रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:04 IST)

नेमबाजपटू यशस्विनी सिंह देसवालचं आता लक्ष्य टोकियो ऑलिंपिक

ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओ येथे 2019 च्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यशस्विनी सिंह देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं.
 
आता तिचं लक्ष्य 2021 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिककडे लागलं आहे.
 
माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन असलेली देसवाल हिनं भारतामध्ये आणि जगभरात आपली क्षमता सिद्ध केलीय आणि तिनं मिळवलेल्या यशामुळे ती सुपरिचित आहे.
 
2019 मध्ये आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील तिच्या सर्वोच्च कामगिरीमुळे तिला टोकियोचं तिकीट मिळालं होतं.
 
वडिलांमुळे यशस्विनीला नेमबाजीची आवड
देसवाल हिच्यामध्ये शूटिंगची आवड तिचे वडील एस एस देसवाल यांच्यामुळे निर्माण झाली. तिचे वडील इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत.
 
ते 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीची स्पर्धा पाहण्यासाठी तिला घेऊन गेले होते.
 
यानंतर यशस्विनीनं आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि माजी पोलिस अधिकारी टीएस ढिल्लन यांच्या नेतृत्वात शूटिंगची प्रॅक्टिस सुरू केली. शूटिंगच्या या प्रवासात तिच्या कुटुंबीयांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तिच्यासाठी शूटिंग रेंज तयार केली.
 
यशस्विनीने सुरुवातीलाच मोठी भरारी घेत 2014 मध्ये आयोजित केलेल्या 58 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विविध स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकली.
 
यानंतर तिनं कधीही मागं वळून पाहिलं नाही आणि ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत गेली. दरम्यान 2017 मध्ये तिने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली.
 
यशस्विनीसमोर यापुढे काय आव्हानं आहेत?
यशस्विनी देसवाल हिला तिच्या कुटुंबीयांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळं तिच्या प्रशिक्षण आणि त्यासाठीच्या साहित्याच्या गरजांची पूर्तता होऊ शकली. भारतीय नेमबाजांना उपकरणे आणि प्रशिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळं संघर्ष करावा लागत असल्याचं ती सांगते.
 
यशस्विनीला तिचा खेळ आणि अभ्यासामध्ये संतुलन राखणं देखील एक मोठं आव्हान होतं. तिला आपला सराव, अभ्यास आणि परीक्षांसाठी वेगळा वेळ काढावा लागे.
 
अनेकदा विविध स्पर्धांमध्ये आपली पुस्तकं स्वतःबरोबर बाळगावी लागल्याचं ती सांगते. ती म्हणते की केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही हे खूपच आव्हानात्मक होतं. कारण त्यांनाही देश-विदेशातील विविध स्पर्धांमध्ये तिच्याबरोबर जावं लागे.
 
शूटिंगच्या रेंजमध्ये देसवाल सातत्यानं आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवत असते. 2017 मध्ये तिनं जर्मनीमधील आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जागतिक विक्रम करण्याबरोबरच सुवर्णपदकही जिंकलं आणि त्यानंतर एकाएकी ती प्रकाशझोतात आली.
 
खरं तर ब्राझीलमध्ये 2019 च्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणं हा आतापर्यंतचा तिचा सर्वात मोठा क्षण आहे. यामुळेच टोकियो ऑलिम्पिकच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिनं स्थान मिळवलं.
 
क्रीडा क्षेत्रात सुविधांची आवश्यकता - यशस्विनी
महिलांना पाठिंबा दिला गेला तर त्या बरंच काही करू शकतात, असा विश्वास यशस्विनी व्यक्त करते.
 
प्रत्येक पावलावर तिच्याबरोबर उभ्या राहिलेल्या तिच्या कुटुंबीयांची ती खूप आभारी असल्याचं ती सांगते.
 
ती म्हणते, भारतासारख्या देशात महिलांना आवश्यक असणारा कौटुंबिक आधार मिळत नाही. अधिकाधिक महिलांना खेळामध्ये आणण्याकरिता प्रेरित करण्यासाठी लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे.
 
यशस्विनी असेही म्हणते की, देशाला खेळाच्या अशा मूलभूत पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे ज्यामुळे महिला खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि तेही विशेषत: प्रारंभिक टप्प्यात.