मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (10:42 IST)

विधानसभा निवडणूक प्रचारात बांगड्या, नटरंग, कुंकू, तेल लावलेले पैलवान असे शब्द का येत आहेत?

नामदेव अंजना
शरद पवार यांनी अहमदनगरमधील श्रीगोंद्यातील सभेत भाजप नेते बबनराव पाचपुतेंना बांगड्या घालण्याचा सल्ला दिला. पवारांच्या या टीकेनंतर सर्वस्तरातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यात.
 
"पाचपुते 13 वर्षे मंत्री होते. इतकी वर्षे मंत्रिपद देऊनही त्यांना काहीच करता आलं नसेल, तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजे," असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
 
बबनराव पाचपुते यांनी 2014 साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी आघाडी सरकारमध्ये ते वनमंत्री, आदिवासी मंत्री अशी मंत्रीपदं भूषवली.
 
शरद पवारांनी श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेतून पाचपुतेंवर केलेल्या टीकेनं महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. पण शरद पवारच नाही तर इतर अनेक मोठ्या नेत्यांनी पुरुषप्रधान प्रतिकांचा वापर आपल्या भाषणातून केला आहे.
राजकीय वर्तुळात पुरुषप्रधान प्रतिकांचा सर्रास वापर
केवळ शरद पवारच नव्हे, तर अनेक पक्षांच्या नेत्यांनी स्त्रियांना कमकुवत ठरवण्याच्या प्रतिकांचा वापर विरोधकांवर टीकेसाठी केल्याचे दिसून येते. त्यातल्या काही निवडक टीका :
 
2013 साली राज ठाकरेंनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्यातल्या कामगिरीवर टीका करताना, 'आर. आर. पाटलांच्या घरी बांगड्या पाठवाव्यात' असं आवाहन केलं होतं.
2018 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगलीतल्या टेंभू सिंचन योजनेबाबत बोलताना म्हणाले होते, "एक वेळ तृतीयपंथीयांशी लग्न केलं तर मुलं होतील, पण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही."
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रचारादरम्यान सोनीपतमध्ये सोनिया गांधींना उद्देशून म्हणाले, "खोदा पहाड़, निकली चुहिया, वो भी मरी हुई."
शरद पवार काही दिवसांपूर्वी बीडच्या सभेत जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका करताना म्हणाले, "घरोबा एकदाच करायचा असतो. सारखे घर आणि कुंकू बदलायचे नसते, या वयात कुंकू बदलणाऱ्यांना धडा शिकवा."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जळगावमधील सभेत म्हणाले, "'नटरंग'सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही."
मुंबईत अटल स्मृती उद्यान लोकापर्ण सोहळ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'जो मर्द आहे तो मैदान सोडून पळून जात नाही.'
तुमचं सामर्थ्य दाखवण्यासाठी स्त्रीला दुबळी समजणं योग्य आहे का?
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुषांकडून महिलांचा अनादर होईल अशा प्रतिकांचा का वापर केला जात असावा?
या प्रतिकांबद्दल बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ म्हणतात, "पुरुषप्रधान व्यवस्था जवळजवळ पाच हजार वर्षं जुनी आहे. या व्यवस्थेचे परिणाम पुरूषांसह स्त्रियांच्याही मनावर आहेत. पुरूष श्रेष्ठ, समर्थ आणि बाई दुबळी, बावळट, रडकी असं या व्यवस्थेनं गृहीतच धरलंय."
 
"आपण भाषेच्या सवयीचे गुलाम असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, शरद पवार असो वा कुणीही, या सगळ्यांच्या मनात पितृसत्ताक व्यवस्थेचं अन्याय्यपण हे रूजलेलं नाहीय, ते चार पावलं पुढे टाकतात. पण तरी बाई पुरुषासारखा एक माणूस आहे, तिचा आत्मसन्मान माणूसपणाची गोष्ट आहे. हे भल्याभल्यांना कळलेलं नाही, म्हणून ते असं बोलत राहतात. म्हणून तर निर्णयप्रक्रियेत बायकांना सहभागी करून घेतलं जात नाही," असं विद्या बाळ म्हणतात.
 
सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे या अशा प्रतिकांबद्दल बोलताना म्हणतात, "राजकारणातील लोकांच्या नेणीवेतच या पुरूषप्रधानतेची प्रतिकं भरली आहेत. अशी भाषा वापरून आपण स्त्रियांना कमी आणि हीन लेखतो, याचा विचारही ते करत नसतील. तृतीयपंथी, पैलवान, नटरंग हे शब्द नेणीवेत भरलेलं आहे. आपण काही गैर बोललोय, हे लक्षातही येत नाही."
 
"तुम्ही शक्तिशाली आहात, हे दाखवण्यासाठी बायकांना किंवा ट्रान्सजेंडरना कमी लेखण्याचीच भाषा वापरली पाहिजे, हा प्रश्न आहे. मी शक्तिशाली आहे, असं दाखवलायला मी सह्याद्री पर्वत किंवा हिमालय आहे, असंही म्हणू शकता ना?" असेही किरण मोघे म्हणतात.
 
'शरद पवार लिंगभेद मानणारे नाहीत पण..'
स्त्रीवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पवारांच्या या वक्तव्याबाबत काय वाटतं, हेही बीबीसी मराठीनं जाणून घेतलं.
 
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यानी या वक्तव्याबाबत पवारांकडे नाराजीही व्यक्त केलीय. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रातल्या महिलांच्या आयुष्यात, सामाजिक, राजकीय बाबतीत पवारसाहेबांनी जे योगदान दिलंय, त्यासाठी त्यांना मानलंच पाहिजे. मात्र, बांगड्या भरण्याचा सल्ल्याबाबतचं वक्तव्य चूकच आहे. यापुढे ते असं बोलणार नाहीत, अशी मला आशा आहे."
 
"समोरून जी भाषा येते, तिला जशास तशी प्रतिक्रिया देण्याची राजकीय पद्धत पडून गेलीय. मात्र, पवारसाहेब जेवढे मला माहीत आहेत, त्यात ते कुठेही लिंगभेदभाव मानणारे वाटत नाहीत. त्यामुळं विचारमंचावरून पवारासांराख्या ज्येष्ठ नेत्यानं असं वक्तव्य करू नये," असंही वर्षा देशपांडे म्हणतात.
 
सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी रेणके म्हणतात, "शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं बांगड्या भरण्याचा सल्ला देण्याचा प्रकार मला अत्यंत वाईट वाटतो."
 
पल्लवी रेणके पुढे सांगतात की, "महिलांच्या सक्षमीकरणासाठी कुणी धोरणं केली असतील, ते पवारसाहेबांनी असं आदरानं आपल्याला सांगावं लागेल. मात्र, जो परंपरेचा पगडा आहे आणि महिलांकडे दुय्यमतेनं बघण्याची जी विचारसरणी आहे, त्यातून पगड्यातून आलेली म्हण पवारसाहेबांकडून आल्यानं वाईट वाटतंय."
 
'महिलांच्या मनगटात प्रंचड बळ'
"पन्नास टक्के स्त्रिया आता राजकारणात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आहोत. राखीव जागा नसतानाही महिला सक्रियपणे राजकारणात उमेदवारी करतायत. त्यामुळे अशावेळेला अशी प्रतिकं वापरणं आणि पुरूषसत्ताक संसंस्कृतीतून आलेले शब्द, प्रतिकं वापरणं चूक आहे," असं वर्षा देशपांडे म्हणतात.
 
पल्लवी रेणके म्हणतात, "महिलांच्या हाताचं मनगट बांगड्या घालण्यासाठीच आहे की काय, असा विचार प्रतित होतो. महिलांच्या मनगटात खूप बळ आहे. झाशीची राणी असो, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, प्रतिभा पाटील, सुषमा स्वराज अशा अनेक कर्तबगार महिला झाल्या आणि आहेत."
 
"आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायका कर्जासहित लेकरं-बाळं-आई-वडील सांभाळतातय, त्यामुळं बांगड्यांचा अनादर करू नका. पण लहानपणापासूनच संस्कार आणि भाषा या पुरूषसत्ताक संस्कृतीमध्ये त्यामध्ये अनेकजण वाढतात, शपथ घेतात समानतेची पण वर्तन मात्र तंस दिसत नाही," अशी खंत वर्षा देशपांडे व्यक्त करतात.
 
हे संपणार कधी?
स्त्रियांना दुय्यम लेखणारी ही प्रतिकं वापरणं बंद कधी होईल, याबाबत वर्षा देशपांडे या म्हणततात, स्त्रियांना अधिकाधिक सार्वजनिक आयुष्यात सक्रीय व्हायला हव्यात.
 
मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ म्हणतात, "स्त्रियांनी केवळ सार्वजनिक आयुष्यात अधिकाधिक सहभागी होऊन ही प्रतिकं नाहिशी होतील, असं वाटत नाही. बायका जेव्हा विचार करायला लागतील, माणूस म्हणून जगायला सुरूवात करतील आणि माणूस म्हणून जगणं म्हणजे विचार करून जगणं, तेव्हाच या प्रतिकांना ओलांडून पुढे जातील."
 
पवारसाहेब चुकीचे बोलले नाहीत - सक्षणा सलगर
"पवारसाहेब काहीच चुकीचे बोलले नाहीत. मी त्यांचं समर्थन करते," असं म्हणत राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना शरद पवारांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.
 
त्या म्हणाल्या, "बांगडी घातलेल्या हाताची बाई इतकं काम करू शकते, तर मर्द असून तुम्हाला काय झालंय, असं त्यांना म्हणायचं होतं. पवारसाहेबांनी उलट महिलांचा सन्मान केला. बांगड्या घातलेली महिला काम करते, मग तुमच्यानं काम होत नसेल तर बांगड्या भरून तरी काम करा. तो एक सन्मान आहे," असं सलगर म्हणतात.
 
बांगड्यांमध्ये ताकद असते. त्या ताकदीबद्दल पवारसाहेब बोललेले आहेत, असंही सलगर म्हणतात.
 
पराभव दिसू लागल्यानं अशी वक्तव्य - मनिषा कायंदे
दुसरीकडे, शिवसेना आणि भाजपमधील महिला नेत्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणतात, "बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाहीय. बांगडी घातलेल्या हातांनी खूप काही गाजवलेलं आहे. रिक्षापासून विमानपर्यंत वाहनं चालवलीत, आरबीआयची पदं भूषवली आहेत, लढाया करून रणांगणही गाजवलंय."
 
तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनीही शरद पवारांच्या बांगड्या भरण्याच्या वक्तव्यावर टीका केली. त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "बांगड्या हे म्हणजे महिलांच्या कमजोरीचं लक्षण आहे, असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. महिला सक्षम आहेत आणि पुरूषांची कॉलर पकडण्याइतक्या सक्षम आहेत."