अर्णब गोस्वामी डेटा चॅट लीक: टीआरपी घोटाळा चौकशीमुळेच आल्या गोष्टी समोर - जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारने 'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती, तर देशाचे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
कथित टीआरपी घोटाळयानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी प्रमुख पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप संभाषण व्हायरल झालं आहे. त्यावर पाटील यांनी असं वक्तव्य केलं आहे.
पाटील यांनी म्हटलं की, "प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते."
"या व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक 'विजयाचा' क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. संबंधित व्यक्ती अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे," असंही जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा आरोप रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी केला आहे. सध्या या प्रकरणात पार्थ दासगुप्ता यांच्यासहित दोन जण अटकेत आहेत.
दरम्यान, अर्णब गोस्वामींना राष्ट्रीय सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती आधीच कशी कळली असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत विचारला.