शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (18:22 IST)

चीन: तरुणांमध्ये 'बायकी' गुण येऊ नयेत म्हणून सरकार करणार शिक्षणात सुधारणा

कॅरी अॅलन
बीबीसी मॉनिटरिंग
 
चीनमध्ये शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामुळे सध्या नाराजी व्यक्त होतेय. चीनमधले तरुण 'मुलींसारखे' थोडक्यात 'बायकी' होत असल्याचं यात म्हटलं आहे.
 
अनेक ऑनलाईन यूजर्सने हा निर्णय 'सेक्सिस्ट' असल्याची टीका केली आहे. मात्र, असा समज होण्यामागे काहीप्रमाणात चीनमधले सेलिब्रिटीही जबाबदार असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
 
चीनमधले पुरुष मॉडेल 'सैन्यातल्या नायकांसारखे' बळकट आणि धष्टपुष्ट नसल्याची चिंता चीन सरकारने व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग स्वतः फुटबॉलप्रेमी आहेत आणि चीनमध्ये उत्तम खेळाडू तयार व्हावेत, अशी त्यांचीही इच्छा आहे.
 
यामुळेच गेल्या आठवड्यात चीनच्या शिक्षण मंत्रालयाने हे पत्रक जारी केलं आहे.
किशोरावस्थेत मुलांमध्ये मुलींसारखे गुणधर्म येऊ नये, यासाठी शारीरिक शिक्षणात सुधारणा करणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. यासाठी उत्तम शिक्षक भरती करण्यात येणार आहे.
 
निवृत्त अॅथलिट आणि खेळाची पार्श्वभूमी असणाऱ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, असा सल्ला पत्रकात देण्यात आला आहे. इतकंच नाही 'विद्यार्थ्यांमध्ये पुरुषत्व जागवण्यासाठी' फुटबॉलसारख्या खेळावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
 
 
चीनमध्ये प्रसार माध्यमांना स्वच्छ चारित्र्याचे 'सामाजिकदृष्ट्या जबाबदार' सेलिब्रेटी वगळता इतर कशाचंही वार्तांकन करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत शिक्षण मंत्रालयाचं हे पत्रक या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.
 
मात्र, अशाप्रकारचा काहीतरी निर्णय होईल, याचे संकेत याआधीच मिळाले होते.
 
चिनी पुरुषांमध्ये 'स्त्रियांसारख्या' आवडी
 
गेल्या वर्षी मे महिन्यात चीनच्या वरिष्ठ सल्लागार समितीचे प्रतिनिधी सी जेफू यांनी चीनमधले अनेक तरुण 'दुबळे, घाबरट आणि न्यूनगंडाने' ग्रासले जात असल्याचं म्हटलं होतं.
 
चिनी तरुणांमध्ये 'स्रियांसारख्या' आवडी वाढू लागल्याचा दावा त्यांनी केला होता. या समस्येवर 'प्रभावी उपाय काढला नाही' तर यामुळे 'चिनी राष्ट्राचा विकास आणि अस्तित्वालाच' धोका निर्माण होईल, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
मुलांची देखभाल घरातल्या स्त्रियाच करतात आणि त्यामुळे या परिस्थितीसाठी काही अंशी घरातलं वातावरणही जबाबदार असल्याचं सी जेफू म्हणाले होते.
 
इतकंच नाही तर पुरूष सेलिब्रेटींची वाढती क्रेझही यासाठी जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणाले होते, "यामुळे अनेक मुलांना आता सैन्यातल्या नायकांप्रमाणे व्हायचं नाही." विद्यार्थ्यांना संतुलित शिक्षण देण्यासाठी शाळांनी मोठी भूमिका बजावावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
 
सोशल मीडियावरून व्यक्त होतेय नाराजी
शिक्षण मंत्रालयाच्या पत्रकावर बहुतांश चिनी नागरिकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हजारो चीनी नागरिकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
एक विबो यूजर विचारतात, "स्त्रियांसारखं असणं अपमानास्पद आहे का?" त्यांच्या या पोस्टला 2 लाख लोकांनी लाईक केलं आहे.
 
आणखी एक यूजर लिहितात, "मुलंही माणसंच आहेत. भावुक होणं, घााबरणं आणि मृदू स्वभाव हे सगळे मानवी गुणधर्म आहेत."
 
एक यूजर विचारतात, "पुरुषांना कशाची भीती वाटते? महिलांसारखं होण्याची?"
 
 
"या देशात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या 7 कोटीने जास्त आहे. इतर कुठल्याही देशात एवढी असमानता नाही. एवढं पुरुषत्व पुरेसं नाही का?", असा सवालाही एका यूजरने केला आहे.
 
तर "यापैकी एकही प्रस्ताव महिलांकडून देण्यात आलेला नाही", असंही एका यूजरने म्हटलं आहे.
 
मात्र, चीनमधल्या प्रसार माध्यमांमध्ये सरकारच्या या मोहिमेविषयी काही सकारात्मक बाबीही सांगण्यात आल्या आहेत.
 
ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटलं आहे, "या मोहिमेला 'काही प्रमाणात पाठिंबा' मिळतोय. विबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनमधल्या पुरूष सेलिब्रेटींना यासाठी जबाबदार ठरवत काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. व्यापक प्रमाणावर याला 'लिटल फ्रेश मीट' म्हणून ओळखलं जातं."
 
चीनमध्ये नाजूक मानल्या जाणाऱ्या पुरूष सेलिब्रेटींसाठी ही संज्ञा वापरतात. टीएफ बॉईज हा बँड आणि गायक लू हान या श्रेणीत येतात. बास्केटबॉलपटू याओ मिंग यांना तर चीनबाहेरही बरीच प्रसिद्ध मिळाली आहे.
 
इथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे सरकारच्या पत्रकात फुटबॉलचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2050 पर्यंत चीन 'वर्ल्ड फुटबॉलमध्ये सुपरपॉवर' बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
 
मात्र, फुटबॉलसाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं नाही. फुटबॉलमध्ये सुपरपॉवर होणं, अशक्यप्राय असल्याचं म्हणत याची थट्टाही करण्यात आली.
 
2006 साली फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इटलीला विजय मिळवून देणारे मार्सेलो लिप्पी यांनी दोन वर्षांपूर्वी चीनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती.
 
आता मात्र चिनी सरकार गेल्या काही महिन्यात चीनच्या तरुणांसमोर नवे रोल मॉडल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
 
महिलांविषयी सांगायचं तर कोव्हिड-19 च्या काळात चीनी महिलांनी फ्रंटलाईनर्स म्हणून उत्तम भूमिका बजावली आहे.
 
गेल्यावर्षी अंतराळ संशोधनात चीनला मिळालेल्या यशात जोउ चेंग्यु सारख्या महिलेने मोलाची भूमिका निभावली होती. त्यानंतर 24 वर्षांच्या स्पेस कमांडर जोऊ यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती.
 
चिनी तरुणांमध्ये मजबूत आणि निडर सैन्य जवान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांप्रती अपिल कमी होत असल्याचं सी जेफू यांनी म्हटलं होतं.
 
नाजूक आणि देखण्या पुरूष सेलिब्रेटीजची लोकप्रियता कायम असली तरी आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याचा दबावही त्यांच्यावर असतो.
 
गेल्या काही वर्षात टॅटू आणि कानात बाळी घालून स्क्रीनवर दिसल्याने तिथल्या पुरूष सेलिब्रेटिंना टीकेचा सामना करावा लागला होता. 2019 साली चीनमधल्या एका पॉपस्टारचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर आला आणि यावरून बरीच टीका झाली होती.