शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (18:23 IST)

'लग्न होत नसल्यामुळे गावातली माणसं माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात'

श्रीकांत बंगाळे
बीबीसी मराठी
 
महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, तुम्हाला असे तरुण हमखास सापडतील, ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण काही कारणास्तव ते लांबणीवर पडत चाललं आहे.
 
माझ्या गावात (सिनगाव जहांगीर, बुलडाणा) कमीतकमी 30 जण तरी सापडतील, ज्यांचं लग्नाचं वय उलटून चाललंय असं त्यांना स्वत:ला वाटतंय आणि आता ही मंडळी प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं दिसून येत आहे.
 
जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सअपवर लग्नाविषयीचं स्टेटस ठेवलं, तेव्हा तेव्हा मला याचा अनुभव आला आहे.
 
तरुणांचे या स्टेटसवर आलेले रिप्लाय विचार करायला लावणारे आहेत.
 
जसं परवा मी माझ्या वाढदिवशी बायकोनं दिलेल्या गिफ्टविषयीचं स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवलं.
 
"घरी बनवलेला केक. बायकोचं प्रेम वेगळं असतं. करून टाका लग्न ज्यांचं ज्यांचं राहिलं त्यांनी," असं ते स्टेटस होतं.
 
हे स्टेटस पाहून मला एकाचा रिप्लाय आला...."भेटतच नाही बायको. सोडली आशा आता, संपलं सगळं."
 
29 वर्षांच्या प्रतीकचा (नाव बदललेलं) असा रिप्लाय पाहून मी त्याला त्यामागचं कारण विचारायला फोन केला.
 
त्यानं सांगितलं, "पोरी पाहून पाहून थकलोय. आतापर्यंत 30 पोरी पाहिल्या आहेत. पण कुणी विचारायलाच तयार नाही. त्यामुळे आता लग्नच करावं वाटत नाही."
 
प्रतीक सध्या पुण्यात एका आयटी कंपनीत काम करतो. त्याला महिन्याला 19 हजार रुपये इतका पगार आहे. घरी 10 एकर शेतीही आहे. पण, मुलींकडच्या मंडळीकडून त्याला सतत नकार येत आहे.
 
आता सरकारी नोकरीच्या अपेक्षेव्यतिरिक्त कोरोना संकटाचा समावेशही लग्न न होण्याच्या कारणांमध्ये झाला आहे.
 
प्रतीक सांगतो, "एकतर मुलीकडच्यांची पहिली अपेक्षा सरकारी नोकरी असणारा मुलगा हवा, ही आहे. दुसरं म्हणजे कोरोनाच्या काळात पुण्यातले बरेच जण गावाकडे परत आले. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलांचं काही खरं नाही, असं मुलीच्या घरचे म्हणतात आणि नकार देतात."
 
एकीकडे लग्न होत नाही म्हणून येणारा सामाजिक दबाव आणि दुसरीकडे दिवसेंदिवस वय वाढत चालल्यामुळे भविष्यात लग्न होईल की नाही, ही चिंता या तरुणांना सतावत आहे. यात त्यांची मानसिक ओढाताण होत आहे.
 
"आपण दिसतो चांगले, आपल्याला काही व्यसन नाही, गावात घर आहे, शेती आहे, जॉब आहे, इतकं असूनही आपल्यासोबत असं का होत आहे, असा प्रश्न मनाला खात राहतो. यामुळे मग आपण काही कामाचे नाही, असं वाटायला लागतं. इतका मानसिक त्रास होतो की, चांगलं असणं गुन्हा आहे की काय, असं वाटायला लागतं. आयुष्य बरबाद असल्याची फीलिंग येते," प्रतीक त्याच्या भावना मोकळ्या करतो.
 
'नकारामुळे खूप डिप्रेशन येतं'

29 वर्षीय सुभाष (बदललेलं नाव) पुणे जिल्ह्यात राहतो. गेल्या 2 वर्षांपासून तो लग्नासाठी मुली पाहत आहेत. पण, शेतकरी असल्यामुळे त्याला नकार दिला जातोय.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्यानं सांगितलं, "माझ्याकडे दीड एकर शेती आहे. गेल्या 2 वर्षांत मी 10 ते 15 मुली पाहिल्या आहेत. पण, मुलींना सेटल आणि परमानंट नोकरी असणारा मुलगा हवा आहे. शेतीत दरमहा इन्कम भेटत नाही, त्यामुळे शेतकरीच शेतकऱ्याला पोरगी द्यायला तयार नाही, हे महाराष्ट्रातील वास्तव आहे.
 
"सततच्या नकारामुळे खूप डिप्रेशन येतं. वाईट विचार येतात मनात. कधी वाटतं संन्यास घ्यावा, तर कधी आपण कशाला जन्माला आलो, असे प्रश्न डोकं खातात. याशिवाय मुलाचं लग्न जमत नसलं की त्याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना, असा प्रश्न विचारला जातो. गावात सगळी माणसं वेगळ्या नजरेनं पाहायला लागतात. त्यामुळे वय वाढत चालल्याचं प्रचंड दडपण येतं."
 
उंची कमी म्हणून नकार

नागपूरची रेखा (27) सध्या पुण्यात नोकरी करते. तिला वर्षाकाठी 10 लाखांचं पॅकेज आहे.
 
पण, उंची कमी असल्यामुळे तिला मुलांकडून नकार येत आहेत.
 
बीबीसी मराठीला तिनं सांगितलं, "मला वर्षाला 10 ते 11 लाखांचं पॅकेज आहे. कंपनीत चांगली पोस्टही आहे. लग्नासाठी मुलं पाहायला येणं सुरूच आहे. पण, माझ्या उंचीमुळे मला मुलांकडून नकार कळवला जात आहे. मुलाची आणि मुलीची उंची मॅच होत नाही, असं सांगून नकार दिला जात आहे."
 
यामुळे मनावर परिणाम होत असल्याचं तिचं म्हणणं आहे.
 
"कधीकधी वाटतं उगाच इतके शिकले आणि नोकरीला लागले. मस्त घर सांभाळणारी मुलगी राहिले असते तर एव्हाना लग्न झालं असतं. पण मग मनात लगेच विचार येतो की आपल्याला टिपिकल गृहिणी वगैरे व्हायचंच नव्हतं. अशाप्रकारे मनात दोन्ही प्रकारचे विचार येत राहतात आणि आपली लढाई आपल्याशीच सुरू राहते," रेखानं पुढे सांगितलं.
 
लग्नास उशीर होतोय, कारण...

जालना जिल्ह्यातील काशीनाथ अवघड (65) सोयरिक जुळवण्याचं काम करतात. दरवर्षी 5 ते 6 सोयरिकी जुळवणाऱ्या काशीनाथ यांनी आतापर्यंत दीडशे ते दोनशे सोयरिकी केल्या आहेत.
 
अवाजवी हुंडा आणि नोकरीच्या अपेक्षेमुळे लग्नास उशीर होत असल्याचं ते सांगतात.
 
"सुरुवातीला मुलगा वयात असतो त्यावेळेस त्याला चांगल्या मुली दाखवल्या जातात. पण, तेव्हा त्याला जास्त हुंड्याची आशा असते. त्यामुळे तो अनेक मुली पाहतो आणि त्यांना नकार कळवतो. मग मुलाचं वय वाढत जातं. जसंजसं वय वाढतं तसतसं त्याला साधारण मुलींचं स्थळ यायला लागतं. अशावेळी मग मुलाला आपण आधीच्या मुलीला नकार दिल्याचा पश्चात्ताप होतो आणि त्याची मानसिक स्थिती बिघडायला लागते."
 
पण, मुलांप्रमाणे मुलींच्याही लग्नाला उशीरा होत आहे, यामागचं कारण विचारल्यावर त्यांनी म्हटलं, "मुली आता शिकायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मुलींना आता फक्त नोकरीवाला नवरा नकोय. नोकरीसोबतच मुलाच्या घरी शेती असावी, त्याला व्यसन नसावं, त्याच्या घरी चांगलं वातावरण असावं, अशा अपेक्षा मुली आणि त्यांचे पालक करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणं अवघड जात आहे आणि लग्नांना उशीर होत आहे."
 
काशीनाथ अवघड यांच्या गावात आजघडीला जवळपास 100 मुलं लग्नासाठी तयार आहेत. पण ते स्वत:च्या पायावर उभे नसल्यानं (आर्थिक कमाई नसल्यानं) त्यांची लग्न जमत नसल्याचं ते सांगतात.
 
करिअर, वय आणि लग्न

औरंगाबादची 27 वर्षीय नीता वाघ या विषयावर तिचं मत सविस्तर मांडते.
 
करिअरच्या मागे लागल्यानं वय हातातून निघून जातं आणि मग कुचंबणा व्हायला लागते, असं ती सांगते.
 
"मुलगी वयात आली की समाज तिच्याकडे ओझं म्हणून बघतो. यामुळे मग स्वत:लाही वाटायला लागतं की आपल्यामुळे आपले आईवडील दु:खी आहेत. आपणही त्यांच्यावर ओझं आहोत की काय? यातून भावनिक, मानसिक कुचंबणा व्हायला लागते. त्यामुळे लग्न होत नाही म्हणून डिप्रेशनमध्ये असणारा एक आणि लग्न करायचं नाही पण फॅमिली सपोर्ट करत नाही, म्हणून डिप्रेशनमध्ये असणारा दुसरा युवावर्ग आहे.
 
"लग्न करायच्या आधी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी, असं आमच्या तरुण पीढीतल्या मुलींना वाटतं. पण, करिअरनं धोका दिल्यामुळे आमची आर्थिककृष्ट्या कुचंबणा होते. करिअर बनवण्याच्या नादात वय हातातून निघून जातं."
 
समुपदेशनाची गरज?
 
लग्नाला उशीर होत असल्यामुळे डिप्रेशन येत असल्याचं या तरुण-तरुणींचं म्हणणं आहे. यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय असल्याचं समुपदेशकांचं म्हणणं आहे.
 
समुपदेशक वंदना सुधीर कुलकर्णी यांच्या मते, "आपल्याकडे लग्न म्हणजे काय हे समजून सांगण्यापासून सुरुवात करण्याची गरज आहे. आपल्याला लग्न का करायचं आहे, त्यानंतर ते कुणासोबत करायचं आहे आणि जोडीदार निवडण्यासाठी कसा विचार करायला पाहिजे याची स्पष्टता आधीच असायला हवी. ज्यासाठी बदलत्या काळात विवाहपूर्व समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
"ज्यावेळेस लग्न, करिअर आणि या दोहोंचा घालायचा मेळ याविषयी स्पष्टता नसते, तेव्हा गोंधळ उडतो आणि यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी सामना करता आला नाही तर मग अस्वस्थ व्हायला लागतं. यातून काही जणांना पुढे जाऊन anxiety, डिप्रेशन यांसारखे त्रास व्हायला लागू शकतात."
 
त्या पुढे सांगतात, "आता आर्थिक परिस्थिती हा जगण्याचा निकष झाला आहे. आर्थिक स्थैर्य नसेल तर कोणतंही नातं स्वस्थ राहणं, लग्न टिकणं अवघड होऊ शकेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मुलींनाही आता आर्थिक स्वावलंबी होण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची परिणती आता लग्न लांबण्यास होणार हे आता स्वीकारायला हवं."
 
डॉ. डी. एस. कोरे हे विवाहपूर्व समुपदेशन (मॅरेज काऊन्सिलर) करतात. त्यासाठी ते 'संवेदन काऊन्सलिंग सेंटर' चालवतात.
 
तरुण-तरुणींनी स्वत:ची लग्नाची संकल्पना काय आहे, ते आधी बघावं आणि मगच लग्नाचा विचार करावा, असं त्यांचं मत आहे.
 
ते सांगतात, "मुला-मुलींचे लग्नासाठी जे निकष असतात, त्याविषयी त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. हे दोघेही जोडीदाराविषयी काही ठरावीक निकष किंवा अपेक्षा बाळगतात. पण बऱ्याचदा त्यात प्रॅक्टिकल विचार केलेला नसतो. रंग, उंची या नैसर्गिक बाबींमध्ये तडजोडीची तयारी ठेवायला हवी. पण, तसं होत नाही. त्यामुळे मग नकार येतात आणि त्याचा मनावर परिणाम होतो."