1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified गुरूवार, 11 मार्च 2021 (17:04 IST)

कोरोना लॉकडॉऊन : महाराष्ट्रात लॉकडॉऊनचा निर्णय 2 दिवसात - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन लॉकडॉऊन बाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. तिकडे नागपूरमध्ये मात्र 15 ते 21 मार्च लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहेत.
 
तर MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षाही आता पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
 
काही ठिकाणी लॉकडॉऊन करावा लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यासाठी प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक लवकरच होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बुधवारी (10 मार्च) मात्र उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत लॉकडॉऊनचा निर्णय घेतला जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. "लॉकडॉऊन टाळायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे," असंही ते म्हणाले होते.
 
पण आज (11 मार्च) उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊनचा निर्णय दोन दिवसात घेऊ असं म्हटलंय.
नागपुरात लॉकडाऊन
नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिलीय. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं. 10 मार्चला नागपूरमध्ये 1700 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालीय. यानंतर लॉकडॉऊनचा निर्णय घेण्यात आला.
 
यावेळी उद्योग सुरू राहणार असून खासगी कार्यलय मात्र बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 25% कमर्चारी उपस्थित राहू शकतात.
 
राज्यात अनेक ठिकणी कडक निर्बंध लागू
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर जिथे जिथे मोठ्या संख्येत रुग्ण सापडत आहेत, तिथे निर्बंध आणण्यास सुरुवात झालीय. याचाच भाग म्हणून ठाणे शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
 
ठाणे शहरातील 16 विभाग हॅाटस्पॅाट घोषित करण्यात आले असून, 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लॅाकडाऊन असेल. ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हे आदेश जारी केले आहेत.
तर, मुंबईत देखील अंशतः लॉकडाऊन लागू शकतो असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी म्हटलं आहे.
 
तसंच पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पुण्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी एकाच दिवशी 1086 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7020 इतके सक्रिय रुग्ण सध्या शहरात आहेत.
 
तर कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
 
बुधवारी (10 मार्च) कल्याण-डोंबिवलीत 392 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.
 
दुकानांसोबतच खाद्यपदार्थांच्या गाड्यांनाही संध्याकाळी सात वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. लग्न आणि इतर सार्वजनिक समारंभांमध्ये नियमांचे पालन करा तसंच रात्री नऊपर्यंत कार्यक्रम संपवा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
 
बार आणि रेस्टॉरंट्स रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील तर होम डिलिव्हरीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.