शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (17:00 IST)

अमरावती वसतिगृह घटना : आदल्या दिवशी पालकांना केला फोन आणि दुसऱ्याच दिवशी सापडला मृतदेह

aadarsh koge
अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि विद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय आदर्श कोगे या विद्यार्थ्याचा 21 जुलै रोजी संशयास्पद मृत्यू झाला. मात्र पोस्टमोर्टम अहवालात आदर्श कोगे याचा नाक, तोंड दाबून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 
गाडगे नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमाले यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
 
वसतिगृहाचे वार्डन रवींद्र तिखाडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आणि वडिलांच्या तक्रारीवरून वसतिगृहाचे वॉर्डन रवींद्र तिखाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रकरण काय?
विद्याभारती वसतिगृह हे समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत चालवलं जाते. या वसतिगृहात आदर्श कोगे हा खोली क्रमांक 1 मध्ये राहात होता. या वसतिगृहात एकूण 25 विद्यार्थी वास्तव्यास होते.
 
सकाळी स्थानिक विद्यार्थ्यांना आदर्श बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. वसतिगृहातील इतर मुलांनी त्याला नाष्टा करण्यासाठी जागं करण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही. मुलांनी याची माहिती वरिष्ठांना दिली.
 
त्यानंतर शिक्षक आणि वॉर्डन यांनी आदर्शला वसतीगृहापासून जवळच असलेल्या वालकट कंपाऊंडमधील मुरके दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं.
 
मृतक आदर्श याने त्याच्या वडिलांना 1 दिवस आधी कॉल केला होता. त्यात त्याने 'मुझे यहा नही रहना, मुझे यहा बहुत मारते' अस सांगत कॉल कट झाला व व्हाट्सअप मेसेज देखील केला होता. त्यात "मुझे बहुत मारा" असं लिहिलं होतं.
 
रात्र खूप झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी तो मेसेज वाचला नाही. रात्री तीन ते चार वाजताच्या दरम्यान आदर्शला मारल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अधीक्षकांनी वेळीच लक्ष दिले असते तर हा प्रकार टळला असता, असं पालकांचं म्हणणं आहे.
 
त्यामुळे वसतिगृहाच्या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे केली आहे.
 
शवविच्छेदनाचा अहवालात काय आढळलं?
आदर्शचे शवविच्छेदन अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात इन-कॅमेरा करण्यात आलं. आदर्शचं नाक आणि तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाला, असं अहवालात समोर आल्याचं ठाणेदार आसाराम चोरमाले यांनी सांगितलं आहे.
 
"आदर्श याचा मृत्यू नाक, तोंड दाबल्याने गुदमरून झाला आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार रवींद्र तिखाडे यांच्यावर 302 म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे," अशी माहिती गाडगे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले यांनी दिली आहे.
 
याप्रकरणी वसतिगृह प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं त्यांच्याशी संपर्क केला पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.