शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (17:21 IST)

कोरोना : CT व्हॅल्यू म्हणजे काय? या चाचणीतून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कसं समजतं?

गुरप्रीत सैनी
कोरोनाची दुसरी लाट सध्या भारतात थैमान घालत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर प्रशासनाचा भर दिसून येतो.
त्यातही RT-PCR चाचणीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाची माहिती खात्रीशीरपणे मिळू शकते.
याच RT-PCR चाचणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे CT व्हॅल्यू होय. यालाच CT स्कोअर किंवा CT नंबर असंही संबोधतात.
 
CT व्हॅल्यू म्हणजे काय?
CT व्हॅल्यू समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम RT-PCR टेस्ट म्हणजे काय असते, हे समजून घ्यावं लागेल.
RT-PCR म्हणजे 'रिव्हर्स टान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन टेस्ट' होय. या चाचणीच्या माध्यमातून कोणत्याही व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलचा तपास केला जातो.
कोरोना व्हायरस हा एक RNA कोड असलेला व्हायरस आहे. याच्या तपासासाठी लागणारे नमुने रुग्णांच्या स्वॅबमधून (लाळेतून) घेतले जातात.
मात्र RT-PCR टेस्टपूर्वी हे RNA कृत्रिमरित्या बदलून DNA मध्ये रुपांतरीत केले जातात. त्यासाठी यामध्ये DNA ची प्रक्रिया घडवून आणली जाते, म्हणजे एका प्रकारे याची आणखी एक कॉपी बनवण्यात येते.
घेतलेल्या लाळेच्या नमुन्यांमध्ये व्हायरस उपस्थित आहे किंवा नाही, हे त्यातून समजू शकतं. व्हायरसच्या माहितीसाठी साखळी प्रक्रिया (चेन रिअॅक्शन) किती वेळा केली जाईल, त्यालाच CT नंबर किंवा CT व्हॅल्यू असं म्हटलं जातं.
 
CT व्हॅल्यू कसा काढतात?
CT व्हॅल्यू म्हणजे सायकल थ्रेशोल्ड हा एक नंबर असतो. ICMR ने कोरोना व्हायरसची खात्री पटवण्यासाठी ही संख्या 35 अशी निर्धारित केली आहे. म्हणजे CT व्हॅल्यू 35 पर्यंत मिळाल्यास तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, असा त्याचा अर्थ होतो.
या प्रक्रियेत पहिल्यांदा एकातून दुसरी कॉपी बनेल. त्यानंतर दोनाचे चार, चाराचे आठ या प्रमाणात प्रक्रिया सुरू राहील.
अनेकांमध्ये 8 ते 10 सायकलमध्येच व्हायरस आढळून येतो. काही जणांमध्ये 30 ते 32 सायकलमध्ये मिळू शकतो.
व्हायरस लवकर मिळण्याचा अर्थ व्हायरल लोड जास्त आहे. त्यामुळेच व्हायरस लवकरच आढळून आला. जेव्हा जास्त सायकल झाल्यानंतर व्हायरस निदर्शनास आल्यास व्हायरसचा लोड कमी असल्याचं मानलं जातं.
 
CT व्हॅल्यू जास्त असल्यास रुग्ण गंभीर असण्याचा धोका असतो का?
आताच आपण पाहिलं की CT व्हॅल्यू जितका कमी तितका व्हायरल लोड जास्त असेल. CT व्हॅल्यू जास्त म्हणजे व्हायरल लोड कमी असतो. पण CT व्हॅल्यू जास्त असताना रुग्णाची तब्येत बिघडू शकते का?
या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी बीबीसीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि व्हायरस विशेषज्ञ विद्या अरंकल यांच्याशी चर्चा केली.
त्या सांगतात, "व्हायरल लोड जास्त म्हणजे रुग्णाची तब्येत बिघडण्याचा धोका जास्त, असं प्रत्येकवेळी म्हणता येऊ शकत नाही. ढोबळमानाने लोड जास्त असलेला रुग्ण गंभीर असतो, हे खरं आहे. पण नेहमीच तसं असेल, हे आपण गृहीत धरू शकत नाही. व्हायरल लोड कमी असला तरी अनेक रुग्ण गंभीर असू शकतात. CT व्हॅल्यू 10 किंवा 30 कितीही असली तरी रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.
माय लॅब्जचे संचालक डॉ. गौतम वानखेडे याबाबत सांगतात, "CT व्हॅल्यू कमी आला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये. CT व्हॅल्यू 12 असला तरी त्याने आपण गंभीर आहोत, असं समजता कामा नये. प्रत्येक शरीर याला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. CT व्हॅल्यू 12 किंवा 32 कितीही असली तरी आपण दोन्ही बाबतीत सावधगिरी बाळगणं हेच आपल्या हातात आहे."
"आपण आरोग्यविषयक सगळी काळजी घ्यावी. तसंच सोशल डिस्टन्सिंग आणि अलगीकरण-विलगीकरणाचे नियम पाळले पाहिजेत, असंही डॉ. वानखेडे सांगतात.
 
संसर्ग झाल्यानंतरही RT-PCR चाचणी निगेटिव्ह कशामुळे?
कोरोनाची सगळी लक्षणं दिसून येतात, पण चाचणी निगेटिव्ह येते, असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या बाबतीत घडताना दिसत आहे.
अशा वेळी CT स्कॅन केल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येतो. याचं काय कारणं आहे?
व्हायरोलॉजिस्ट विद्या अरंकल म्हणतात, "याची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे व्हायरसच्या संरचनेत सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे सध्याची कोरोना चाचणी नव्या व्हायरसची ओळख पटवू शकत नाही. तसंच व्हायरस अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळेही रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.
डॉ. गौतम वानखेडे म्हणतात, "याची अनेक कारणं असू शकतात. सँपल योग्य पद्धतीने घेतला नाही, योग्यरित्या त्याची वाहतूक झाली नाही, केमिकल मिळालं नाही. चाचणी करताना ऑटोमेशनचा वापर कमी झाला, अशा वेळी चाचणी निगेटिव्ह येऊ शकते. ही संपूर्ण प्रक्रिया मानवी असल्याने यामध्ये एखादी चूक होऊ शकते. आतापर्यंत भारतासह दक्षिण आफ्रिका, ब्राझील, युके याठिकाणी डबल म्यूटंट झालेलं आहे. याठिकाणी RT-PCR चाचणी करण्यात अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलं नाही."
त्या सांगतात, "लॅबची यामध्ये चूक आहे, असं मला म्हणायचं नाही. सगळ्याच लॅबवर ताण वाढला आहे. आधी आपण दिवसाला 50 चाचण्या करत होतो. आता आपण 500 चाचण्या दिवसाला करतो. कामाचा ताण जास्त असल्यास त्यामध्ये चूक होण्याची शक्यता जास्त असतं."
या सर्व गोष्टींमुळे RT-PCR चाचणी घशातल्या कोरोना व्हायरसला पकडू शकते, पण फुफ्फुसांतील व्हायरस पकडू शकत नाही, त्यासाठी CT स्कॅन करावा लागेल, अशी चर्चाही लोकांमध्ये आहे.
पण डॉ. गौतम सांगतात, "व्हायरस फुफ्फुसात असेल पण घशामध्ये नसेल, असं होणं शक्य नाही. योग्यरित्या स्वॅब घेतला तर व्हायरस नक्की पकडला जातो."
 
CT व्हॅल्यूचा उपयोग किती?
आतापर्यंत CT व्हॅल्यूबाबत जास्त बोललं जात नव्हतं. कारण टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह याच गोष्टींची चर्चा आतापर्यंत केली जायची. पण CT व्हॅल्यूत व्हायरल लोडचं प्रमाणही कळतं.
डॉ. गौतम यांच्या मते, आपण कोरोनाच्या व्हायरल लोडला महत्त्व देत आहोत. पण त्याऐवजी चाचणी पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह यांना महत्त्व दिलं पाहिजे.
ते पुढे सांगतात, "शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अद्याप या व्हायरसच्या वर्तणुकीबाबत ठामपणे माहीत नाही. उदाहरणार्थ, आपण HIV वर उपचार करत असताना औषध खाल्यानंतर व्हायरस 15 दिवसांत 50 वरून 40 आणि 40 वरून 20 वर यायला हवा, हे आपल्याला माहीत असतं.
मात्र कोव्हिड हा नवा आजार आहे. एखादं औषध व्हायरल लोड किती प्रमाणात कमी करू शकतो, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यांच्यावरच जास्त लक्ष द्यावं लागेल. पण वैद्यकीय परिभाषेत CT व्हॅल्यूला एक वेगळं महत्त्वं आहे. यामुळे डॉक्टरांना परिस्थिती समजून घेण्यासाठी चांगली मदत होऊ शकते, हेही तितकंच खरं आहे."