बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:16 IST)

प्रणिती शिंदे: काँग्रेसच्या 'आतल्या' गोष्टींमुळे आणि जास्त लॉबिंग न केल्यामुळे मंत्रिपद गेलं

काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसची नवी टीम जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 
पटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
यामध्ये प्रणिती शिंदे यांच्यासह शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे.
 
यानिमित्तानं प्रणिती शिंदे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी फोनद्वारे संवाद साधला.
 
 
प्रश्न - काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी तुमची निवड झाल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक बातम्या छापून आल्या की, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं तुम्ही नाराज होता आणि आता तुमची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसनं तुम्हाला कार्याध्यक्षपद दिलं. काय सांगाल याबद्दल?
 
उत्तर - काँग्रेस पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाला पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मजबूत करणार आहोत. आता चांगली संधी आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्यास संधी आहे. मंत्रिपद मी मागितलं नव्हतं. त्यासाठी फारसं लॉबिंग पण केलं नव्हतं.
 
प्रश्न - तुमच्या कार्यकर्त्यांनी रक्तानं सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून नाराजी व्यक्ती केली होती...
 
उत्तर - कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असतात. त्यांना आतल्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे त्यांना पत्र लिहावं वाटलं. कारण तीनदा मी आमदार झाले, हे त्यांनी बघितलं होतं. पण मी त्यांना समजावून सांगितलं आणि आता ते आनंदी आहेत.
 
प्रश्न - आतल्या गोष्टींमुळे मंत्रिपद गेलं, असं तुम्हाला म्हणायचंय का?
 
उत्तर - अगदी बरोबर.
 
प्रश्न - यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं तुम्हाला डावललं गेलं, असं सोलापूरमधील पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर समजलं. तुम्ही म्हणताय की आतल्या गोष्टींमुळे मंत्रिपद गेलं, तर काय आहेत त्या आतल्या गोष्टी?
 
उत्तर - मी मंत्रिपदासाठी जास्त लॉबिंग केलंच नाही. पक्षानं आम्हाला एवढं दिलंय अजून काय मागणार?
 
प्रश्न - महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे म्हटलं की, काँग्रेसच्या महापालिकांना पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते असं वाटतं का?
 
उत्तर -असं नाही वाटतं. कारण सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन समान मान दिला जातोय. एका वर्षात व्यवस्थितरित्या सरकार चाललंय. सामान्य लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्यानुसार सरकार चाललंय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलंय. कोरोनाची स्थिती व्यवस्थिरित्या सांभाळली. तिन्ही पक्षात चांगलं अंडरस्टँडिंग आहे.
 
प्रश्न - अशोक चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी स्वत: म्हटलं होतं, की काँग्रेसच्या महापालिकांना पुरेसा निधी दिला जात नाही....
 
उत्तर - ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. त्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही.
 
प्रश्न - नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि तुम्ही कार्याध्यक्ष. त्यामुळे आता महाराष्ट्रात आक्रमक काँग्रेस पाहायला मिळणार का?
 
उत्तर - नक्कीच. आमच्या सेटअपमध्ये तुम्हाला सोशल इंजीनियरिंग केलेलं तुम्हाला दिसेल. नाना पटोले खूप आक्रमक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन ऊर्जा काँग्रेसमध्ये निर्माण होईल.
 
प्रश्न - पण, मग यामुळे तुमचा मित्रपक्षांसोबतचा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा बॅलन्स मेंटेंन राहिल?
 
उत्तर - 100 टक्के. कारण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार. त्यासोबत पक्ष संघटना बळकट करणं हा प्रत्येक पक्षाचा मोटो असतो. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी म्हणून सोबत निवडणुका लढणार आणि दुसरीकडे आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार.
 
प्रश्न - तुम्ही कार्याध्यक्ष म्हणून वेगळं काय करणार? ज्या पक्षाला दीड-दोन वर्षांपासून केंद्रात अध्यक्षपदाचा घोळ सोडवता आला नाही, त्या काँग्रेसला महाराष्ट्रात दिशा कशी देणार?
 
उत्तर - कार्याध्यक्ष म्हणून पक्ष संघटित करणं, नवीन लोकांना संधी देणं, हे माझं मुख्य ध्येय असणार आहे आणि त्या अनुषंगानं काम करणार आहे.
 
प्रश्न - पण, दीड-दोन वर्ष झाले राष्ट्रीय पातळीवर तुमच्या पक्षाला अध्यक्ष नाहीये. तर अशा पक्षाला राज्यात दिशा कशी देणार?
 
उत्तर -पक्षाला अध्यक्ष नाही असं काही नाही. आमचे अध्यक्ष आहेत. सोनिया गांधी मॅडम आहेत, राहुलजी आहेत. आमच्या पक्षाचं लाईनअप मजबूत आहे. आमच्या पक्षात पूर्णपणे लोकशाही आहे. नाहीतर या निवडी झाल्याच नसत्या. आम्हाला सचिव, सर्वसाधारण सचिवही आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला सुरुवात करू.
 
प्रश्न - दीड दशकांपूर्वी तुम्ही राजकारणात आला. तीनदा आमदार झालात. तुम्ही आल्या त्यावेळेस अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, तुम्ही राज्यपातळीवर भूमिका निभावाल. पण तुम्ही फक्त सोलापूरपुरत्या मर्यादित राहताना दिसल्या. पक्षानं संधी दिली नाही की यामागे दुसरं काही कारण आहे?
 
उत्तर - आमदार म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रात फिरले आहे. दौरे केले आहेत. विधानसभेतील माझे प्रश्न फक्त सोलापूरपुरते मर्यादित नसून ते पूर्ण महाराष्ट्राचे आहेत.
 
प्रश्न - तुमचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीला विरोध केला, काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्याला त्यांचा विरोध होता...
 
उत्तर - काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे मग आम्ही एक समान किमान कार्यक्रम तयार केला आणि सगळ्यांनी आपापल्या कट्टर विचारसरणीवर एक एक पाऊल मागे घेतलांआणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी एकत्र आलो.
 
प्रश्न - पण, सुशीलकुमार शिंदेंनी महाविकास आघाडीला विरोध केला म्हणून तुमचं मंत्रिपद गेलं, असंही काही जाणकार सांगतात....
 
उत्तर - नाही तसं काही नाही.
 
प्रश्न - महाविकास आघाडी सत्तेत आहे. तुमचे वडील सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पण, ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे मग भाजपनं जसं ज्येष्ठ नेत्यांसाठी मार्गदर्शक मंडळ नेमलंय, तेच कल्चर आता काँग्रेसमध्ये आलंय का?
 
उत्तर - असं काहीच नाही. सगळ्या बैठकांना वडिलांना बोलावलं जातं. पूर्णपणे सहभागी करून घेतलं जातं.