बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (12:24 IST)

इंजिनिअर्स डे : अभियांत्रिकीचं शिक्षण पू्र्ण करून इतर क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या 7 व्यक्ती

आज इंजिनिअर्स डे. हा दिवस भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.
 
पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भारतीय पालकांच्या मनात इंजिनिअरिंगचं एक विशेष फॅड निर्माण झाल्याचं पाहायला मिळेल. कोणत्याही परिस्थितीत मुलाला इंजिनिअरच बनवणारच, अशी घोषणा त्याच्या जन्मावेळीच केली जाते. पूर्वी गल्लीत शोधून न सापडणारा इंजिनिअर आता घरटी एक या प्रमाणात आढळून येतो.
 
इंजिनिअरिंगच्या याच वेडाने आमीर खान आणि राजकुमार हिरानी यांना थ्री इडियट्स चित्रपट बनवायला भाग पाडलं होतं.
 
मुलाच्या मनात काय आहे ते ओळखून त्याला हवं ते करू दिलं तर तो हमखास यश मिळवतो, असा चित्रपटाचा आशय होता.
 
पण इंजिनिअरला कोणतंही काम द्या, तो ते काम सहजपणे पूर्ण करतो, असं म्हणणारेही काही जण आहेत.
 
इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण करूनसुद्धा इतर क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सात वेगवेगळ्या व्यक्तींची आपण आज माहिती घेणार आहोत.
 
1. अरविंद केजरीवाल
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मधले अधिकारी आणि IIT चे माजी विद्यार्थी असणाऱ्या केजरीवाल यांनी आपला राजकीय पाया 2011च्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान तयार केला होता. पण त्यांनी यापूर्वीच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
 
अनेक वर्षं मग केजरीवाल पूर्व दिल्लीतल्या या भागात वीज, पाणी आणि रेशन यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर काम करत होते. 2006 मध्ये त्यांना 'उदयोन्मुख नेतृत्त्व' म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ओळखही मिळाली.
पण राजकारणात येण्याचं केजरीवाल यांचं ध्येय नव्हतंच. आयआयटीत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र राजीव सराफ सांगतात, "कॉलेजमध्ये असताना आम्ही कधी राजकारणावर बोललोही नाही. चार वर्षांत राजकारणावर चर्चा केल्याचं मला आठवत नाही. त्यामुळेच अरविंदला राजकारणात पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो."
 
2. राजेश टोपे
मराष्ट्रात सध्या राजेश टोपे हे नाव सर्वांनाच परिचित आहे. कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून ते पहिल्या फळीत कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. पण आरोग्यमंत्री टोपे हेसुद्धा इंजिनिअर आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?
 
खरंतर, राजेश टोपे पहिल्यांदा मंत्री झालेले नाहीत, प्रशासनाचा त्यांचा अनुभवही मोठा आहे. पण तरीही सर्वसामान्यांमध्ये राजेश टोपे हे नाव फारसं परिचित नव्हतं.
 
राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचे वडील अंकुशराव टोपे खासदार होते.
 
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या टोपे यांनी वयाच्या 23 व्या वर्षी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1996 साली लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली.
 
अंबड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले आणि त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र पक्षांतर्गत वादांमुळे त्यांना हे मंत्रिपद सोडावं लागलं. मार्च 2001 मध्ये पुन्हा त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर सलग 14 वर्षं आघाडी सरकारमध्ये ते मंत्रिपदावर होते.
 
3. सुधा मूर्ती
सुधा मूर्ती यांनीसुद्धा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. पण त्यांनी त्याच्याही पलिकडे जाऊन सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या स्वरूपात महिला उद्योजक म्हणून ओळख प्राप्त केली आहे.
 
सुधा कुळकर्णी-मूर्ती यांचा जन्म कर्नाटकच्या शिनगावमध्ये झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून केली.
 
टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपनीसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूरमध्ये काम केलं आहे.
 
शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. सध्या या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात.
 
4. रघुराम राजन
राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय इंटेलिजन्स ब्यूरो (IB) मध्ये वरीष्ठ अधिकारी होते.
 
राजन यांनी 7वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये घेतलं. त्यांनी 1985 ला दिल्लीतील IIT मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर IIM अहमदाबादमधून MBA ची पदवी घेतली. पुढे त्यांनी मॅसेच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्येही शिक्षण घेतलं आहे.
 
विद्यार्थी म्हणून प्रत्येक ठिकाणी ते गोल्डमेडलिस्ट होते. 2013 मध्ये त्यांची निवड भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी करण्यात आली होती. तत्पूर्वी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
5. अनिल कुंबळे
क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानलं जातं. त्यांनी भारताचे क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनसुद्धा काम केलं आहे.
 
मूळचे कर्नाटकचे असलेल्या अनिल कुंबळे यांनीही इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
 
6. अरविंद गुप्ता
खेळातून विज्ञान ही संज्ञा आपण नेहमी ऐकतो, पण या लहान मुलांना खेळातून विज्ञान शिकवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित करणारा विरळाचं. हे कार्य केल्यामुळेच अरविंद गुप्ता यांचं नाव जगभरात पोहोचलं आहे. 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या अरविंद गुप्ता यांना विज्ञान प्रसारक म्हणून ओळखलं जातं.
 
अरविंद गुप्तांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण पूर्ण केलं. लहान मुलांना विज्ञान समजावं म्हणून त्यांनी खेळणी तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला. गेल्या तीस वर्षांपासून ते मुलांना खेळातून विज्ञान शिकवत आहेत. त्यांनी स्वयंसेवकांची एक फौजच उभी केली आहे.
 
याशिवाय अरविंद गुप्ता हे अनुवादक म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत 150 पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला आहे.
 
7. सोनू सुद
सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.
मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.
 
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
 
देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजुरांना गावी जाण्यासाठी सोनू सूद मदतकार्य केलं होतं. या गोष्टीची खूप चर्चा त्यावेळी झाली होती. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं होतं.