शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (18:56 IST)

संजय राऊतः दीप सिद्धू कोण आहे, कुणाचा माणूस आहे?

गेल्या सहा वर्षांपासूनची परिस्थिती पाहिली तर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलाच गद्दार संबोधलं जातं. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येतो. कायद्याच्या पुस्तकातली बाकीची सगळी कलमं हटवून फक्त देशद्रोहाचंच कलम ठेवण्यात आलं की काय, असं आता वाटू लागलं आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
 
तसंच लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणारा दीप सिद्धू अजून का पकडला गेला नाही, दीप सिद्धू नेमका कोण आहे, कुणाचा माणूस आहे, त्याला ताकद कुणी दिली, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज (5 फेब्रुवारी) सकाळी राज्यसभेत चर्चा सुरू झाली. यावेळी संजय राऊत बोलत होते.
 
 
आंदोलन करणारे शेतकरी संपूर्ण देशाची लढाई लढत असून या शेतकऱ्यांवर मोदी सरकार अन्याय करत आहे. त्यामुळे तिन्ही कृषि कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
 
संजय राऊत काय म्हणाले?
भाषणाच्या सुरुवातीला पंधरा तासांमध्ये पंधरा मिनिटं तरी द्या अशी विनंती संजय राऊत यांनी केली.
 
पण पीठासीन सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं. संजय राऊत यांनी पुन्हा विनंती केली असता वादामध्ये आणखी अर्धा मिनिट वाया जाईल, माझ्या हातात असतं तर मी जरूर वेळ दिली असती, असं म्हणत फक्त पाचच मिनिटे मिळतील, असं नायडू म्हणाले.
 
 
यानंतर संजय राऊत यांनी आपलं भाषण सुरू केलं.
 
ते म्हणाले, "राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपण चर्चा करत आहोत. काल धर्मेंद्र प्रधान आमच्याकडे पाहून काही गोष्टी बोलत होते. वारंवार आम्हाला खरं ऐका, खरं ऐकल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते, असं ते म्हणत होते.
 
आम्ही तर गेल्या सहा वर्षांपासून सत्य ऐकत आहोत आणि असत्य हेच सत्य असल्याचं मानत आहोत. पण आजचं देशातलं वातावरण मी पाहतोय, जो सत्य बोलतो त्याला गद्दार, देशद्रोही असं संबोधलं जातं. कालसुद्धा आपण याबाबत चर्चा केली होती.
 
राऊत पुढे म्हणाले, "सरकारला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येतो. किती नावं मी तुम्हाला सांगू? आपल्या सभागृहातच संजय सिंह आहेत. त्यांच्यावरसुद्धा देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता.
 
सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेले लोकप्रिय पत्रकार राजदीप सरदेसाई यांना देशद्रोही म्हटलं गेलं. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिंघू बॉर्डरवर पत्रकारिता करत असलेल्या मनजित सिंह, धर्मेंद्र सिंह यांच्यासारख्या अनेक पत्रकार लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
 
आपल्या कायद्याच्या पुस्तकातून बाकी सगळी कलमं हटवून आता फक्त देशद्रोहाचंच कलम शिल्लक ठेवण्यात आलं की काय असं वाटू लागलं आहे. घरगुती हिंसाचार झाला तरी तुम्ही देशद्रोहाचा खटला दाखल करणार का, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी आदरणीय आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही सन्मान करत होतो आणि यापुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळालं आम्ही ते मान्य करतो. पण बहुमत खूप चंचल असतं. ते अहंकाराने चालवता येऊ शकत नाही.
 
मराठीतील महान संत तुकाराम यांनी निंदकाचे घर असावे शेजारी, असं आपल्या ओवीत म्हटलं होतं.
 
त्याचा अर्थ म्हणजे तुमच्यावर टीका करणारा, तुम्हाला आरसा दाखवणारा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असायला हवा. त्याचं घर तुमच्या शेजारीच असायला हवं. पण सध्या जो टीका करतो, निंदा करतो, त्यालाच बदनाम केलं जातं, अशी परिस्थिती आता आहे. उदाहरणार्थ, शेतकरी आंदोलन.
 
ज्या प्रकारे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न आणि षडयंत्र सुरू आहेत, ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही, शेतकऱ्यांसाठी योग्य नाही, आपल्या सगळ्यांसाठीही हे ठीक नाही, असं राऊत यांनी म्हटलं.
 
26 जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे आपले पंतप्रधान दुःखी झाले. सगळा देश दुःखी झाला.
 
पण लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान करणारा दीप सिद्धू कोण आहे, कुणाचा माणूस आहे, त्याला कुणी ताकद दिली, याबद्दल तुम्ही सांगत नाही. हा सिद्धू अजून पकडला गेला नाही.
 
पण, या प्रकरणात 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तिहारमध्ये कैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 100 पेक्षा जास्त तरूण आंदोलक बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत, पोलिसांनी त्यांचं काय केलं, एनकाऊंटर केलं की काय केलं, त्याबाबत माहिती नाही. जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत, त्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे.
 
मग आता आपल्यासाठी देशप्रेमी कोण? अर्णब गोस्वामी? ज्याच्यामुळे एका निष्पाप व्यक्तीने महाराष्ट्रात आत्महत्या केली.
 
कंगना राणावत देशप्रेमी आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित माहिती त्याने समोर आणली होती. बालाकोट हल्ल्यासंदर्भात माहिती त्यांनी आधीच सर्वांना सांगितली होती. त्याला तुमचं अभय आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केलेल्या अर्णबबद्दल तुम्ही बोलत नाही.
 
याच अर्णब गोस्वामीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्याला तुम्ही शरण देता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
 
भारत देश ज्या-ज्या वेळी एकजूट झाला, त्या-त्या वेळी आपण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटलं होतं.
 
ही गोष्ट खरी असेल तर गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाची एकजूटता तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून का केला जात आहे?
 
गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर हजारो शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. या एकजुटीमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो.
 
पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी संपूर्ण देशाची लढाई लढत आहेत. त्यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही.
 
पंजाबचे शेतकरी ज्यावेळी मुघलांविरुद्ध, इंग्रजांविरुद्ध लढले, त्यावेळी त्यांना देशभक्त म्हटलं गेलं होतं.
 
कोरोना व्हायरस संकटात लंगरमधून जेवण वाटत होता, तेव्हा तो देशप्रेमी होता. पण आता तो देशद्रोही झाला का? हा कसला अन्याय आहे? शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तुम्ही दिल्ली सीमेवर खिळे ठोकता. मोठ-मोठे बॅरिकेड लावता. हे बॅरिकेड, खिळे चीन सीमेवर लावले असते, तर ते भारतात प्रवेश करू शकले नसते.
 
सध्या सुरू असलेलं शेतकरी आंदोलनच आपली ताकद आहे. हे आंदोलन जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदुस्तान जिंदाबाद असेल. हे तिन्ही कृषि कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.