शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (15:52 IST)

कोरोना: कोव्हिडमधून बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये का वाढत आहेत डोळे आणि नाकाचे आजार?

मयांक भागवत
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
 
बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्यूकर मायकॉसिस' म्हणतात.
 
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.
 
कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं हा आजार काय आहे, आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे.
 
काय आहे 'म्यूकर मायकॉसिस'?
राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.
 
मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, "सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्यूकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे."
तज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. "ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते," असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.
 
'म्यूकर मायकॉसिस' आजाराची लक्षणं?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
 
नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची चार प्रमुख लक्षणं सांगतात.
 
· नाकातून रक्त येणं
 
· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
 
· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
 
'म्यूकर मायकॉसिस' ची कारणं?
डॉ. चव्हाण म्हणतात, "रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे."
 
मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला 'म्यूकर मायकॉसिस'ची चार प्रमुख कारणं सांगतात.
 
· अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण
 
· स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर
 
· ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स
 
· शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं
 
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख म्यूकर मायकॉसिसला संधीसाधू आजार म्हणतात.
 
कोरोना संसर्ग आणि म्यूकर मायकॉसिसचं नातं काय?
 
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकर मायकॉसिसचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून आलंय.
डॉ. भालेकर याची कारणं सांगतात,
 
· कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती
 
· कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज
 
· शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध
 
"कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो," असं ते म्हणतात.
 
नानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील एका रुग्णाची माहिती देताना सांगतात, "एक 30 वर्षांचा युवक सायनस आणि डोळ्यांची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. त्याचा डोळा काढून सायनस इंन्फेक्शन काढावं लागलं. संसर्ग डोक्यात पसरण्यापासून आम्ही रोखू शकलो."
 
प्री-कोव्हिडमध्ये अनियंत्रित मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट झालेल्यांमध्ये डॉक्टरांना हा संसर्ग पहाण्यास मिळाला होता.
 
मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो?
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण.
 
"जे जे रुग्णालयात म्यूकर मायकॉसिसमुळे उपचार घेणारे बहुतांशी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत," असं डॉ. पारेख सांगतात.
 
"कोरोनासंसर्गात मधुमेह वाढतो. इम्युनिटी कमी झाल्याने म्यूकर मायकॉसिस जास्त घातक ठरतोय. मधुमेह नसलेल्यांना उपचारादरम्यान स्टिरॉईड दिल्याने शरीरात सारखेची मात्रा वाढते. अशा रुग्णांमध्येही हा आजार घातक असल्याचं आढळून आलंय," असं डॉ. चव्हाण म्हणतात.
 
'गेल्या 20 वर्षांत फक्त 15 रुग्ण पाहिलेत'
 
डॉ. शरद भालेकर सांगतात, "गेल्या 20 वर्षांत फक्त 15-20 म्यूकर मायकॉसिसने ग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. पण, एका वर्षाच्या कोरोनाकाळात आत्तापर्यंत 25 रुग्णांवर उपचार केले आहेत."
 
तज्ज्ञ सांगतात, म्यूकर मायकॉसिसच्या देशभरातून केसेस पहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. गेल्यावर्षी गुजरात आणि मध्यप्रदेशात ही प्रकरणं आढळून आली होती.
 
नानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील सांगतात, "गेल्या वर्षभरात 10 ते 15 रुग्णांवर उपचार केले आहेत. हे सर्व 30 ते 50 या वयोगटातील आहेत."
 
डोळे जाण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सायनसमध्ये वाढलेलं इन्फेक्शन डोळ्यांच्या ऑर्बिटमध्ये (डोळा असलेलं ठिकाण) जातं.
 
डॉ. रागिणी पारेख सांगतात, "संसर्ग डोळ्यात गेल्यास उपचार आव्हानात्मक आहेत. काही केसमध्ये रुग्णाचा डोळा काढावा लागतो."
 
डॉक्टर सांगतात, त्यांच्याकडे येणारा रुग्ण सायनसमध्ये कंजेशन किंवा डोळ्यांनी कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन येतो.
 
"गेल्याकाही दिवसात म्यूकर मायकॉसिस झालेल्या सहा रुग्णांचे डोळे काढवे लागलेत," असं नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शरद भालेकर यांनी सांगितलं.
 
हा संसर्ग जीवघेणा आहे का?
तज्ज्ञ सांगतात, म्यूकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
 
व्हॉकार्ट रुग्णालयाच्या डॉ. हनी सावला सांगतात, "म्यूकर मायकॉसिसने ग्रस्त एका रुग्णाचा मृत्यू झालाय."
 
"संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते," असं डॉ. अमोल पाटील सांगतात.
 
उपचार काय?
डॉ. चव्हाण म्हणतात, म्यूकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी 'एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी' करुन बुरशी काढली जाते."