गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:22 IST)

अमित शाह यांच्या वक्तव्याने शिवसेना-भाजपमध्ये कायमचा काडीमोड झालाय

"शिवसेना म्हणते की बंद खोलीत वचन दिलं होतं. आम्ही दिलेलं वचन मोडणारे लोक नाही. मी बंद दरवाज्यामागे राजकारण करत नाही. जे करतो ते जाहीरपणे"
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शब्द शिवसेनेला चांगलेच झोंबले आहेत. सत्तेच्या मोहापायी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत विसरली, असं म्हणत शाह यांनी शिवसेनेला डिवचलं.
 
शिवसेना नेत्यांना शाह यांचे शब्द जिव्हारी लागले आणि त्यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, "बंद खोलीत झालेल्या चर्चेचा फायदा भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना झाला. हे सर्वांना ठाऊक आहे."
 
अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय उकरून काढल्याने शिवसेना-भाजपत पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळेच एकेकाळी राजकारणात एकमेकांचे सोबती असलेल्या या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
अमित शाह यांनी नेमकं काय म्हटलं?
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह यांनी मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेला टार्गेट केलं.
 
"सत्तेच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत तापी नदीत टाकून हे सत्तेवर बसले," या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
 
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेने मतं मागितली. याची आठवण करून देत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
 
"NDA चं सरकार बनेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं होतं. तेव्हा तुम्ही काहीच का बोलला नाहीत? अशा प्रकारचं कोणतही वचन देण्यात आलं नव्हतं," असं अमित शाह यांनी म्हटलं.
 
सत्तेसाठी आम्ही लाचार नाही- संजय राऊत
राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेक मुद्यांवर शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चिखलफेक सुरू आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं, "सत्तेसाठी खोटं बोलण्याची आमच्यामध्ये लाचारी नाही."
 
'105 आमदार, देशाची प्रचंड आर्थिक यंत्रणा, तपासयंत्रणा हाती असतानाही महाराष्ट्रात सत्ता मिळाली नाही, ही त्यांची वेदना मी समजू शकतो,' असं म्हणत राऊत यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं.
 
"मी त्यांच्या दुखात सहभागी आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. हे वास्तव त्यांनी स्विकारायला हवं," असं राऊत पुढे म्हणाले.
 
कोण खरं, कोण खोटं?
2019 च्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढले. पण, निवडणूक निकालानंतर भाजपने मुख्यमंत्री पदाचं दिलेलं वजन पाळलं नाही, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
 
शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत वेगळी चूल मांडत सत्ता स्थापन केली.
 
भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतंही वचन दिलं नसल्याची भूमिका कायम ठेवली होती. दीड वर्षानंतर अमित शाह यांनी पुन्हा हा विषय उकरून काढलाय.
 
मात्र, खरं कोण आणि खोटं कोण? हे अजूनही जनतेला समजू शकलेलं नाही. या मुद्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
 
शिवसेना-भाजपमध्ये कायमचा काडीमोड झालाय?
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून अमित शाह आणि शिवसेना नेत्यांची वक्तव्य म्हणजे या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचे सर्व मार्ग बंद झाले का?
 
यावर बोलताना राजकीय विश्लेषक राही भिडे सांगतात, "राजकारणात कोणीच-कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारण नेहमीच सत्तेसाठी सोयीनुसार केलं जातं."
 
उदाहरण देण्यासाठी त्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं उदाहरण देतात.
 
सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याच्या मुद्यावर शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली. निवडणूका वेगवेगळे लढले. पण, सत्तेसाठी पुन्हा एकत्र आलेच.
 
"सद्य स्थितीत शिवसेना महाविकास आघाडी सोबत राहील. पण, येणाऱ्या काळात काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असेल," असं त्या पुढे सांगतात.
 
भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. जीएसटी प्रणाली चुकली असली तर पंतप्रधानांची चूक मान्य करावी, असं थेट विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. भाजप नेत्यांवर टीका करण्यात उद्धव ठाकरे मागेपुढे पाहत नाहीत. त्यानंतर, शिवसेना-भाजप पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती.
 
"राजकारणात फक्त इंटरेस्ट कायम असतो"
 
वरिष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "राजकारणात फक्त इंटरेस्ट कायम असतो. मित्र-शत्रू नाही."
 
राजकीय विष्लेशकांच्या सांगण्यानुसार, 2013 साली नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपचा हात धरला. उत्तरप्रदेशात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मायावती आणि अखिलेख यादव सत्तेसाठी एकत्र आलेच होते. ही उदाहरणं विसरून चालणार नाही.
 
"सद्य स्थितीत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजपसोबत जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. पण, भविष्यात काय होईल हे आताच सांगता येणार नाही," असं अभय देशपांडे पुढे म्हणतात.
 
विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्तेसाठी चर्चा सुरू ठेवली होती, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे युती तोडण्याचं पाप कोणाचं, यावर शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरू राहील.