शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:24 IST)

अर्चना कामत: जगातल्या सर्वोत्तम 25 खेळाडूंपैकी एक टेबल टेनिस खेळाडू

अर्चना गिरीश कामत सध्या महिला दुहेरी टेनिसमध्ये जगात 24व्या क्रमांकावर आहे, तर मिश्र दुहेरीत 36व्या क्रमांकावर आहे. वयाच्या 9व्या वर्षी तिनं टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.
 
तिचे आई-वडील दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत. तेच पहिल्यांदा तिचे टेनिस खेळण्यासाठीचे पार्टनर होते.
 
मी रडू नये म्हणून मुद्दामहून माझे पालक माझ्यासोबत खेळताना पराभूत व्हायचे असं ती सांगते.
 
आता अर्चनाची एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख निर्माण झाली असली तरी तिचे पालक आजही खंबीरपणे तिच्या पाठीशी आहेत.
 
खरं तर मुलीला सरावादरम्यान आणि स्पर्धांदरम्यान मदत व्हावी म्हणून अर्चनाच्या आईनं त्यांचं काम सोडलं.
 
अर्चनाला पालकांनी खेळण्यास प्रोत्साहन दिलं असलं तरी तिच्या मोठ्या भावानं तिच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि तिला खेळाकडे गांभीर्यानं बघायला शिकवलं.
 
त्यानंतर या खेळाकडे फक्त एक छंद म्हणून पाहणाऱ्या अर्चनानं या खेळालाच आपलं ध्येय बनवलं.
 
आक्रमक खेळ

अल्पावधीतच तिनं खेळासाठीची आक्रमक शैली आत्मसात केली आणि हीच शैली तिची ओळख बनली. या आक्रमक शैलीमुळे तिनं राज्य आणि राष्ट्रीय पातळींवरील स्पर्धा गाजवायला सुरुवात केली,.
 
2013मधील सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमधील विजय हा तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पाईंट ठरला. या विजयामुळे आत्मविश्वास कैकपटीनं उंचावल्याचं ती सांगते.
 
यानंतर अर्चनाने तिच्यापेक्षा क्रमवारीत अग्रणी असलेल्या खेळाडूंवर विजय मिळवला आहे.
 
गेल्या वर्षांत तिनं 2018मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी आणि भारताची क्रमांक एकची खेळाडू मनिका बत्राला दोनदा पराभूत केलं.
 
बत्राविरुद्धच्या या 2 विजयांपैकी एक विजय तिनं 2019मधील सीनियर नॅशनल गेम्समध्ये मिळवला आणि ती वयाच्या 18व्या वर्षी चॅम्पियन म्हणून उदयास आली.
 
कठोर मेहनतीनंतर यश

2014मध्ये तिनं आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केलं. मोरोक्को ज्यूनियर आणि कॅडेट ओपन टुर्नांमेंट 2016मध्ये तिनं ज्यूनियर गर्ल्स सिंगलमध्ये यश मिळवलं. तर स्पॅनिश ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेत ती सेमी-फायनलिस्टपर्यंत पोहोचली.
 
2018च्या युथ ऑलिम्पिकमधील एकेरी कामगिरीकडे ती आतापर्यंतची तिची सगळ्यात महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कामगिरी समजते. या स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली असली तरी या स्पर्धेनं महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्याचं ती सांगते.
 
तिनं मिश्र दुहेरीत ज्ञानसेकर सथियानबरोबर जोडी बनवली आणि 2019मध्ये कटक येथील राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आमची जोडी मजबूत आहे, असं ती सांगते.
 
पुढचा प्रवास

आक्रमक शैलीमुळे तिला अनेक मातब्बरांना नमवता आलं असलं तरी त्यामुळे दुखापत होण्याचाही धोका आहे.
 
ती म्हणते की, खेळ स्वतःच इतका विकसित झाला आहे की त्यानुसार चालत राहणं आणि दुखापतीपासून मुक्त राहणं, सर्वांत महत्त्वाचं आहे. यासाठी ती कठोर प्रशिक्षण घेत आहे.
 
एकेरीत सध्या जगात 135 व्या क्रमांकावर असलेल्या अर्चनाला क्रमवारीत स्थानात सुधारणा करायची आहे आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवायचं आहे.
 
अर्चनाला कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा एकलव्य पुरस्कारानं (2014) गौरवण्यात आलंय.
 
आपल्या खेळाच्या माध्यमातून भविष्यात आणखी पदकं आणि पुरस्कार मिळवण्याची तिची इच्छा आहे.