शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2019 (11:34 IST)

टीव्ही चर्चांमध्ये काँग्रेसचा प्रवक्ता सहभागी होणार नाही- सुरजेवाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ आज दुसऱ्यांदा शपथ घेत आहे. राजधानीमध्ये त्याची तयारी सुरू असतानाच काँग्रेसने एक नवा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्याभराच्या काळासाठी काँग्रेस पक्षाचा कोणताही प्रवक्ता टीव्हीवरील चर्चांमध्ये सहभागी होणार नाही असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
 
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्याभराच्या काळासाठी काँग्रेस आपले प्रवक्ते टीव्हीवरील चर्चांमध्ये सहभागी होण्यास पाठवणार नाही. सर्व टीव्ही वाहिन्या आणि त्यांच्या संपादकांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेस प्रवक्त्यांसाठी जागा ठेवू नये असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये विविध विषयांवर मंथन सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची तयारी राहुल गांधी यांन दाखवली होती.
 
त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीने त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी पद सोडल्यास त्यांच्या जागी नक्की कोण पद सांभाळेल, त्यांनी पद सोडलेच तर नवा अध्यक्ष गांधी कुटंबातील असेल की बाहेरचा याबाबतही चर्चा आणि तर्क लावले जाऊ लागले आहेत. पराभवाच्या कारणांची मीमांसा आणि अध्यक्षपदाबाबत साशंकता यामुळे एक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
काँग्रेसच्या विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांनी राहुल यांनी पद सोडू नये असी विनंती बुधवारी केले होते. राहुल गांधी यांनी पद सोडल्यास आपण उपोषण करू असा इशारा तेलंगणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बोल्लू किशन यांनी दिला होता. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही राहुल गांधीनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली होती.