शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (17:21 IST)

प्रिन्सेस डायना यांचा शेवटचा दिवस कसा होता?

डायना या जगातील प्रसिद्ध स्त्रियांपैकी एक होत्या. त्यांचं चॅरिटीचं काम आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्हीची सतत चर्चा असे. ही चर्चा नेहमीच सकारात्मक असे असं म्हणता येणार नाही, असं शाही राजघराण्याच्या लेखिका केटी निकोल यांनी सांगितलं.
 
प्रसारमाध्यमांनी डायना यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. प्रिन्स विल्यम आणि डायना यांच्या मागे प्रसारमाध्यमांचा ससेमिरा असे.
 
डायना जिथे जात असत तिथे पत्रकार आणि छायाचित्रकारांचा ताफा मागोमाग येत असे.
 
डायना यांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला त्यामुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांच्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका या घटनेनिहाय आहे.
 
डायना यांचा मृत्यू पॅरिस इथे रस्ते अपघातात 31 ऑगस्ट 1997 रोजी झाला. पापराझींचा ताफा मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करत होता. ड्रायव्हर हेन्री पॉल यांनी मद्यपान केल्याचं स्पष्ट झालं.
 
प्रिन्स हॅरी त्यावेळी बारा वर्षांचे होते. 2017 मध्ये बीबीसीच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये प्रिन्स हॅरी यांनी त्या दु:खाचं वर्णन केलं होतं. ते म्हणतात, "आयुष्यात तो धक्का पचवणं सगळ्यांत अवघड आहे. जे लोक मोटारसायकलवरून तिचा पाठलाग करत होते, त्याच लोकांनी अपघातानंतर ती मागे अपघातग्रस्त होऊन बसलेल्या स्थितीत असताना फोटो काढले."
 
काय झालं होतं त्यादिवशी?
डायना यांनी त्यांचा शेवटचा दिवस त्यांचे पार्टनर डोडी अल फायद यांच्या बोटीवर व्यतीत केला होता. बोटीच्या वरच्या भागात त्यांचं वास्तव्य होतं. न्याहरीला त्यांनी ताज्या जॅमबरोबर क्रोएसाँही खाल्लं.
 
त्याबरोबर त्यांनी भरपूर दूध घातलेली कॉफी बनवली. साडेअकराच्या सुमारास त्यांनी बोट सोडली. कारण त्यांना डोडी यांच्या वैयक्तिक विमानाने पॅरिसला जायचं होतं. त्यांच्याबरोबर डोडी यांचा बटलर आणि मालिश करणारा होता. कारण डोडी यांच्या पाठीचं दुखणं बळावलं होतं.
 
त्यादिवशी डोडी यांच्या कॅलेंडरमध्ये एकच गोष्ट दिसते आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांना आपल्या वडिलांच्या रिट्स हॉटेलजवळच्या एका ज्वेलरच्या दुकानातून अंगठी घ्यायची होती. संध्याकाळी ते दोघे रिट्झ हॉटेलला पोहोचले. डायना केशरचनेसाठी सलूनमध्ये गेल्या. डोडी ज्वेलरला भेटण्यासाठी गेले.
 
प्रसिद्ध पत्रकार क्रिस्तोफर अँडरसन यांनी 'द डे डायना डाईड' या पुस्तकात लिहिलं आहे. सुरुवातीला ते दोघे पॅरिसमधल्या शे बेनॉय या रेस्टॉरंटमध्ये गेले. मात्र तिथे फोटोग्राफरचा जत्था बघून हॉटेल् रिट्झच्याच डायनिंग रुममध्ये आले. डायना यांनी तिथे व्हेजेटेबल टेंपुरा ऑर्डर केलं तर डोडी यांनी ग्रिल्ड टरबोट मच्छी मागवली.
 
ऑर्डर करताक्षणी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. कारण अनेक नजरा त्यांच्यादिशेनेच रोखल्या गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या डायनिंग रुममधून निघाल्या. ऑर्डर इंपिरियल स्वीटमध्ये पोहोचवण्याचा आदेश त्यांनी दिला.
 
अँडरसन पुढे लिहितात, डोडी यांनी पापराझीला टाळण्यासाठी एक योजना तयार केली. ड्रायव्हर आणि अंगरक्षकाला भासवायचं की समोरच्या गेटने बाहेर पडणार आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा प्रतीक्षा करत असेल. त्याचवेळी डोडी मागच्या दरवाज्याने दुसऱ्या मर्सिडीजमधून बाहेर पडतील.
डोडी यांची ही कल्पना यशस्वी ठरली. मात्र त्यादिवशी त्यांचा ड्रायव्हर आनरी पॉलने मद्यपान केलं होतं. फ्रान्समध्ये वाहतूक करतानाचे जे नियम आहेत त्यापेक्षा ड्रायव्हरने केलेल्या मद्यपानाची पातळी जास्त होती. नंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये प्रोजेक आणि टियाप्राइडल अशा घटकाचे अंश मिळाले. अँटी डिप्रेसेंट म्हणून त्यांचा वापर केला जातो.
 
जसं डोडी आणि डायना गाडीतून निघाले तसं फोटोग्राफर्सना कळलं आणि मोटारसायकलींचा ताफा मागे लागला. डोडी यांच्या ड्रायव्हरने त्यांना गुंगारा देत आयफेल टॉवर्सजवळच्या पो दे अलमा बोगद्यात गाडी शिरली. फोटोग्राफर्सना चकवा देण्यासाठी जात असताना ठीक 12 वाजून 23 मिनिटांनी गाडी काँक्रिटच्या खांबाला जाऊन धडकली.
 
या धडकेपूर्वी काही क्षण आधीच डोडी यांचे अंगरक्षक ट्रेव्हर रीस जोन्स यांनी सीटबेल्ट लावला होता. त्या गाडीतल्या चारपैकी तेच फक्त जिवंत राहिले. एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आम्ही सेन नदीच्या किनारी होतो. तेवढ्यात एका जोराचा आवाज आला. कोणीतरी जवळून बंदुकीचं फायरिंग करतंय असा तो आवाज होता. तेवढ्यात गाडीचे टायर जमिनीला जोराने घासत गेल्याचा आवाज आला.
 
दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की मी आणि गर्लफ्रेंड अन्य काही पर्यटकांसह बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात होतो. गाड्यांची वाहतूक कूर्म गतीने सुरू होती. तेवढ्यात जोरदार धमाका झाला. आम्ही सगळेच त्या गाडीच्या दिशेने धावलो जेणेकरून पीडितांना मदत करता येईल.
 
1 वाजून 20 मिनिटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यामध्ये डॉ. अरनॉल्ड डोरोसी होते. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आम्हाला गाडी मिळालीच नाही, गाडीचा चक्काचूर झाला होता. ड्रायव्हर आणि डोडी यांचा जागीच मृत्यू झाला होता. दहा बारा फुटांवर एक माणूस पडला होता. वैदयकीय चमू त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता.
 
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा राजकुमारी जिवंत होती. त्या गाडीच्या मागच्या बाजूला बसल्या होत्या. त्यांचं अर्ध शरीर जमिनीवर आणि अर्ध गाडीत होतं. त्या जवळपास बेशुद्ध होत्या आणि आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या.
 
बीबीसीने त्यांना विचारलं, तुम्हाला आठवतंय का की त्या काय म्हणत होत्या? डॉक्टर म्हणाले, ते सांगणं कठीण आहे कारण त्या जवळपास बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना खूप वेदना होत होत्या. शब्द कसेबसे जुळवत मला खूप त्रास होतोय असं त्या सांगत होत्या.
 
अँडरसन पुढे लिहितात, लेडी डायना यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिका थांबवून त्यांना एईडी आणि सीपीआर देण्यात आला.
 
पावणेदोन वाजता फ्रान्समधले इंग्लंडचे राजदूत मायकल रे यांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने राणी एलिझाबेथ यांचे खाजगी सचिव रॉबिन जैनविन यांना कळवलं. 2.1 वाजता डायना यांना घेऊन आलेली रुग्णवाहिका रुग्णालयाच्या प्रांगणात आली.
 
रुग्णवाहिकेतून आलेल्या अनेकांनी नंतर मुलाखती दिल्या. लेडी डायना यांना सीपीआर देणारे पॅरामेडिक झेवियर गुरमिलॉन यांनी सांगितलं की, डायना यांच्या शरीरावर रक्ताचा एकही थेंब नव्हता.
 
सीपीआर देत असताना या महिला कोण आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांच्या हृदयाला आराम पडावा म्हणून त्यांनी उपचार केले, त्यांना थोडं बरं वाटू लागलं. रुग्णवाहिकेत त्यांना झोपवण्यात आलं तेव्हा त्यांचा श्वास सुरू होता. मला असं वाटलेलं की त्या यातून नक्की वाचतील.
 
वाटेत डायना यांची प्रकृती ढासळल्याने रुग्णवाहिका थांबवून उपचार करण्यात आले. रुग्णालयात त्यांना श्वासोच्छवास करण्याकरता कृत्रिम उपकरण बसवण्यात आलं.
 
रुग्णवाहिका कमी वेगाने आणण्यात आली याचं कारण रुग्णवाहिकेचं सारथ्य करणारे मायकेल मेसेबियू यांनी सांगितलं. डायना यांचा रक्तदाब खूप खाली गेला होता. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते.
 
दरम्यान चार वाजेपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र ते लेडी डायना यांचा जीव वाचवू शकले नाहीत.
 
लंडनमध्ये डायना यांचे बटलर पॉल बरेल तसंच डायना यांची मैत्रीण ल्युसिया फ्लेचा डे लीमा यांना दूरध्वनी करून अपघाताविषयी कळवण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल यांनी दूरध्वनी करून लीमा यांना कळवलं.
 
पॉल बरेल मिळेल ते विमान पकडून पोहोचले. अ रॉयल ड्युटी पुस्तकात ते लिहितात, 'डायना यांच्या अपार्टमेंटमध्ये मागून प्रवेश केला. तिथली शांतता काळजाला घर करणारी होती. मी त्यांच्या टेबलाजवळ पोहोचलो. तीन छोट्या घड्याळांची टिकटिक सुरू होती.
 
डझनभर पेन्सिली होत्या. पत्रात लिहायच्या शब्दांची यादी होती. इंग्रजी भाषेतील स्पेलिंग मोठ्या प्रमाणावर येत नाहीत हे त्यांनी कधी लपवलं नाही. त्यानंतर मला दिसल्या जपमाळा. मदर तेरेसा यांनी त्यांना या जपमाळा दिल्या होत्या. जिझसची छोटी मूर्तीही होती.
या वस्तू मी ताब्यात घेतल्या. त्या टेबलवर डायना यांचं आवडतं फाऊबर्ग24 परफ्युमची अर्धी बाटली होती. पेंटीन हेअरस्प्रे, कॉटन बड्सने भरलेला ग्लास, अनेक लिपस्टिक्स होत्या. अपघातानंतर डायना यांचे कपडे खराब अवस्थेत असतील हे मला लक्षात आलं. आपण अशा स्थितीत दिसणं त्यांना कदापि आवडणार नाही हे लक्षात आलं. मी राजदूतांच्या पत्नी सिल्व्हिया यांच्याशी बोललो. त्या मला वॉर्डरोबच्या दिशेने घेऊन गेल्या. त्या म्हणाल्या, यातला जो ड्रेस तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही घेऊन जा. काळ्या रंगाचा ड्रेस, हिलवाल्या चपला यांची आम्ही निवड केली. आम्ही त्वरेने रुग्णालयाच्या दिशेने निघालो.'
डायना यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या खोलीत बरेल यांना नेण्यात आलं. तिथल्या लोकांनी त्यांना सावरलं. ते याविषयी लिहितात, 'ज्या व्यक्तीच्या छोट्या मोठ्या गोष्टी सांभाळतो आहे ती आता निघून गेली आहे. त्या शांतपणे पहुडल्या होत्या. मानेपर्यंत त्यांचा चेहरा झाकण्यात आला होता. मी आजूबाजूला पाहिलं तर गुलाबपुष्पांचे गुच्छ दिसत होते. फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मानवंदना म्हणून ते पाठवले होते.
 
मी आणलेला काळा ड्रेस, चपला संबंधितांना दिल्या. जपमाळ त्यांच्या हातात देता येईल का विचारलं. त्यानंतर त्यांना तो ड्रेस परिधान करण्यात आला.
 
पॅरिसमध्ये त्यांचं पार्थिव पोहोचल्यानंतर जग्वार कारमधून रुग्णालयात नेण्यात आलं. एका मोठ्या शवपेटीत त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्यांचा चेहरा दिसत होता. आदरांजलीसाठी आणण्यात आलेल्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत होता.
 
तिथल्या वातानुकूलित यंत्राच्या हवेमुळे डायना यांचे केस हवेत विहरले तेव्हा चार्ल्स भावुक झाले. मात्र त्यांनी स्वत:ला सावरलं. या आघाताने दु:खी मंडळींचं त्यांनी सांत्वन केलं. डायना यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले.'
डायना यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये आणण्यात आलं तेव्हा पंतप्रधान टोनी ब्लेअर तिथे उपस्थित होते. विमानातून एका गाडीत त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. गाड्यांचा ताफा मध्य लंडनच्या दिशेने सरकला. जागोजागी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती.
 
6 सप्टेंबर 1997च्या सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला. लाखो लोक त्यावेळी उपस्थित होते. त्याचदिवशी वेस्टमिन्स्टर ऍबी इथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रसिद्ध गायक एल्टन जॉन यांनी डायना यांच्या सन्मानार्थ गीत सादर केलं. त्याचे शब्द होते- गुड बाय इंग्लंड्स रोझ... यू लिव्ड युअर लाईफ लाइक अ कँडल इन द विंड.