शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:51 IST)

Apple iPhone 13: नव्या आयफोनचे फिचर्स, किंमत जाणून घ्या

अद्ययावत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपल कंपनीने iPhone 13 हा बहुचर्चित फोन आज (15 सप्टेंबर) कॅलिफोर्निया येथे झालेल्या कार्यक्रमात लाँच केला आहे.
 
लवकरच अॅपल आयफोन-13 बाजारात दाखल होणार आहे.
 
नव्या आयफोनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले असून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत आकर्षक फिचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
 
नव्या फिचर्सच्या यादीतलं सर्वांत महत्त्वाचं फिचर म्हणजे पोर्ट्रेट व्हीडिओ मोड.
 
आयफोन 13 मध्ये आपल्याला व्हीडिओ पोर्ट्रेट मोडमध्येही शूट करता येऊ शकेल.
 
नवा पोर्ट्रेट फिचर
कॅमेरातील नवीन 'सिनेमॅटिक मोड' मध्ये व्हीडियो शूट करताना फोकस कुठे ठेवायचा हे आता आयफोन स्वतःच स्मार्टपणे ठरवू शकतो. एखादी व्यक्ती फ्रेममध्ये आली तर लगेच त्या व्यक्तीवर फोकस शिफ्ट होईल आणि फ्रेममधील इतर भाग डीफोकस होईल.
 
याशिवाय स्क्रिनवर टॅप करून हवं तिथे फोकस करायचं ऑप्शन आहेच.
म्हणजे आता व्हीडिओसुद्धा पोर्ट्रेट पद्धतीने (बॅकग्राऊंड किंवा फोरग्राउंड ब्लर) ठेवून शूट करता येतील आणि फोकस हवं तसं, पुढे किंवा मागे शिफ्ट करता येईल. सिनेमाच्या भाषेत 'फोकस पुल' करण्याचं काम या सिनेमॅटिक मोडमध्ये करता येईल.
 
या नव्या फिचरच्या उपयोगाने आगळ्यावेगळ्या अशा फ्रेममध्ये विविध प्रकारचे लेटेस्ट व्हीडिओ तयार करता येतील. अॅपलने याला 'पुल फोकस' असं संबोधलं आहे.
 
व्हीडिओचं चित्रीकरण केल्यानंतर तिथंच ते एडिट करण्याची सोय असलेला हा पाहिलाच मोबाईल असेल, असं अॅपलचे प्रमुख टीम कूक म्हणाले.
 
याव्यतिरिक्त मागच्या आयफोनमधील अनेक फिचर्स नव्या फोनमध्ये अपडेट करून देण्यात आले आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून अॅपलच्या मोबाईलमध्ये काही त्रुटी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
 
अॅपलच्या मोबाईलमधील मॅसेज इतरांना वाचणं शक्य असल्याच्या संदर्भात ही चर्चा करण्यात येत होती.
 
नव्या मोबाईलची घोषणा होत असताना या त्रुटीबाबत चर्चा होणं स्वाभाविक होतं.दरम्यान, त्यावर उपाय म्हणून अॅपलने सोमवारी (13 सप्टेंबर) एक सिक्युरिटी पॅच रिलीज केला आहे.
 
इतर नवे फिचर्स
अॅपल आयफोन 13 मध्ये A15 चिप, अधिक प्रखर डिस्प्ले आणि अडीच तास वाढीव बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे.
हा मोबाईल गुलाबी, लाल, निळा, पांढरा आणि काळा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नव्या आयफोनमध्ये 500 GB पर्यंतची स्टोरेज क्षमता आहे. तर त्यामध्ये किमान स्टोरेज क्षमता 128 GB इतकी देण्यात आलेली आहे. पूर्वी ही क्षमता 64 GB इतकी होती.
याशिवाय नव्या फोनमधील उपकरण पर्यावरण पूरक पद्धतीने बनवण्यात आले आहेत. फोनमधील अँटेना लाईन्स रिसायकल करण्यात आलेल्या प्लास्टीक बाटल्यांपासून बनवण्यात आल्या आहेत, असं अॅपलने सांगितलं.
गेल्या काही काळापासून अॅपल मोबाईल वापरकर्ते आपला फोन अपडेट करत नसल्याचं निदर्शनास आलं आहे.
 
वेबडश सिक्युरिटी कंपनीच्या मते, जगभरातील 25 कोटी आयफोन वापरकर्त्यांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून आपला फोन अपग्रेड केलेला नाही.
 
पीपी पोरसाईट कंपनीत कार्यरत असलेले अॅनालिस्ट पावलो पेस्काटोर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
 
ते म्हणतात, "बहुतांश लोकांनी अॅपलच्या आधुनिक फिचर्सचा अनुभव घेतलेला नाही. अनेक वापरकर्त्यांनी अद्याप 5G सुद्धा अपग्रेड केलेलं नाही."
 
अॅपलमध्ये 5G तंत्रज्ञान फक्त आयफोन 12 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन गेल्या वर्षी रिलीज करण्यात आला होता.
 
आयफोन 12 लाँच झाल्यानंतर जगभरातील सगळ्या 5G हॅँडसेट्सपैकी एकूण 25.9 टक्के वाटा आयफोनचाच असल्याची आकडेवारी IDC कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे.
 
IDC कंपनीच्या संशोधन व्यवस्थापक मार्टा पिंटो यांच्या मते, "आगामी काळात अॅपल मोबाईल विकत घेण्याचं प्रमाण वाढेल. या क्षेत्रात अॅपल वर्चस्व गाजवेल."
आयफोन 13 मिनी, प्रो आणि प्रो मॅक्स
अॅपलने आयफोन 13 सोबतच आयफोन 13 मिनी, प्रो आणि प्रो मॅक्स हे मोबाईलसुद्धा लाँच केले आहेत.
 
आयफोन 13 आणि 13 प्रो मॅक्स मोबाईलमध्ये 3 कॅमेरे आहेत. ही सर्वात प्रगत कॅमेरा यंत्रणा असल्याचं अॅपलने म्हटलं आहे.
 
यामध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि प्रो मोशन यांच्या मदतीने 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळू शकतो.
 
यामुळे फोन स्क्रोलिंग करताना, गेम खेळताना अथवा अॅनिमेशन पाहताना चांगला अनुभव मिळेल.
 
किंमत काय?
आयफोन 13 मिनीची किंमत 679 युरो (जवळपास 60 हजार रुपये) पासून सुरू होईल. आयफोन 13 779 युरो (68 हजार रुपये), आयफोन 13 प्रो 949 युरो (83 हजार रुपये) तर सर्वात टॉप मॉडेल आयफोन 13 प्रो मॅक्स 1049 युरो (92 हजार) इतकी असू शकते.