1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:08 IST)

अमित शाह यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं अशी माझी इच्छा - नारायण राणे

उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत, असं कुठेच दिसत नाही. ते मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत, राज्याची आर्थिक, औद्योगिक स्थिती दयनीय आहे. प्रगत महाराष्ट्र मागे चाललं आहे. केंद्रीय गृहमंत्री शनिवारी महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं आणि भाजपचं कर्तबगार सरकार यावं, ही माझी इच्छा आहे, असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
 
शनिवारी (6 फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.
 
यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या लाईफटाईम हॉस्पिटलच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटनाबाबत माहिती दिली.
 
 
या महाविद्यालयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. उद्या (7 जानेवारी) हा कार्यक्रम संपन्न होईल, असं नारायण राणे यांनी दिली आहे.
 
नारायण राणे काय म्हणाले?
सिंधूदुर्ग जिल्ह्यात एकही वैद्यकीय महाविद्यालय नव्हतं. इंजिनिअरिंग कॉलेजही नव्हतं. त्याचप्रमाणे शासनामार्फत चालवण्यात येणारी आरोग्यसेवाही अपुरी होती. रुग्णांना कोल्हापूरला न्यावं लागत असे. अर्धे-अधिक रुग्ण रस्त्यातच आपल्या प्राणांना मुकायचे.

मी सिंधूदुर्गातून सहावेळा आमदार राहिलो आहे. इथल्या समस्या मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे आमच्या SSPM संस्थेमार्फत इथं वैद्यकीय महाविद्यालय बांधायचं ठरवलं.

पण मी काहीतरी अनधिकृत बांधकाम करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. पेपरमध्ये बातम्या छापून आल्या. पण मी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाही. सगळी परवानगी घेऊन हे बांधकाम करण्यात आलेलं आहे.

या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुख-सुविधा देण्यात आलेली आहे. या अत्याधुनिक मेडीकल कॉलेजचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होईल, असं नारायण राणे म्हणाले.

महामार्गाबद्दल नितीन गडकरींना पत्र
मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची विनंती मी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली आहे. काही ठिकाणी कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्यामुळे तिथलं काम बाकी आहे. ते लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
शिवसेना धरसोड वृत्तीची
पेट्रोल दरवाढीबाबत शिवसेनेने कधी आंदोलन केलं हे कळलं पण नाही. त्यांचा हा रडीचा डाव आहे. पेट्रोल कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे पेट्रोलची किंमत वाढली आहे.
 
शिवसेना धरसोड वृत्तीची आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत एकही कणखर नेता उरलेला नाही. त्यामुळे आंदोलनास पाठिंबा देताना त्यांना काय निर्णय घ्यावा कळत नाही. एक ना धड भाराभार चिंध्या अशी शिवसेनेची गत झाली आहे. कोण काय बोलतो, काय करतो कुणाला माहीत नाही. मातोश्रीतून बाहेर पडणार हे ठरलं होतं, पण ते काही झालं नाही. अचानक ते दिल्ली सीमेवर गाझीपूरला गेलेले दिसले.
 
काँग्रेसच्या नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. त्यांनी काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवणार असं म्हटलं आहे, पण ते कधी बनेल याबद्दल काही सांगितलं नाही. सध्यातरी भारतीय जनता पक्षाला कुणीच मागे टाकू शकत नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे.