मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (17:24 IST)

आयेशा आत्महत्या प्रकरण : पतीसाठी व्हीडिओ बनवला होता, सत्य काय आहे?

भार्गव परीख
बीबीसी गुजरातीसाठी
"त्याला माझ्यापासून सुटका हवी असेल तर त्याला मिळाली पाहिजे. मी खुश आहे की मी अल्लाहला भेटेन. मी विचारेन त्यांना, माझं काय चुकलं? मला चांगले आई-वडील मिळाले, उत्तम मित्र-मैत्रिणी मिळाले, पण तरी काहीतरी उणीव राहिलीच माझ्यात किंवा कदाचित माझ्या नशिबातच ते लिहिलं होतं. पण मी आनंदात आहे. मी समाधानाने सगळ्यांचा निरोप घेतेय. मी अल्लाहकडे प्रार्थना करेन की मला कृपा करून माणसांचे चेहरे पुन्हा दाखवू नका," आयेशाचे हे अखेरचे शब्द होते.
 
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार आयेशाने आत्महत्या करण्याआधी 26 फेब्रुवारीला हा व्हीडिओ बनवला. यानंतर साबरमती नदीत उडी मारून तिने आपला जीव दिला.
 
साबरमती रिव्हरफ्रंट (पश्चिम) चे पोलीस निरीक्षक व्ही एम देसाई या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 
ते म्हणाले, "आयशाचा मृत्यू नदीत उडी मारल्यामुळे झाला. आम्हाला तिचा फोन सापडला आहे. त्याच तिच्या नवऱ्याशी 25 फेब्रुवारीला झालेल्या 70 मिनीटांच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग आहे. त्यात तिचा नवरा म्हणतो, 'मी तुला घ्यायला येणार नाही. तू मर आणि मरतानाचा व्हीडिओ करून मला पाठव. तो व्हीडिओ पाहिल्यानंतरच मी विश्वास ठेवेन की तू खरंच मेली आहेस.' या मुलीने तिच्या नवऱ्यासोबत सतत होत असणाऱ्या भांडणांमुळे आत्महत्या केलेली आहे."
पण या व्हीडिओत आयेशाने तिच्या वडिलांना तिच्या नवऱ्याविरूद्धच्या सगळ्या केसेस मागे घेऊन त्याला मुक्त करा असं म्हटलं आहे.
 
गुजरात पोलिसांनी आयेशाच्या नवऱ्याला सोमवारी, 1 मार्चला संध्याकाळी राजस्थानमधल्या पालीमधून अटक केली आहे.
 
आयेशा कोण होती?
लियाकत मक्रानी आणि हरमत बीबी यांची मुलगी आयेशा मृत्यूसमयी 23-वर्षांची होती. त्यांचं मूळ गाव राजस्थानातलं झालोर हे होतं. कामाच्या शोधात हे कुटुंब अहमदाबादला आलं आणि वाटवा इथे राहात होतं.
 
लियाकत म्हणतात, "आम्ही तिला प्रेमाने 'सोनू' म्हणायचो. ती शंभर नंबरी सोनं होती. आमच्या घरातली ती पहिली पदवीधर होती. आता ती पदव्युत्तर शिक्षण घेत MA ही करत होती."
 
आयेशा MA करत असतानाच तिला झालोरमधल्या एका श्रीमंत कुटुंबाचं स्थळ आलं.
 
लवकरच तिचं लग्न बाबू खान यांचा मुलगा आरिफशी झालं. आरिफ एका ग्रॅनाईट बनवणाऱ्या कंपनीत मॅनेजर होता. तसंच त्यांचा ग्रॅनाईट विकण्याचा व्यवसायही होता. त्याला महिन्यात साठे-एक हजाराची कमाई व्हायची.
 
लग्नाच्या वेळेस आरिफने वचन दिलं की तो आयेशाला पुढे शिकवेल.
 
हुंडा आणि घरगुती हिंसाचार
आयेशाच्या घरच्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी लग्नात तीन तोळे सोनं, एक किलो चांदी, आयेशाचे कपडे आणि रूखवताचं इतर सामान इतका हुंडा दिला होता.
 
सुरुवातीला आयेशाच्या लग्नात सगळं काही ठीक होतं असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, "आधी सगळं नीट होतं. मग आरिफ म्हणाला म्हणून तिने शिक्षण सोडलं. या काळात ती गरोदर राहिली आणि मग तिच्या छळाला सुरुवात झाली."
आयेशाच्या कुटुंबाने आरोप केलाय की तिची सासू सायराबानू आणि नणंद खुशबूबानू यांनी तिचे सगळे दागिने हिसकावून घेतले. ती गरोदर असताना तिला उपाशी ठेवलं जायचं असाही त्यांचा आरोप आहे.
 
पण बीबीसी स्वतंत्रपणे या आरोपांची पुष्टी करू शकलेलं नाही.
 
या प्रकरणी 21 ऑगस्ट 2020 रोजी वाटवा पोलीस स्टेशनमध्ये आयेशाचे सासरे गफूर खान, सासू सायराबानू, नवरा आरिफ खान आणि नणंद खुशबूबानू यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती.
 
अहमदाबादच्या घीकांता कोर्टात घरगुती हिंसाचाराच्या केसची सुनावणीही होत होती.
 
आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या 'साथ' या संस्थेत काम करणारे वकील नागेंद्र सूद यांनी बीबीसीला सांगितलं की, "पोटगी मिळण्यासाठी कलम 125 अंतर्गत महिलेला फक्त अस्थायी स्वरूपाचा आदेश मिळतो आणि सुनावणी प्रदीर्घ काळ चालते. आधीच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेली महिला अजूनच खचते. त्यात आर्थिक संकट असतंच. अशात महिलेला वाटतं की तिचे वडील आणि तिच्या कुटुंबाला तिच्यामुळे हे सगळं भोगावं लागतंय."
 
10 लाख रूपयाची मागणी आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू
आयेशाचे वडील लियाकत मक्रानी यांनी आरोप केलाय की आरिफ आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली.
 
"आयेशा गरोदर होती तेव्हा तिच्या सासरच्यांनी 10 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मी त्यांना विनवणी करून सांगितलं की माझ्याकडे 10 लाख रूपये नाहीत तेव्हा ते आयेशाला माहेरी सोडून निघून गेले."
 
तिच्या सासरचे आपल्याला आणि आपल्या मुलांना खूप घाण घाण बोलले असंही लियाकत सांगतात. "जेव्हा आयेशामध्ये पडली आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करायला लागली तेव्हा आरिफने आयेशाच्या पोटात लाथ घातली. मुलीला पाठवायचं असेल तर 10 लाख रूपये द्या असंही तो म्हणाला."
 
या घटनेनंतर आयेशाला खूप त्रास व्हायला लागला असंही तिच्या आई सांगतात. "आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा कळलं की मारहाणीमुळे तिच्या पोटातल्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. मग आम्हाला गर्भपात करावा लागला."
 
"आम्हाला वाटलं पोलिसात तक्रार केली तर आरिफ घाबरेल आणि आयेशाला छळणार नाही. पण झालं उलटच. तो आणखीन चिडला. त्याचे घरचे पैसे पुन्हा पैसै मागू लागले. मग मी कर्ज काढून त्यांना 1.5 लाख रुपये दिले."
 
या प्रकरणावर आरिफच्या कुटुंबाची प्रतिक्रिया अजून बीबीसीला मिळू शकलेली नाही.
 
"तरीही कोरोना काळात काहीतरी कारण काढून आरिफ आयेशाला घरी न्यायचं टाळायचा. त्याच्या विरुद्ध पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने आम्हाला धमकीही दिली. हे सगळं आयेशाला सहन व्हायचं नाही. ती सतत रडत असायची."
 
रात्री भांडण आणि सकाळी आत्महत्या
तिच्या आईच्या मते आदल्या दिवशी, 25 फेब्रुवारीला आयेशा आणि आरिफचं भांडण झालं होतं. "ती म्हणत होती, 'मी मरून जाईन, पण मरायच्या आधी तुझ्या इच्छेनुसार एक व्हीडिओ तुला रेकॉर्ड करून पाठवेन. सकाळ व्हायची वाट बघ फक्त."
 
26 फेब्रुवारीला सकाळी आयेशाच्या आईने आयेशाच्या वडिलांना सांगितलं.
 
लियाकत म्हणतात, "माझ्या बायकोने सांगितलं की आयेशा मरणाच्या गोष्टी करत होती. मी तातडीने आयेशाला फोन लावला. ती रडत होती. ती म्हणाली मला आणखी कोणाला त्रास द्यायचा नाहीये. माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये. मी अहमदाबादच्या नदीत उडी मारून जीव देतेय. मी तिला म्हटलं की तू आत्महत्या केलीस तर संपूर्ण कुटुंब आत्महत्या करेल. आम्ही तिला घरी परत यायला राजी केली. ती म्हणाली मी घरी येते, पण शेवटी तिने तिला हवं तेच केलं. आम्हाला पोलिसांचा फोन आला की आयेशा आम्हाला सोडून गेलीये."