सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:20 IST)

मानसिक आरोग्य 'लग्न कर' च्या आग्रहामुळे बिघडू शकतं का?

सिद्धनाथ गानू
"मी मुंबईतली नोकरी सोडून 7 वर्षांनी घरी परतले, पण दुसऱ्याच दिवसापासून नातेवाईकांच्या तोंडी फक्त लग्नाचा विषय होता. मी कशी आहे, सात वर्षं मी मुंबईत काय काय केलं याबद्दल मला कुणीही विचारलं नाही," अनामिका सांगते.
 
"मी नातेवाईकांकडे जातच नाही; लग्नांनाही जात नाही; फक्त नातेवाईकांच्याच नाही तर मित्रांच्याही लग्नांना जात नाही. कारण तिथे गेलं की हाच विषय काढून लोक हॅरॅस करतात," अनिल म्हणतो.
 
अनामिका आणि अनिल ही दोन्ही बदललेली नावं आहेत. विषयाची संवेदनशीलता आणि आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे काही जवळची माणसं दुखावतील या विचाराने दोघांनीही आपली खरी नावं न लिहीण्याची विनंती केली.
 
जागा, समाज, शिक्षण यातले फरक बाजूला ठेवले तरी थोड्याफार फरकाने 'योग्य वयाच्या' अनेक मुला-मुलींना हेच अनुभव आले असतील. बरं हा 'प्रेमळ आग्रह' करणाऱ्यांचा उद्देश वाईट असतो असं नाही. पण अनेकदा या आग्रहाचा त्रास व्हायला लागतो.
'वेळच्या वेळी होऊन जाऊ दे'
तुम्ही हे संवाद केव्हा ना केव्हा ऐकले असतीलच;
 
सल्ला- 'आता शिक्षण झालंय, चांगली नोकरी लागली की करून टाकू!'
 
प्रतिसाद- 'मला या फंदात पडायचं नाही'
 
सल्ला- 'शिक्षण झालंय, आता पुढे काय करायचं ते 'आपल्या' घरी जाऊन कर'
 
प्रतिसाद- 'इतकी काय घाई आहे? अजून माझाच कशात पत्ता नाही'
सर्वसामान्यपणे मुलगा-मुलगी 'लग्नाच्या वयाचे' झाल्यानंतर हे संवाद बहुतेक घरांमध्ये सुरू होतात. पण काही वेळा या संवादांचा जाच व्हायला लागतो, मुलांनाही आणि पालकांनाही. मुलांचं सगळं नीट आणि योग्य वेळी व्हावं ही पालकांची अपेक्षा असते पण कधीकधी इतर अपत्यांचीही काळजी त्यांच्या मनात सुरू असते.
 
अनिल सांगतो, "मागची भावंडं लग्नाची राहिली असली की या चौकश्यांना आणि आग्रहाला आणखी वेग येतो. लोक म्हणतात, 'तुझ्यामुळे त्याचं राहिलंय बघ'. माझाही लहान भाऊ आहे, शेवटी मी घरात सांगून टाकलं. तुम्ही त्याचं बघायला सुरुवात करा! लहान भाऊ मला काही बोलत नसला तरी त्याच्याही मनात तसं येणं शक्य आहे. ते एकप्रकारचं अप्रत्यक्ष मानसिक दडपण असतं."
 
"घरच्यांच्या दबावाखाली घाई-गडबडीत हो म्हटल्याचे काय परिणाम होतात हे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. त्यामुळे मला तो धोका पत्करायचा नाहीय," अनिल अगदी मनापासून बोलत होता.
 
मुलींच्या बाबतीत हे समीकरण अधिक गंभीर असतं. 'वेळच्या वेळी'चं गणित लग्नापाशी थांबत नाही. "आत्ता लग्न केलंस तर वेळेवारी मुलं होतील. नाहीतर हातातून वेळ निघून जाईल बरं! या असल्या जगात एकटीने कसं काय निभावशील? एकदाचं आई-वडिलांना मोकळं कर ना. किती दिवस त्यांच्यावर दडपण ठेवणार", या सततच्या विचारणांनी नातेवाईक आणि जवळची ओळख असलेल्यांनी भंडावून सोडल्याचं अनामिका सांगते.
 
मुंबईत एका अत्यंत 'हाय प्रेशर' वातावरणात सात वर्षं काढल्यानंतर या सगळ्यापासून दूर जाऊन काही काळ शांतपणे आई-वडिलांबरोबर घालवता येईल या तिच्या योजनेला या प्रश्नांनी सुरुंग लावला. "मी घरी परत आल्यानंतरचे दोन आठवडे मला काहीच सुधरेनासं झालं. डोक्याला शांतता मिळावी म्हणून मी घरी परत आले होते. घरातही ती मिळणार नसेल तर मग मी कुठे जायचं?" ती पुढे सांगते.
नोकरीतून ब्रेक घेऊन अनामिका घरी परत आली होती, पण या सततच्या चौकश्यांना कंटाळून तिने लगेचच दुसरी नोकरीची ऑफर स्वीकारली. याचं स्पष्टीकरण देताना अनामिका म्हणते, "घरच्यांबरोबर समारंभांना जायचं टाळण्यासाठी आता माझ्याकडे नोकरीचं कारण असेल. कारण तिथे गेल्यावरही सगळे लग्नाचाच विषय काढून बोलतात."
 
काळजीचं ओझं कसं होतं?
प्रेमापोटी, काळजीपोटी सांगितलेल्या या अत्यंत वैयक्तिक, खासगी गोष्टीचा जाच कसा काय व्हायला लागतो? पार मानसिक स्वास्थ्य बिघडण्यापर्यंत मजल कशी जाते? याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो.
 
"आपण आपल्या मुलांना लग्नाचा आग्रह का करत आहोत याचं ठोस उत्तर पालकांकडे असायला हवं. त्यांचं भलं व्हावं म्हणून हे करतोय की इतर कुणाच्या सांगण्यामुळे हे करतोय? इतरांच्या मुलांची लग्नं झाली आहेत म्हणून आपण आग्रह करतोय का याचाही त्यांनी विचार करावा", क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तेजस्विनी भावे सांगतात.
 
कुणाच्यातरी आग्रहाला बळी पडून लग्नाला होकार दिल्यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळाल्याचं तेजस्विनी सांगतात.
 
Anxiety- म्हणजे सतत चिंता वाटणं हे त्याचं एक उदाहरण झालं. याची परिणती पुढे अनेक गोष्टींमध्ये होऊ शकते. आत्मविश्वास गमावणं, आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाबद्दल शंका वाटणं, काही टोकाच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येचे विचार मनात घोळणं अशाप्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात असंही त्या म्हणतात.
पण एकाच कुटुंबातल्या दोन पिढ्यांमध्ये या एका मुद्द्यावरून मतभेद का होतात? मानसोपचारतज्ज्ञ डॉ. तुषार भट सांगतात, "मुळात सेटल होण्याची व्याख्याच बदलली आहे आणि लग्न ही काही त्यांची प्राथमिकता राहिलेली नाही. मुला-मुलींची प्राथमिकता त्यांचं करिअर असतं. फक्त नोकरी लागली म्हणजे झालं असं त्यांना नाही वाटत."
 
एखाद्या व्यक्तीने या आग्रहापायी जर मनाची तयारी झालेली नसताना लग्नाचा निर्णय घेतला तर त्याचे मानसिक आरोग्यावरचे संभाव्य परिणाम सांगताना डॉ. भट म्हणतात "अशा लोकांमध्ये अॅडजस्टमेंट डिसऑर्डर पाहायला मिळते. त्यांना कुठल्याच प्रकारे तडजोड करता येत नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये याची परिणती घटस्फोटात होते."
 
'एकमेकांशी संवाद महत्त्वाचा'
पण मुळात परिस्थिती इतकी टोकाला जाऊच नये यासाठी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोपं आहे. परस्परांमधील संवाद.
 
तेजस्विनी सांगतात, "करिअर काउन्सेलिंगच्या वेळी पुढे लवकर लग्नाचं प्रेशर नको म्हणून बाहेरगावी नोकरी घेतो किंवा परदेशातच जाते असं म्हणणारी अनेक मुलं मी पाहिली आहेत. पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही. मुलं पौगंडावस्थेत येतात तेव्हापासूनच पालकांचा त्यांच्याबरोबर खुला संवाद असणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढचे त्रास टळू शकतात."
डॉ. भट पालकांच्या किंवा घरातल्या इतरांच्या या आग्रहाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात. ते म्हणतात, "पालकांनी आणि मुलांनी एकमेकांच्या दृष्टीकोनातून विचार करायला हवा. मुलांनी स्वतःसाठी एक टाईमलाईन आखून घ्यावी. वयाच्या कोणत्या टप्प्यावर आपल्याला लग्न करायचं आहे हे त्यांनी ठरवावं. पण बायोलॉजिकली पाहता फार उशीर करू नये. कारण नंतर आरोग्याशी निगडित समस्या उद्भवतात. या सगळ्याबद्दल कुटुंबातल्या सदस्यांचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे."
 
मुळात लग्न करण्यामागचं कारण, लग्नसंस्थेवरचा विश्वास, लिव्ह-इन रिलेशनशिप, समलैंगिक संबंध, पालकांची आणि मुलांची परस्परांच्या जीवनशैली आणि विचारसरणीबद्दल असलेली समज आणि ते स्वीकारण्याची तयारी या आणि इतरही अनेक घटकांचा या निर्णयावर खोलवर परिणाम होतो.
 
अलिकडे, मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये लग्नापूर्वी दोन्ही कुटुबांनी एकत्रितपणे 'प्री-वेडिंग काउन्सिलिंग' करून घेण्याचाही प्रघात दिसतोय. परस्परांकडून असलेल्या अपेक्षा, दोन्ही कुटुंबांचं एकमेकांशी किती जुळतंय, विचारधारा याबद्दल सविस्तर चर्चा केली जाते. यानंतरच लग्नाबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जातो.
 
हा लेख लिहीण्यापूर्वी मी याबद्दलचे अनुभव विचारण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. याला अनेकांनी वैयक्तिकरीत्या प्रतिसाद दिला. कुणी घरच्यांना घाई झाल्याची तक्रार केली तर कुणी आपल्याला आपली 'स्पेस' मिळत नसल्याचं म्हटलं.
 
पुढे सगळं व्यवस्थित होतं; क्वचितच गोष्टी बिघडतात, जुळवून घेता आलं पाहिजे असा सूर काही ज्येष्ठांनी लावला. दोन्ही बाजूंचे काही अगदी रास्त मुद्दे आहेत. पण हे सगळं ऐकत असताना एक प्रश्न पडला तो आपल्या सगळ्यांना पडतो का याचा विचार आपणच करायला हवा.
 
एखाद्यासाठी 'दो जिस्म एक जान', 'नाती वरती जुळतात पण गाठी खाली पडतात', 'दोन जीवांचं मीलन' चे गुलाबी बेत आखताना त्या दोन्ही जीवांच्या मानसिक आरोग्याबद्दल आपण विचार करतोय का? 'हॅपी मॅरिड लाईफ'च्या शुभेच्छा लवकर देता याव्या म्हणून आपण त्यांचा 'हॅपिनेस' हिरावून घेत नाही आहोत ना?