणि अॅलर्जीची लक्षणं जाणवली होती.
 
केंद्र सरकारतर्फे जगातली सगळ्यांत मोठी लसीकरण मोहीम चालवली जाते, ज्यामध्ये लहान मुलं आणि गरोदर मातांना लस देण्यात येते. पोलिओ मोहिमेदरम्यान देशात तीन दिवस एक कोटी मुलांना लस दिली जाते. इतकी मोठं अभियान देशात चालवलं जातं, याचा अर्थ 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन'चे प्रोटोकॉलचं देशात चांगल्या पद्धतीने पालन केलं जात आहे.
 
एखादी जरी अॅडव्हर्स इफेक्टची केस नोंदली गेली तर त्याचा लसीकरण अभियानावर परिणाम होऊ शकतो.
 
अॅडव्हर्स इफेक्ट होणार या भीतीने लोक लस घ्यायला घाबरतात का? लशीपासून दूर पळण्याचं कारण काय?
आतापर्यंतच्या लशीकरण प्रक्रियेत रुग्णालयात दाखल करावं लागण्याची वेळ तीन रुग्णांबाबत आली आहे. लशीपासून दूर पळण्याचं कारण आणि अॅडव्हर्स इफेक्टचा थेट संबंध नाही. लसीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका असतात, आहेत. लशीसंदर्भात योग्य माहितीचा अभाव हे याचं प्रमुख कारण आहे.
 
लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याबाबतचे प्रश्न मनात असतील तरीही लोक लस घ्यायला तयार होत नाहीत. लशीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकांची साशंकता, विरोध पाहायला मिळतो. जसजशी अधिकाअधिक लोकांना लस देण्यात येते तसे प्रश्न, साशंकता कमी होत जाते. अॅडव्हर्स इफेक्ट मध्ये गंभीर गोष्ट समोर आली तर लोक लस घेण्यापासून स्वत:ला परावृत्त करू शकतात. किरकोळ तक्रारी प्रक्रियेचा भागच आहेत.
 
लोकल सर्कल्स नावाची संस्था देशातल्या लोकांच्या मनात लशीबद्दल असलेली साशंकता आणि प्रश्न यासंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण करत आहे. ३ जानेवारीच्या आकडेवारीनुसार, देशातल्या 69 टक्के लोकांना लशीबाबत साशंकता आहे.
 
हे सर्वेक्षण देशातल्या 224 जिल्ह्यातल्या 18000 लोकांनी दिलेल्या ऑनलाईन प्रतिसादावरून करण्यात आलं आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जसजसे महिने सरत आहेत तसं लशीबाबतची साशंकता वाढत चालली आहे. लशीकरण अभियान सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमी झालं आहे का? याचा अभ्यास झालेला नाही.
 
MRNA पद्धत वापरणाऱ्या लशीसंदर्भात प्रश्न
जगात सध्याच्या घडीला कोरोनावरच्या नऊ लशींना विविध सरकारांनी मंजुरी मिळाली आहे. यापैकी दोन फायझर आणि मॉडर्ना लस mRNA लस आहे. या प्रक्रियेअंतर्गत लशीचा पहिला प्रयोग माणसांवर केला जात आहे. डॉ. संजय यांच्या मते ही लस दिल्यानंतर अॅडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळाले आहेत.
 
बाकी चार लशी, व्हायरसला इन-अॅक्टिव्हेट अर्थात निद्रिस्त करूनच तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकतर्फे तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन आणि चीनच्या लशीचा समावेश आहे.
 
ऑक्सफर्ड अस्ट्राझेनका आणि स्पुतनिक आहेत या दोन लशींना वैक्टर लशी म्हटलं जात आहे. mRNA लशी व्यतिरिक्त अन्य लशींच्या अभियानानंतर अॅडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळालेले नाहीत.