शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (21:10 IST)

नारायण दाभाडकर यांनी खरंच तरुण रुग्णासाठी त्यांचा बेड दिला?

- प्रवीण मुधोळकर
"काही लोक मृत्यूसमयी देखील काहीतरी विलक्षण करून जातात. नारायण दाभाडकर स्वत: कोव्हिड पॉझिटिव्ह असून उपचार घेत असतांना त्यांनी एका तरुण रुग्णांसाठी आपला ऑक्सिजन बेड दिला." अशा आशयाची एक बातमी नागपूरच्या नारायण दाभाडकर यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या घटनेवरून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या बातमीच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
नागपूर येथील नागरिक आणि सांख्यिकी विभागातून निवृत्त झालेल्या नारायण दाभाडकर यांना कोव्हिडची लागण झाली होती. त्यांचं वय 85 होतं आणि त्यांना ऑक्सिजन बेडची नितांत गरज होती.
 
त्या दिवशीच्या घटनाक्रमाबद्दल इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कोव्हिड विभागाचे प्रमुख अजय हरदास यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "22 एप्रिल 2021 रोजी आमच्या पूर्णत: कोव्हिड रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात नारायण दाभाडकर यांना आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू केले. पण उपचारादरम्यान ते मला घरीच जायचं आहे. मला हॉस्पिटल मध्ये ठेऊ नका असा आग्रह करु लागले."
 
अजय हरदास पुढे सांगतात, "ते घरी जाण्याचा आग्रह का करु लागले, याची आम्हाला माहिती मिळाली नाही. 22 एप्रिल रोजी आमच्या रुग्णालयात कोरोना पेशंट्सची मोठी गर्दी होती. आमचे महापालिकेचे रुग्णालय असल्यामुळे आम्ही कुणालाही परत पाठवत नाही. त्या दिवशी तर आम्ही खुर्चीवर बसवूनही अनेक रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट दिला होता. नारायण दाभाडकर कॅज्युअल्टीमध्ये काही वेळ उपचार घेत असताना त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये सुधारणा होत होती. आम्ही त्यांना कोव्हिड वॉर्डात हलवणार होतो. पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्याची परवानगी मागितली, ती आम्ही त्यांना दिली."
 
"नारायण दाभाडकर यांना घरी नेल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्याची गरज होती. आमच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सोय नाही. दाभाडकर कुटुंबीयांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर सपोर्ट द्यायला हवा होता. पण नारायण दाभाडकर आता आपल्यात नाही, याबद्दल आम्हाला खेद आहे," असं हरदास यांनी सांगितलं.
 
नारायण दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान या घटनेबद्दल सांगतात, "आमच्या संपूर्ण कुटुंबाला 16 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. आमच्या संपर्कात आल्याने आम्ही बाबांचीही कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल 19 एप्रिल रोजी आला. आम्हीच घरीच त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरू ठेवले. 22 एप्रिल रोजी बाबांची ऑक्सिजन लेव्हल अचानक खाली गेल्याने आम्ही घाबरलो. बाबांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला नागपूर महानगर पालिकेच्या गांधीनगरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला."
 
"बाबांची तब्येत नाजूक असतानाही काही तासांतच त्यांना परत घरी आणण्यात आले. तेव्हा बाबांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये एक महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी आकांत करताना त्यांनी पाहिलं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की, मी माझं आयुष्य मी जगून पूर्ण केलं आहे. हा तरुण जगला पाहिजे. याकरिता माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या. अत्यवस्थ अवस्थेत बाबा घरी आणखी काही तासच राहिले, माझ्या हातचे एक दोन घासच मी त्यांना भरवू शकले. त्यांचे हात पाय सुन्न झाले होते, नखे काळसर होत होते. अशातच त्यांनी घरी प्राण सोडले," असं आसावरी कोठीवान सांगतात.
 
नारायण दाभाडकर यांचा फोटो आणि ही घटना सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यांच्या या कृत्याबद्दल आदर व्यक्त केलाय, तर अनेकांनी हे कौतुक अनाठायी असल्याची टीका केली आहे.
 
इंदिरा गांधी रुग्णालय नागपूर महापालिकेच्या अखत्यारीत येतं. नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी याबद्दल बीबीसी मराठीकडे मत व्यक्त केलं.
 
ते म्हणतात," 22 एप्रिल 2021 रोजी मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नारायण दाभाडकर यांना कोव्हिडने ग्रासल्यामुळे दाखल करण्यात आलं. काही तास त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेऊन उपचार करण्याची विनंती केली. आरोग्य यंत्रणेमध्ये DAMA ( Discharge Against Medical Advice) म्हणजेच वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयातून सुट्टी देण्यात येऊ शकते ही सोय आहे. याचनुसार नारायण दाभाडकर यांना आम्ही रुग्णालयातून सुट्टी दिली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात संबधित नोंदी बघता हेच पुढे येतं."
 
पेशंट असा बेड दुसऱ्याला देऊ शकतो का?
सध्या कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना बेड उपलब्ध नाही. अशातच दाभाडकर यांनी आपला बेड देऊ केला असा त्यांच्या कुटुबियांचा दावा आहे. या मुद्द्याची आम्ही शहानिशा केली.
 
नागपूर महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार, "एखाद्या रुग्णाने रुग्णालयातील बेड रिकामा केल्यावर तो दुसऱ्या कुणाला द्यायचा याचा निर्णय पेशंट घेऊ शकत नाही. रुग्णाची स्थिती आणि वेटिंगवर असलेल्या रुग्णांच्या क्रमानुसारच त्यांना बेड दिला जातो. शिवाय सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या काळात हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणे अवघड झालंय कारण उपलब्ध क्षमतेच्या कितीतरी जास्त पेंशंट्स सध्या शहरात येताहेत."
 
'त्या' तरुण रुग्णाला बेड मिळाला का?
दाभाडकर यांनी ज्या चाळीशीतल्या रुग्णासाठी रुग्णालयातून मला घरी घेऊन जा असं सांगितल्याचा दावा त्यांच्या मुलीने केला आहे. त्या रुग्णाची ओळख पटू शकली नाही.
 
मात्र, नागपूर महानगर पालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या माहितीनुसार, "दाभाडकर यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. पण महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात या वेळेस व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हतं. दाभाडकर हे रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात होते, त्यांना लवकरच कोव्हिड वॉर्डात हलविले जाणार होते. पण आकस्मिक विभागात पाच पेशंट कोव्हिड वॉर्डात वाट पाहत होते. पण आकस्मिक वार्डातूनही एखादा रुग्ण विनाउपचार रुग्णालयातून घरी जाणे आमच्यासाठी अयोग्य असतं."
 
मात्र, ज्या तरुणासाठी बेडचा त्याग केला, त्याला शेवटपर्यंत तो बेड मिळाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
नारायण दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि नागपूरच्या पावनभूमी भागातील श्रीराम शाखेशी संबंधित होते.