शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (13:23 IST)

अर्णब गोस्वामींवर ब्रिटनच्या नियंत्रकांनी का लावला दंड?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना युकेतील ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने (ऑफकॉम) दंड ठोठावला आहे. ऑफकॉम ही माध्यमांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे.
 
ऑफकॉमने वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्कला 20,000 पाउंड म्हणजेच 19 लाख 73 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
वर्ल्ड व्ह्यू मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून रिपब्लिक भारतचे प्रसारण केले जाते.
6 डिसेंबर रोजी रिपब्लिक भारतवर 'पूंछता है भारत' हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी नागरिकांविरोधात भडकवणारी आणि द्वेष निर्माण करणारी भाषा वापरल्याचा ठपका युकेच्या नियामक कार्यालयाने ठेवला आहे.
 
"दंडासोबतच ऑफकॉमने या कार्यक्रमासंदर्भात रिपब्लिक भारतला स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत," अशी माहिती नियामक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
'पूछता है भारत' हा कार्यक्रम चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी होस्ट करतात. हा एक चर्चेचा कार्यक्रम आहे.
 
या कार्यक्रमाच्या 6 सप्टेंबर रोजीच्या भागातला कॉन्टेंट प्रसारण नियमांना अनुसरून नसल्याचं आढळून आलं आहे.
 
कार्यक्रमात चर्चेदरम्यान 'अपमानकारक' भाषा, द्वेषपूर्ण वक्तव्य आणि व्यक्ती, समाज, धर्म आणि जात याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचं ऑफकॉमचं म्हणणं आहे. कार्यक्रमात पाकिस्तान आणि पाकिस्तानींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचंही आदेशात म्हटलं आहे.
आदेशानुसार 6 सप्टेंबर 2020 रोजी प्रसारित झालेला भाग अर्णब गोस्वामी होस्ट करत होते. चर्चेसाठी 6 मान्यवर होते. यापैकी तीन भारतीय तर तीन पाकिस्तानी पाहुणे होते.
 
भारताच्या चंद्रयान-2 या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यात भारत आणि पाकिस्तान यांच्या अंतराळ मोहिमा आणि तांत्रिक पातळीवरील प्रगतीची तुलना करण्यात आली.
 
कार्यक्रमात पाकिस्तानवर भारतविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला.
 
आदेशात आणखी काय म्हटलं आहे?
आदेशात पुढे म्हटलं आहे, "कार्यक्रमात अँकर आणि सहभागी काही मान्यवरांनी पाकिस्तानविषयी असं काही चित्र रंगवलं जणू सर्वच पाकिस्तानी कट्टरतावादी आहेत. इतकंच नाही तर त्यांचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते आणि खेळाडू सगळेच कट्टरतावादी आहेत. प्रत्येक मूल कट्टरतावादी आहे.
 
"कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजर असणाऱ्या एका व्यक्तीने तर पाकिस्तानचे शास्त्रज्ञ चोर असल्याचं म्हटलं. तर दुसऱ्याने त्यांना भिकारीदेखील म्हटलं. या टीकेसंदर्भात अँकरने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या लोकांना संबोधित करताना म्हटलं आम्ही शास्त्रज्ञ तयार करतो आणि तुम्ही कट्टरपंथीय," असं आदेशात म्हटलं आहे.
कार्यक्रमाची भाषा प्रक्षोभक होती, असंही आदेशात म्हटलेलं आहे. तसंच कार्यक्रमात पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना वारंवार (बोलण्यापासून) रोखलं जात होतं. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच दिली जात नव्हती, असंही आदेशात लिहिलेलं आहे.
 
6 सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण केलं नसल्याचं आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी पावलं उचलल्याचं वर्ल्ड व्ह्यू मीडियाने आपल्या सुरुवातीच्या उत्तरात म्हटल्याचं ऑफकॉमतर्फे जारी आदेशात म्हटलं आहे.
 
जाणीवपूर्वक नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही, असं वर्ल्ड व्ह्यू मीडियाच्या सुरुवातीच्या उत्तरात भर देऊन सांगण्यात आलं आहे.