शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified गुरूवार, 10 जून 2021 (11:10 IST)

नुसरत जहाँ यांनी निखिल जैन यांच्यासोबतचं आपलं लग्न अवैध असल्याचं का म्हटलं?

- प्रभाकर मणि तिवारी
बंगाली सिने अभिनेत्री नुसरत जहाँ दोन वर्षांपूर्वी खूप चर्चेत होत्या. कारण राजकारणात पाऊल टाकत त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावरून लढवली आणि बशीरहाट मतदारसंघातून त्या मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.
 
त्यानंतर महिनाभरातच त्यांनी निखिल जैन या मारवाडी व्यापाऱ्यासोबत तुर्कीमध्ये लग्न केलं. नंतर त्या कधी दुर्गापूजेला ढोल वाजवताना बातम्यांमध्ये दिसल्या तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे त्या बातम्यांमध्ये झळकल्या. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आहेत.
 
पण यावेळी कारण वेगळं आहे.
 
पती निखिल जैन यांच्यावर वेगवेगळे आरोप करत, आपलं लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
पश्चिम बंगालमधल्या कदाचित सर्वात प्रसिद्ध अशा या नुसरत - निखिल जोडीचे परस्परसंबंध इथपर्यंत येण्याची कल्पना कदाचित कोणीही केली नव्हती.
 
एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशा गोष्टी या प्रकरणी घडतायत.
 
लोकसभेच्या वेबसाईटवर पतीचं नाव
नुसरत जहाँ यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये कदाचित विविध भूमिका रंगवल्या असतील. पण खऱ्या आयुष्यातही फिल्मी घटना घडतील असं त्यांना कधी वाटलं नसावं.
 
आपण निखिलसोबत कधी लग्न केलंच नव्हतं असा दावा नुसरत यांनी केलाय.
 
पण लोकसभेच्या वेबसाईटवर पश्चिम बंगालच्या खासदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे आणि त्यामध्ये त्या विवाहीत असून त्यांच्या नवऱ्याचं नाव निखिल जैन असल्याचं म्हटलंय.
 
पण हा वाद नेमका सुरु कसा झाला? खरंतर नुसरत आणि त्यांच्या नवऱ्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या गेले सहा महिने अधूनमधून येत होत्या. पण नुसरत वा निखिल यांच्यापैकी कोणीही त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.
 
त्यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार असलेल्या यश दासगुप्ता यांच्याशी त्यांची जवळीक वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी हे दोघांनी एकत्र अजमेर शरीफ सह इतर काही शहरांना भेट दिली होती.
 
तस्लिमा नसरीन यांची फेसबुक पोस्ट
नुसरत गर्भवती असल्याच्या बातम्या आल्यापासून याबद्दल चर्चा व्हायला लागली. नुसरत आणि निखिल गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.
 
या प्रश्नाचं उत्तर शोधताना या जोडप्याच्या खासगी आयुष्यातल्या काही गोष्टी समोर आल्या आणि खुद्द नुसरतनेच या सगळ्याला सुरुवात केली.
 
नुसरत गरोदर असतील तर हे बाळ कोणाचं, याविषयीची चर्चा गेले पाच दिवस सुरू आहे.
 
जर या अफवा खऱ्या असतील तर निखिल आणि नुसरतचा घटस्फोट झालेला बरा नाही का, अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलीय.
 
त्यानंतर आपलं निखिलसोबत लग्न झालं नसल्याचा दावा नुसरतनी केला. हे लग्न नव्हतं तर लिव्ह - इन रिलेशनशिप होती, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आपण पूर्वीच विभक्त झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
आंतरधर्मीय विवाह
 
भारतामध्ये दोन धर्मांमधल्या लग्नांना विशेष विवाह कायद्यानुसार मान्यता मिळणं गरजेचं असतं, पण आपण असं न केल्याने निखिल यांच्यासोबतचं आपलं लग्न कधीच वैध नव्हतं असं नुसरत जहाँ यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.
 
नुसरत म्हणतात, "हे लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याने घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही खूप आधीच वेगळे झालो. पण मी याबद्दल काही बोलले नाही कारण मला या गोष्टी खासगी ठेवायच्या होत्या."
 
व्यापारी निखिल जैन यांच्यासोबत टर्कीमध्ये जून 2019मध्ये नुसरत जहाँ यांनी लग्न केलं. त्याच वर्षी लोकसभा निवडणूक जिंकत त्यांनी राजकीय कारकीर्दीलाही सुरुवात केली होती. त्यानंतर कोलकात्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनला ममता बॅनर्जींनीही हजेरी लावली होती.
 
लग्नानंतरच्या काही दिवसांपर्यंत सारं काही आलबेल होतं. पण त्यानंतर मात्र त्यांच्यात काही बिनसल्याचं म्हटलं जाऊ लागलं. नुसरत आणि भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले अभिनेते यश दासगुप्ता यांच्यात जवळीक असल्याची चर्चा व्हायला लागली.
 
निखिल जैन यांचं म्हणणं
आपल्या बँक खात्यांमधून बेकायदेशीरपण पैसे काढण्यात आल्याचा आरोपही नुसरत यांनी निखिल यांचं नाव न घेता केला.
 
निखिल जैन हे कोलकात्यातले एक व्यावसायिक असून लग्नाच्या वर्षभर आधी कोलकात्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती.
 
नुसरत यांच्या गर्भवती असण्याबद्दल आपल्याला माहिती नसून दीर्घ काळापासून आपण नुसरतच्या संपर्कात नसल्याचं निखिल यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितलं.
 
नुसरतपासून वेगळं होण्यासाठीचा अर्ज आपण कोलकात्यामध्ये दाखल केला असून हे प्रकरण कोर्टात असल्याने निखिल यांनी पत्रकारांना यापेक्षा अधिक काही सांगता येणार नसल्याचं म्हटलं.
 
ते म्हणाले, " गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासूनच मी नुसरतपासून वेगळा राहतोय. नुसरतला दुसऱ्या कोणासोबत रहायचं असल्याचं मला ज्या दिवशी समजलं, त्याच दिवशी मी दिवाणी खटला दाखल केला होता. लग्नाची नोंदणी न केल्याने मी हे लग्न बरखास्त करण्यात यावं, असं अपील केलं आहे. जुलैमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल."