सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (19:23 IST)

Pune Fire: मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे पुन्हा चर्चेत का आलेत?

अनघा पाठक
"तुमचे आई-वडील, नातेवाईक, भाऊ, बहीण कुठे काम करतात ती जागा जाऊन पहा," अशा आशयचं वक्तव्य मराठी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या एका कंपनीला लागलेल्या आगीनंतर केलं होतं.
 
मुळशी तालुक्यातल्या उरवडे गावात सोमवारी, 7 जूनला, एका केमिकल फॅक्टरीत आग लागल्यामुळे 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातल्या औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या प्रश्नांबद्दल प्रवीण तरडे सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात भावना व्यक्त करतायत.आगीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्हही केलं होतं.
तिथे जाऊन आसपासच्या 129 गावांमधल्या सरपंचाना एकत्रित करून या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करायला कंपन्यांना भाग पाडणार असल्याचंही त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
प्रवीण तरडे नक्की काय म्हणाले?
"आग लागल्यानंतर आमच्या मुळशीच्या पोरांनी त्या 18 डेडबॉडी बाहेर काढल्यात. इथे भिंतीला लावून मशीन ठेवलेली दिसतायत. कुठे त्या भगिनी उभ्या असतील, नक्की काय झालं असेल, याचा विचार करायला हवा. अतिनिष्काळजीपणा हा ठरवून केलेल्या गुन्ह्यासारखाच असतो," असं ते फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना दिसतंय.
"मुळशीतल्या प्रत्येक गावच्या लोकांना मी विनंती करतो की या कंपन्या येऊन आतून पाहा. आपली आई, बहिणी, भाऊ नवरा, बायको कुठे काम करतात ते जाऊन पाहा, नाहीतर आपले भाऊबंद असेच जळून मरतील," असंही ते पुढे म्हणाले होते.
 
मुळशीतल्या शेतजमिनी, त्यावर लँडमाफियांचं झालंलं आक्रमण, जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यानंतर गुन्हेगारी टोळ्यांचा झालेला उदय यावर तरडेंनी 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपटही काढला होता.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "या भागाला मुळात MIDC का म्हणायचं हा प्रश्न आहे. मी स्वतः तिथे तीन वर्षं काम केलं आहे. पण MIDC ला लागू होणारी कुठलीच गोष्ट तिथे नाहीये. सगळ्या प्रकरणात व्हिलन कोण असेल तर व्यवस्था. इथला ले-आऊट सँक्शन कोणी केला? सेफ्टी ऑडिटला कोणी मान्यता दिली, फायर ऑडिट कोणी दिलं? याच्यावर कोणी बोलताना दिसत नाही."
 
या भागात ज्यांनी काम केलंय आणि आता रिटायर्ड झालेत अशा लोकांना जाऊन भेटणार आहे असंही तरडे म्हणाले. "मला हे विचारायचं आहे की लेआऊट नक्की सँक्शन होतो कसा? मी शेतकऱ्यांचं दुःख मांडलं, त्यापेक्षा इथल्या कामगारांचं दुःख भयाण आहे. लोक प्रचंड वाईट परिस्थितीत काम करत आहेत."
 
'कंपनीत आग लागू शकते, पण माणसं का वाचू शकली नाहीत'
कंपनीत आग लागणं काही नवीन नाहीये, पण माझा प्रश्न असा आहे की इथली माणसं का वाचली नाहीत? असाही प्रश्न तरडेंनी विचारला आहे.
 
"जर माणसांचे जीव वाचले नाहीत तर इथे नक्कीच काहीतरी चुकलंय. कंपनीच्या मालकालाही बोलून अर्थ नाहीये कारण 18 माणसं मारण्यासाठी त्याने नक्कीच कंपनी काढली नव्हती. याआधी 10 वर्षं ही कंपनी चालूच होती. माणस मारली ती प्रशासनाने. 11 वर्षांपूर्वी 32 गुंठे जागा फायर ब्रिगेडसाठी मंजूर झाली होती पण अजूनही तिथे काही झालं नाही याचं कारण काय?"
 
या व्यवस्थेसाठी 130 कोटी लोकांच्या देशात 18 लोक मरणं अतिशय लहान गोष्ट आहे असंही तरडे म्हणतात. "राजकीय लोक फक्त त्या दिवशी भेट देतील, सांत्वन करतील, जमलं तर अनुदान देतील. पण ही व्यवस्था अशीच राहील आणि उद्या अजून 18 मरतील, परवा 36 मरतील..."
 
मुळशी पॅटर्नमधून मांडली पुण्याच्या गुन्हेगारी टोळ्यांची कथा
एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचं स्वरूप बदललं. रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचं चित्रण आपल्याला 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात पाहायला मिळालं.
शहरांच्या बेसुमार वाढीमुळे गावांची कशी दुर्दशा होते याचं चित्रण मी माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटात केलं होतं."
 
लेखक आणि पत्रकार बबन मिंडे यांनी या विषयावर 'लॅंडमाफिया' नावाची कादंबरी लिहिली आहे. "2000 पूर्वी लोकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती. जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती. पण 2000 नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो."
 
"आयटी क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलू लागला. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले. त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधीकधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरीला चालना मिळाली," मिंडे सांगतात.
 
गणपतीच्या सजावटीवरून ट्रोल
गणपतीसाठीच्या पुस्तकांच्या सजावटीमध्ये भारताचं संविधान गणपतीच्या पाटाखाली ठेवल्याबद्दल अभिनेता - दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर सोशल मीडियातून टीका झाली होती. यानंतर तरडेंनी एका व्हिडिओद्वारे याबद्दल माफी मागितली होती.
घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करताना प्रवीण तरडेंनी त्यासाठी पुस्तकांची आरास मांडली होती. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. पण या देखाव्यात भारताची राज्यघटना गणपतीच्या पाटाखाली ठेवण्यात आल्याचं अनेकांनी तरडेंच्या लक्षात आणून दिलं आणि यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यामुळे संविधानाची विटंबना झाल्याचं काहींनी म्हटलं होतं.
 
प्रवीण तरडे कोण आहेत?
अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार अशी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडेंची ओळख आहे. त्यांचा 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट 2018 साली आला होता.
 
या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. या सिनेमातली नन्या भाईची भूमिकाही त्यांनी केली होती. 'देऊळ बंद' या सिनेमाचं दिग्दर्शनही तरडेंनी केलं होतं. गेल्या वर्षी त्यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट आला होता.
प्रवीण तरडेंनी आपल्या करियरची सुरुवात कुंकू या सिरीयलच्या लेखनाव्दारे केली. त्यांनी कन्यादान, कुटुंब, तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांचं लेखन केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी पितृऋण, रेगे या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिले होते.
 
"माझा जन्मच मुळशी तालुक्यात झाला," असं ते म्हणतात. अजूनही त्यांचं घर तिथे आहे.
 
त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात कॉलेज जीवनात नाटकामध्ये भाग घेऊन केली. त्यांना पुण्याच्या पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत अनेक पारितोषिकंही मिळाली आहेत.
 
'1996 साली पहिली एकांकिका लिहिल्याचं' त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
प्रवीण तरडे सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात.