गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (10:34 IST)

अटल बिहारी वाजपेयी : भारताला अण्वस्त्रसज्ज बनवणारा कविमनाचा पंतप्रधान

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिन. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारत एक अण्वस्त्र सज्ज देश म्हणून उदयाला आला. त्यामुळे पाकिस्तानबरोबर संबंध तणावपूर्ण होण्याची भीती होती.
त्यातच काश्मीरमुळे हा तणाव आणखीच वाढला. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात तणाव आधीपासून होताच.
वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या संपूर्ण कार्यकाळात वेगवेगळ्या विचारसरणीच्या आघाडीच्या पक्षांची मोट बांधून ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. असं असलं तरी भारताचं हित जपणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 25 डिसेंबर 1924ला झाला. ग्वाल्हेरच्याच विक्टोरिया कॉलेज (आजच्या लक्ष्मी बाई कॉलेज) त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कानपूरच्या DAV कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली.
स्वातंत्र्यपूर्व काळात काही वेळ पत्रकारिता आणि समाजकार्य केलं. स्वातंत्र्यानंतर ते भारतीय जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याजवळ गेले. ऐन तारुण्यात ते पहिल्यांदा 1957 साली लोकसभेवर निवडून गेले. म्हणून त्यांच्याकडे उगवतं नेतृत्व म्हणून बघण्यात येत होतं.
1975-77 या आणीबाणीच्या काळात जेव्हा भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यापैकी एक वायपेयी होते.
 
जनसंघात अनेक राजकीय गट सामील झाले आणि त्यांनी जनता पार्टीची स्थापना केली. आणीबाणीनंतर हा पक्ष सत्तेवर सहभागी झाला.
मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्र मंत्री या नात्याने 1979 साली चीनला भेट दिली. ही भेट ऐतिहासिक ठरली.
 
सोबतच, त्यांनी पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठीही प्रयत्न केले.
 
परस्पराविरोधी गट
भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. 1984 साली जेव्हा इंदिरा गांधीनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात सैन्य पाठवलं, तेव्हा या कृतीला भाजपने पाठिंबा दिला होता.
 
मात्र इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा वाजपेयींनी तीव्र निषेध केला होता.
 
1980च्या दशकात सातत्याने भाजपमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांची फळी तयार झाली. मुस्लिमांविरोधात 1992 साली झालेल्या दंगलीत 1,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता.
 
1996च्या निवडणुकीत खचलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि भाजप सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून वर आला. इतर पक्षांशी तडजोड करून वाजपेयी यांना सरकार स्थापन केली खरी, पण संसदेत बहुमत सिद्ध करण्यात त्यांना अपयश आलं आणि अवघ्या 13 दिवसांत त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
 
 
दोन वर्षानंतर त्यांना आघाडी स्थापन करण्यात यश आलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) असं त्या आघाडीचं नाव. अशा प्रकारे वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
 
मात्र या आघाडीत असंख्य कुरबुरी होत्या. पण विरोधी पक्ष अपयशी ठरल्याने त्याचा फायदा या आघाडीला मिळाला आणि वाजपेयी सत्तेत पाच वर्षं टिकून राहिले.
 
सशक्तीकरण
सत्तेची सूत्र हाती घेतल्यावर काही आठवड्यांतच भारताने गुप्तपणे पाच अणू चाचण्या केल्या. वाजपेयींनी या चाचण्या केल्याची घोषणा केल्यामुळे भाजपचं स्थान बळकट होण्यासाठी हातभार लागला.
 
त्यांनी घोषणा केली, "आमची अण्वस्त्रं ही फक्त समाजविघातक शक्तींना लगाम घालण्यासाठी आहेत."
 
पण या चाचण्यांबद्दल जगभरात घबराट पसरली काही आणि त्यानंतर आठवड्यातच पाकिस्तानने अण्वस्त्र चाचण्या केल्या आणि . भारताच्या परराष्ट्र धोरणात काश्मीरचं कायमच अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दोन्ही देशांतील सैन्यात असलेला संघर्ष, तसंच काश्मीरमधील फुटीरवाद्यांमुळे हा वाद आणखीच चिघळला.
 
या संपूर्ण काळात 17 विविध पक्षांची आघाडी टिकवण्यासाठी वाजपेयी सातत्याने संघर्ष करत होते.
 
अखेर बहुमत मिळालं
अणुचाचण्या झाल्यानंतर त्यांनी पाकिस्ताबरोबर तणाव मिटवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर शिखर परिषदेसाठी त्यांनी लाहोरपर्यंत बसने प्रवास केला. त्यावेळी हे दोघंही अत्यंत तणावाखाली होते. परस्परांबबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी उपाय योजले तरी काश्मीरचा प्रश्न सुटला नाही.
 
1999साली भाजपला बहुमत मिळाले आणि वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी सत्ता उलथवल्यानंतर हा तणाव वाढला.
 
डिसेंबर 1999 मध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी काठमांडूला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करून अफगाणिस्तानला नेलं.
 
या विमानाला लाहोरमध्ये इंधन भरण्यासाठी थांबू दिल्याचा आरोप पाकिस्तानवर होता.
 
तणावाचा काळ
1999 साली कंदाहर विमान अपहरण प्रकरणी त्यांना काश्मिरी आतंकवाद्यांची सुटका करावी लागली.
 
वाजपेयी कायमच खुल्या बाजारपेठेचे समर्थक होते. पण विविध कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर विविध कामगार संघटना आणि सनदी अधिकाऱ्यांनी टीका केली होती.
 
मात्र उच्च तंत्रज्ञान असलेल्या कंपन्यांमुळे भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक महासत्ता म्हणून उदयाला आला आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यास मदत झाली.
पाकिस्तानबरोबर तणाव मात्र या काळातसुद्धा होताच. 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यात या तणावाची प्रचीती आली.
 
या हल्ल्यातील बहुतांश हल्लेखोर पाकिस्तानी असल्याचं पोलिसांना आढळलं आणि वाजपेयींनी 50 लाखांचं सैन्य सीमेवर पाठवलं.
 
हा तणाव पुढे दोन वर्षं होताच. त्यानंतर वाजपेयींनी पाकिस्तानबरोबर शांततेच्या वाटाघाटी सुरू होत्या. उच्चाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसुद्धा सुरू झाल्या.
 
तिबेट हा चीनचा भाग आहे असं सांगत त्यांनी चीनबरोबरचे संबंध दृढ केले. त्यामुळे चीनने भारतात गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली.
 
भाजपप्रणित आघाडी 2004 च्या निवडणुका जिंकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता पण काँग्रसने त्यांचा पराभव केला.
 
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आता एक वेगळ्या आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं.
 
40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर 2005 साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करली.
अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे वाजपेयींना सत्तेत टिकून राहण्यासाठी कुरबुरणाऱ्या आघाडीच्या पक्षांची मनधरणी करावी लागली.
 
पण जेव्हा जेव्हा सीमावर्ती भागात जेव्हा बाहेरच्या देशांनी हल्ला केला आणि भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक खंबीर नेता म्हणून ते उभे राहिले असं अनेकांचं मत आहे.