बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (11:53 IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार, शहरात संताप

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा येथील वसतिगृहात दोन मुलींवर झालेल्या अत्याचारमुळे शहरात संतापाचं वातावरण आहे.
 
याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक आणि सहाय्यक अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "राजुरा येथे खासगी संस्थेच्या वसतिगृहात मुलं-मुली शालेय शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. 6 एप्रिलला दोन मुलींची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना राजुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. स्त्रीरोग तज्ज्ञ मार्फत तपासणी केल्यानंतर अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला."
 
यापूर्वी सहा मुलींची प्रकृती बिघडली असताना वसतिगृह प्रशासनाकरवी मुलींवर खासगी डॉक्टरकडे उपचार करण्यात आले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. मात्र त्यापैकी दोन मुलींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
मुलामुलींच्या वसतिगृहात 18 मुलींना भोवळ येणे हा प्रकार माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना संशयास्पद वाटला. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
"आठ आणि नऊ वर्षाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. या मुलींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केला जात होता. त्यामुळे बेशुद्धावस्थेत घडलेल्या अत्याचाराबद्दल या मुलींना काहीच माहिती नव्हतं. अत्याचार कुणी केला, हेही त्यांना माहित नाही. त्याचबरोबर वसतिगृहात पोलिसांना पॉर्न सीडी, कंडोम आणि नशेच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत," शोभाताई फडणवीस यांनी माहिती दिली.
 
"हे एका दोघाचं काम नसून यामध्ये मोठी गॅंग सक्रिय आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल उलगडा करून आरोपींचा शोध घ्यावा, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी," अशी त्यांची मागणी आहे.
 
अशी फुटली वाचा
राजुरातील एका वसतिगृहात 130 आदिवासी मुली वास्तव्यास आहेत. यातील सात-आठ मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या मुलींची प्रकृती वारंवार बिघडत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले जात होते. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मुलींची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना इथं हलवण्यात आलं. त्यामुळंच या प्रकरणाला वाचा फुटली.
 
"दोन मुलींवर अत्याचाराचा संशय आल्यानंतर 16 एप्रिलला पुन्हा चार मुलींची मेडिकल बोर्डमध्ये स्त्री रोगतज्ज्ञामार्फत तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण सहा मुलींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच मुलींच्या तपासणीत संशयास्पद बाबी आढळून आल्या. मुलींची रक्त तपासणी आणि सोनोग्राफी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट्स अजून यायचे आहेत," असं चंद्रपूर मेडिकल बोर्डाचे अधिष्ठाता सत्यवान मोरे यांनी सांगितलंय.
 
"प्राथमिक अंदाजानुसार पाचही मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आहे. मात्र अत्याचार झाल्याचं ज्या बळावर आम्ही सांगू शकतो तो खेळाने किंवा सायकलिंग मुळेही होऊ शकतो. त्यामुळे मेडिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहचता येईल. पण गुंगीचे अति डोस दिल्याने त्यांना भोवळ येण्याचे प्रकार होऊ शकतात," असं अधिष्ठाता सत्यवान मोरे यांनी सांगितलं.
 
आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत नामांकित शाळेची योजना राबविण्यात येत. यामध्ये आदिवासी मुलांना नामांकित शाळेत दाखला देऊन त्यांची सगळी व्यवस्था करण्यात येते. चंद्रपूरच्या अशाच एका नामांकित शाळेमध्ये हा प्रकार समोर आलाय.
 
"गेल्या महिन्यात काही मुलींना भोवळ येणे, त्यांची प्रकृती खराब झाल्याचा प्रकार समोर आला होता. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र आता जो प्रकार समोर आलाय याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी" असं हायस्कुलचे सचिव अरुण धोटे यांचं म्हणणं आहे.
 
ही आदिवासी शाळा राजुराचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे यांची आहे. वर्तमान अध्यक्ष तेच आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

नितेश राऊत