रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:10 IST)

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

प्रणाली येंगडे
बीबीसी मराठीसाठी
 
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा.
 
धाराशीव नावाचा इतिहास
 
धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंध पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे.
 
धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे.
 
राष्ट्रकूट राजवंश हा मराठवाडा-विदर्भ या भागात उदयाला आला. या राजवंशात गोविंद-तृतीय हा पराक्रमी राजा होऊन गेला. त्यावेळेच्या ताम्रपटांमध्ये धाराशीव हे नाव आढळल्याचा संदर्भ 'धाराशिव ते उस्मानाबाद' या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार व लेखक भारत गजेंद्रगडकर यांनी इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांच्या मुलाखतीतून मिळाल्याचं नमूद केलं.
 
1972 साली शासनाने प्रकाशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रथम गॅझेटिय रमध्ये देखील धाराशिव नावाचा उल्लेख आढळतो.
 
महानुभाव साहित्या पासून भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या साहित्यापर्यंत धाराशीवच्या नावाचा उल्लेख असल्याचं प्राध्यापक देशपांडेंचा संदर्भ देत लेखक गजेंद्रगडकर सांगतात.
 
उस्मानाबाद हे नाव आणि तत्कालीन कारणे
 
हैदराबादमधील 7 वे मीर उस्मान अली खान यांच्या नावावरून शहराला उस्मानाबाद हे नाव मिळालं, असं प्रामुख्यानं प्रचलित असलं तरी मूळ धाराशीवचं नाव उस्मानाबाद कसं झालं, याविषयी देखील अनेक मतभेद असल्याचे दाखले भारत गजेंद्रगडकर यांच्या पुस्तकात आढळतात.
 
नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.
 
तर 1998 मध्ये औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत, 1904 साली तत्कालीन लोकप्रिय राजा तिसरे खलिफा हजरत उस्मान राझी अल्लाह यांच्या नावावरून नामांतर केलं असल्याचं नमूद केलेलं आहे. तेव्हापासून म्हणजेच 1904 पासून आजतागायत या गावाचे नाव उस्मानाबाद असल्याचा उल्लेख आहे.
 
शासनाच्या गॅझेटियर मध्ये पान क्रमांक 119 वर म्हटल्यानुसार, निजाम महेबूब अली खानच्या निधनानंतर 29 ऑगस्ट 1911 रोजी उस्मान अली खान सत्तेवर आल्याचा उल्लेख आहे. जर असं असेल तर उस्मान अली खान 1904 मध्ये राजा असणं शक्य नसल्याचं दिसतं. याचिकेत याबद्दल कोणताही पुरावा जोडण्यात आलेला नाही.
 
शिवसेनेची भूमिका
 
25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची प्रथम घोषणा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली. औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं. तसंच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर येथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होतीच.
 
केंद्र शासनाच्या निकषावर पडताळणी केली असता धाराशिव नावाला इतिहास आहे. हे नाव राजकीय, भाषिक अथवा इतर कोणत्याही निकषावर आधारित नसून पूर्वीचंच नाव असल्यानं ते प्रचलित केल्यास ऐतिहासिक नावाला उजाळा देण्याचं श्रेय शासनाला मिळेल अशी भूमिका युती सरकारनं घेतली होती.
 
12 जून 1998 ला युती सरकारनं जाहीर सुचना, हरकती मागवल्या. 10 ऑगस्ट 1998 ला त्याविषयीची सुनावणी होणार त्याआधीच 23 जुलैला औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे महंमद मुश्ताक आणि उस्मानाबादेतील शिक्षक सय्यद खलील या दोघांनी संयुक्तपणे या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
 
नामांतराच्या प्रक्रियेला जनतेच्या पैशातून व महसूलातून पैसे खर्च करावे लागतील. तसंच त्यामुळं समाजाचं दुही निर्माण होऊन संविधानाच्या कलम 14 चा भंग होईल, असं विरोध करणाऱ्यांनी याचिकेत मांडलं.
 
शहरातील लोकांचे मत
 
"केवळ प्रशासनात शहराचा उल्लेख "उस्मानाबाद" असा होतो तर आजही ग्रामीण भागातील जनता शहराला "धाराशीव" याच नावाने ओळखते", दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी यांनी सांगितलं.
 
तर उस्मानाबाद हे जिल्ह्याचे प्रचलित नाव असून, फार पूर्वीपासून शहरातील कामकाज याच नावाने चालते. अशात नामांतर झालं तर काही लोक त्याचं स्वागत करतील तर काहीजण विरोध दर्शवतील. मात्र शहराचे नामांतर हा तेथील लोकांसाठी फार कळीचा मुद्दा नसल्याचं लेखक गजेंद्रगडकर सांगतात.
 
हिंदू अस्मिता, नामांतर आणि विकास
 
मराठवाड्यातील अनेक प्राचीन शहरांची नामांतरे निजामाने त्याकाळी केली. हैदराबादच्या निजामाने आंबेजोगाईचं नामांतर मोमिनाबाद केलं होतं. मात्र लोकमानसातून अंबेजोगाईला त्याचं पूर्वीचं नाव मिळालं. त्यासाठी त्यांना सरकारी पातळीवर जाण्याची गरज पडली नसल्याचं नांदेडचे इतिहास विषयाचे प्राध्यापक प्रभाकर देव यांनी नामांतराविषयी विचारले असता सांगितले.
 
"7 शतकापासून 16 व्या शतकापर्यंत मुघल कालखंड आणि 17-18 व्या शतकापासून ब्रिटिश कालखंड अशी पाश्चात्यांनी भारतीय इतिहासाची केलेली सरळ सरळ मांडणी म्हणजे मूर्खपणा होय. जो इतिहास आपण शिकतो तो न्यूनगंड वाढवणारा इतिहास आहे".
 
त्यामुळे निजामकालीन शहरांची नावं बदलून नामांतराने आपली अस्मिता टिकणार असेल तर त्यात वावगं काय, देव पुढे म्हणाले.
 
तर "उस्मानाबाद हा अतिशय मागास जिल्हा आहे. मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेला जर सर्वाधिक यश मिळालं असेल तर ते मराठवाड्यात. उस्मानाबादमधील जनतेनं तर शिवसेनेला भरभरून मते दिली. अशावेळी विकासावर भर देण्याऐवजी नाव बदलून काय साध्य होणार", असा सवाल महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ सह संपादक प्रमोद माने यांनी उपस्थित केला.
 
"अधिकृत ट्विटच्या माध्यमातून धाराशीवचा झालेला उल्लेख ही काय नवी गोष्ट नाही. 1995 ला युतीचं सरकार आल्यानंतर नामांतराची प्रक्रिया सुरु झाली. आज 25 वर्षे होऊनही उस्मानाबादचं धाराशिव न होणं हा राजकारणाचा भाग आहे", असं माने पुढे म्हणाले.