सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

चक्का जामः शेती कायदे रद्द करण्यासाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिलीय- राकेश टिकैत

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज चक्का जाम आहे. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत 50,000 दिल्ली पोलीस, पॅरामिलिटरी आणि राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
 
शहरातील 12 मेट्रो स्टेशन्स हाय अलर्टवर आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि तारांची बंडलं सज्ज ठेवण्यात आली आहेत.
 
लाल किल्ला, जामा मशीद, जनपथ, मंडी हाऊस, आयटीओ, दिल्ली गेट, सेंट्रल सेक्रेटरिएट, खान मार्केट, नेहरू प्लेस विश्वविद्यालय या दिल्ली मेट्रोवरील स्टेशन्सची प्रवेशद्वारं बंद करण्यात आली आहेत.
 
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता ड्रोनद्वारेही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
"शेती कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर आम्ही पुढची योजना तयार करू. आम्ही सरकारसोबत दबावाखाली चर्चा करू शकत नाही," असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांचा विरोध आहे.
 
शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेत अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र चर्चा निष्फळ ठरल्या आहेत.
 
राज्यात अनेक ठिकाणी चक्का जाम सुरू आहे. दरम्यान "स्वतःच्या देशाच्या राजधानीत जायला सरकार अटकाव करत असेल तर घुसखोर आणि आतंकवादी कोण हे ठरवायची वेळ आली आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोबत वागत आहे त्यामुळं जगभरात देशाची बेइज्जती झाली आहे अडीच महिने शांततेत आंदोलन सुरू आहे पण आंदोलनात अपप्रवृत्ती घुसवून अवमान करण्याच्या घटना सरकारच्या हस्तकांनी केल्या आहेत. पण आम्ही संयम सोडला नाही", असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सांगितलं.
 
कृषी कायद्याला विरोध म्हणून आज कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केलं. शहरातल्या दाभोळकर कॉर्नर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप भाकप ,यासह इतर संघटनांनी एकत्र येत काही वेळ रस्ता रोखून धरला यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
आंदोलकांनी रस्ता बंद केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकरी कायदा रद्द करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसच मोदी सरकारचा निषेध करण्यात आला
 
विदर्भात वर्धा इथे पवनार चौकात शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत नागपूर तुळजापूर मार्ग रोखून धरला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव श्यामजीपंत येथे काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
 
प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीत हिंसाचार झाला. आयटीओ या ठिकाणी ट्रॅक्टर उलटून एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला.
 
आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून केसरिया झेंडा रोवला. त्यादिवशी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. 83 पोलीस हिंसाचारात जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.