लस उत्पादन एका रात्रीत वाढवता येत नाही- अदर पुनावाला
"लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढवले जाऊ शकत नाही. आम्हाला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी लसीच्या डोसचे उत्पादन हे एक सोपे काम नाही. अगदी विकसित देश आणि कमी लोकसंख्या असलेल्या देशातही औषधी कंपन्या यावर संघर्ष करताना दिसतात," असं सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. लशीसाठी मला धमक्या मिळतात, दबाव आहे असं पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पण लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे बर्याच राज्यात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण अजून सुरु झालेलं नाही.
पुनावाला म्हणाले, "प्रत्येकाला लवकरात लवकर लस हवी आहे. आम्हालाही तसंच वाटतं. आम्ही या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात आम्ही भारताला मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करू."