शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (14:45 IST)

कोरोना व्हायरस: चीनचं बिकट आर्थिक भविष्य आपल्यासाठी काळजीचं कारण आहे का?

करिश्मा वासवानी
कोरोना विषाणूशी लढा देता यावं, यासाठी चीनने स्वतः आपल्या अर्थव्यवस्थेला कोमात ढकललं. अर्थात जनतेचा जीव वाचवण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
 
आता चीनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानतंर हळूहळू उद्योगधंदे सुरू होत आहेत. मात्र याचा अर्थ तुम्हाआम्हाला काही फायदा होतील, अशातला भाग नाही.
 
कोरोनाच्या संकटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या तिमाहित 6.8 टक्क्यांनी घसरला आहे. 1970 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेने नोंदवलेली ही सर्वांत मोठी घसरण आहे.
 
मात्र चीनबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्थव्यवस्थेसंबंधी चीन जी आकडेवारी देतं, त्याबाबत एक वैधानिक इशारा असतोच - या आकडेवारीवर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. स्वतंत्र अर्थतज्ज्ञांनी कायमच म्हटलंय की चीनची प्रत्यक्ष आकडेवारी ही जारी केल्या जाणाऱ्या आकडेवारीपेक्षा कमी असते.
 
मात्र यावेळी कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे, किरकोळ विक्री बंद असल्याने अर्थव्यवस्थेचा ग्राफ खाली येणार, हे नक्कीच होतं. झालंही तसंच. चीननेही तेच सांगितलं.
 
मी ज्या-ज्या अर्थतज्ज्ञांशी बोलले त्यातल्या बहुतेकांनी मला सांगितलं की परिस्थिती सुधारण्याआधी ती खूप बिघडेल. त्यामुळे येणाऱ्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेने थोडी सुधारणा दाखवली तर ते आपल्यासाठीही शुभ संकेत असतील, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं होणार नाही.
 
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार चीनचा आर्थिक विकासदर जो गेल्या वर्षी 6 टक्के होता तो यंदा 2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, आणि परिस्थिती अधिकच चिघळली तर विकासदराचा हा आकडा 0.1% देखील असू शकतो. म्हणजे जवळपास शून्य टक्के.
 
बॅक टू बिझनेस
चीनच्या पहिल्या तिमाहीचे आकडे निराशाजनक असले तरी तिथल्या उद्योग-व्यवसायांनी कामाला सुरुवात केली आहे. अर्थातच ही सुरुवात संथ आहे.
 
चीनमधल्या अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समधल्या सदस्यांचा मार्चच्या शेवटी-शेवटी एक सर्व्हे करण्यात आला. त्यात या सदस्यांनी असं सांगितलं की त्यांच्या 25 टक्के कंपन्या एप्रिल संपता संपता सुरळीत काम करू लागतील. तर 22% कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे काम करायला सुरुवातही केली आहे.
 
जवळपास 40% सदस्यांनी म्हटलं आहे की पूर्वी ज्याप्रमाणे ठरलं होतं त्याचप्रमाणे ते आपली गुंतवणूक कायम ठेवतील. याचा अर्थ चीनमध्ये या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांची कपात होणार नाही किंवा कारखाने बंद पडणार नाहीत.
 
सिल्क रोड रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक विनेश मोटवाणी चीनमधल्या घडामोडींकडे बरंच सकारात्मक दृष्टीने बघतात. ते म्हणतात, "गेल्या महिन्यात मी चीनमधल्या माझ्या परिचितांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते घराबाहेरही पडत नाहीत. मात्र आता त्यांनी काम सुरू केलं आहे."
 
मोटवाणी म्हणतात त्यांना जी माहिती मिळाली आहे त्यानुसार चीनमधले अनेक व्यवसाय मे महिन्यापर्यंत पूर्णपणे सुरू होतील.
 
मात्र, जागतिक बँकेने 2018 मध्ये जो अहवाल सादर केला होता त्यानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेतला 20% महसूल हा निर्यातीतून येतो. चीन जगभर निर्यात करतो.
 
त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था किती सुधारेल हे जगातून चीनकडे किती मागणी जाते, यावर अवलंबून असणार आहे. अमेरिका, युरोप आणि युके चीनचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. मात्र, या सर्व देशांमध्ये सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे हे देश नजिकच्या भविष्यात चीनकडून सामान खरेदी करण्याची शक्यता कमीच आहे.
 
मागणीत घट
सिंगापूरमधल्या एका निर्यातदाराने सांगितलं की ते त्यांचा 90% माल चीनमधून आयात करतात आणि अमेरिकेतल्या ग्राहकांना विकतात. यात स्वयंपाकघरातल्या वस्तुंपासून ते घर स्वच्छ करण्यापर्यंतच्या वस्तूंचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनमुळे एकीकडे अमेरिकेमधून मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे त्यांना चीनमधून काहीच मागवता येत नाहीय.
 
परिस्थिती अनिश्चिततेची असली तरी त्यांनी आता चीनमधून मास्क आणि सॅनिटायझर्स मागवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या त्यांच्या ग्राहकांकडूनही या वस्तुंना भरपूर मागणी आहे. ते सांगतात, ज्या कारखान्यांमध्ये पूर्वी स्वयंपाकघरातल्या वस्तू तयार व्हायच्या, ते कारखाने आता मास्क बनवत आहेत.
 
कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या आकलनानुसार गेल्या महिन्यात चीनमध्ये कारखाने सुरू झाले आणि जगभरात मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्ह्ज आणि इतर मेडिकल इक्विपमेंटची मागणी वधारली. चीनने आर्थिक विकासदराची जी आकडेवारी सादर केली आहे त्यात जगभरातून होणाऱ्या या मागणीचाही समावेश आहे. मात्र, "जगभरात आर्थिक व्यवहार कोसळत असताना" म्हणजेच जीवनावश्यक वस्तू वगळता कुठलेच उद्योगधंदे, व्यवसाय, ऑफिस सुरू नसल्याने मागणी-पुरवठ्याचं चक्र जवळपास ठप्प झालं असताना याची झळ चीनच्या निर्यात क्षेत्रालाही बसणार आहे.
 
कोव्हिड 19 ने चीनबाहेर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या तिमाहीत परदेशातून होणारी मागणी घटणार आहे. त्यामुळे चीनचे ग्राहक चीनच्या आणि पर्यायाने जगाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, अशी आशा बाळगण्यात हशील नाही.
 
AXA इनव्हेस्टमेंटचे मॅनेजर ऐदान याओ म्हणतात की रेस्टॉरंट, चित्रपटगृह, पर्यटन ठप्प असल्याने मागणी नाही आणि ही मोठी अडचण आहे.
 
लार्ज सर्विसेस फर्म्सवर करण्यात आलेला ताजा सर्व्हे सांगतो की पुरवठा 75 ते 85 टक्क्यांपर्यंत सुरू करण्यात आला आहे. मात्र, मागणीच 50 ते 55% आहे. शिवाय, परिस्थिती सामान्य व्हायला अजून सहा महिने तरी लागतील, असं या कंपन्यांना वाटतं.
 
रिकव्हरीमधली जोखीम
अशी सगळी आव्हानं असताना चीनमध्ये नवे कोरोनाग्रस्त अजूनही आढळत आहे. शिवाय एकदा संसर्ग होऊन त्यातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होत असल्याचीही प्रकरणं दिसू लागली आहेत. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा नव्याने लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात चीनच्या अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार कायम असणार आहे.
 
चीनमधल्या लोकांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. फेब्रुवारी महिन्यात चीनचा बेरोजगारी दर 6.2 टक्क्यांवर पोचला होता. चीनच्या इतिहासातील बेरोजगारीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दर आहे.
 
चीनची आर्थिक क्षमता मोठी आहे, हे मान्यच आहे. आपल्या लघू आणि मध्यम उद्योगांना चीन सरकार आर्थिक मदत करू शकतं.
 
चीनची मध्यवर्ती बँक असणाऱ्या सेंट्रल बँकेने काही व्याजदर कमी केले आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणावर अल्पकालीन कर्जवाटप करण्यात आलं. मात्र, या कंपन्यांसाठीही सध्या टिकून राहणं, सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या कंपन्यांना अधिकच्या आर्थिक सहाय्याची गरज भासू शकते.
 
यापूर्वीच्या जागतिक आर्थिक संकटकाळात चीनने तब्बल 600 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. चीनच्या या आर्थिक मदतीमुळेच जगाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन सावरलं. मात्र, यामुळे चीनवरही कर्जाचा बोजा वाढला. आता आणखी कर्ज घेण्याची चीनची क्षमता नाही.
 
याचा साधा अर्थ असा की सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं केवळ अवास्तविकच नाही तर फार जोखमीचं आहे. चीनला स्वतःचेच खूप प्रॉबलेम्स आहेत.