औरंगाबादेत शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतिपदी लागली.
ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने ठरवून केलेल्या खेळीमुळे काँग्रेसचा एकही महत्त्वाचा पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू होती. बांधकाम आणि समाजकल्याण ही दोन सभापतिपदं काँग्रेसच्या वाट्याला तर शिवसेनेकडे महिला बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य ही दोन सभापतीपदं ठेवण्यात येण्यात होती.
मात्र उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली आणि तीन सभापतिपदं मिळवली. महिला आणि बालकल्याण सभापतिपदावर ठरल्याप्रमाणे शिवसेनेने पाणी सोडलं.