शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (12:06 IST)

सरकार पाडणारी शक्ती तयार करा - अण्णा हजारे

"कोणतंही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही. मात्र ते पडण्याला घाबरतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा," असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागरिकांना केलं आहे.
 
संविधान दिनाचे औचित्य साधून अण्णा हजारे यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अण्णांनी वरील वक्तव्य केलं. पण या वक्तव्याचा उद्देश नेमका काय, अण्णा हजारेंचा रोख नेमका कुणाकडे, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
 
आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी, असं मत हजारे यांनी मांडलं.
 
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरी लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. पक्ष पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्धतीनं आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. आपल्या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल,' असं अण्णा हजारे म्हणाले.