शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (19:12 IST)

डायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक का?

-मयंक भागवत
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते को-मॉर्बिडिटी. सामान्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, को-मॉर्बिडिटी म्हणजे ज्या व्यक्तीला मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यासारखे आजार आहेत.
 
या आजारांनी ग्रस्त रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील सारखेच्या प्रमाणावर नसलेल्या नियंत्रणामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते.
 
भारतात कोरोना व्हायरसमुळे 8 हजारपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रात 3391 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण याची वर्गवारी जास्त धक्कादायक आहे.
 
राज्य सरकारच्या माहितीनुसार,
 
राज्यात 11 जूनपर्यंत 3391 कोरोनाबाधितांचे मृत्यू
 
ज्यातील 2360 रुग्ण को-मॉर्बिड म्हणजे जुने आजार असलेले व्यक्ती
 
70 टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू को-मॉर्बिडिटीमुळे
 
(स्रोत- वैद्यकीय शिक्षण विभाग रिपोर्ट)
 
राज्य सरकारच्या माहितीनुसार, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाने सर्वात जास्त कोरोनाबाधितांचे मृत्यू नोंदवण्यात आले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक आहे.
 
मात्र, सर्वच मधुमेहींना कोरोनाचा धोका जास्त का आहे? मधुमेह असलेल्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्यामागे कारणं काय? मधुमेह असलेल्यांना कोरोनाची लागण झाल्यास काय गुंतागुंत निर्माण होते? याची माहिती घेण्याचा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला.
 
कोरोनाग्रस्त मधुमेहींच्या मृत्यूमागची कारणं
औरंगाबादमधील डॉ. अर्चना सारडा डायबेटोलॉजिस्ट आहेत. डॉ. सारडा गेल्या काही वर्षांपासून टाईप-1 मधुमेहाने ग्रस्त 600 लहान मुलांची काळजी घेत आहेत.
 
डॉ. अर्चना सारडा यांच्या माहितीनुसार,
 
डायबेटिसवर अजिबात नियंत्रण नसणे (Uncontrolled Disbates)
मधुमेहींची कमी असणारी रोगप्रतिकारक शक्ती
शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची कमी झालेली क्षमता
ही कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग झालेल्या डायबेटिसग्रस्त रुग्णांच्या मृत्यूमागची प्रमुख कारणं आहेत.
 
डायबेटिस असलेल्या व्यक्तीला जर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होतो का? याबाबत डॉ. सारडा सांगतात, "लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. डायबेटिस असलेल्या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होतो असं नाही. रुग्णाचा डायबेटिस योग्य पद्धतीने कंट्रोलमध्ये असला तर रुग्ण बरे होतात. माझ्याकडे उपचार घेत असलेले तीन डायबेटिसग्रस्त रुग्ण, ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती, ते बरे होऊन घरी गेले."
 
डॉ. सारडा यांच्या माहितीनुसार, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये इंन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात पसरतं. व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते. डायबेटिस खूप जास्त असला तर अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करावी लागते. पण, मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. डायबेटिस नियंत्रणात नसेल तर धोका जास्त असतो.
 
मधुमेहींनी काय काळजी घ्यावी?
इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार,
 
मधुमेहींनी आपलं अन्न दुसऱ्यांसोबत शेअर करू नये
हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला हात लावू नये. आपल्या आजूबाजूच्या परिसराचं सतत निर्जंतुकीकरण करावं
खोकला, कफ असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा
शरीरातील सारखेच्या प्रमाणावर लक्ष ठेवा.
पौष्टीक अन्नाचं सेवन करा
 
औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमधील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉ. जगन्नाथ दीक्षित राज्य सरकारच्या फाईट ओबेसिटी कॅम्पेन'चे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत.
 
बीबीसीशी बोलताना डॉ. दीक्षित यांनी म्हटलं, "मधुमेहींनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो. त्याचसोबत पौष्टीक अन्नाचं सेवन आणि व्यायाम केला पाहिजे. जेणेकरून, शरीरातील साखरेच्या प्रमाणावर योग्य नियंत्रण राहील."
 
शरीरातील साखर नियंत्रणात ठेवा
मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींना शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. 'असोसिएशन ऑफ फिजीशिअन्स ऑफ इंडिया'ने केलेल्या सर्व्हेक्षणात, भारतातील 90 टक्के मधुमेहींच्या शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसल्याचं समोर आलंय, तर 92 टक्के मुंबईकरांचा डायबेटिस कंट्रोलमध्ये नाहीये.
 
मुंबईतील डायबेटोलॉजिस्ट डॉ. नितीन पाटणकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे व्हायरसचा गुणाकार मोठ्या संख्येने होतो. कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्याने ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जातो."
 
बीबीसीशी बोलताना डॉ. पाटणकर डायबेटिस रुग्णांसाठी शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष अधोरेखित करतात.
 
डॉ. पाटणकरांनी सांगितलं, "डायबेटिसग्रस्त रुग्णांच्या शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसलं तर त्यांना सर्वात जास्त धोका आहे. मात्र, रुग्णाचा डायबेटिस कंट्रोलमध्ये असला तर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच कोरोनाचं इन्फेक्शन झालं, तरी रुग्ण बरा होतो. त्यामुळे मधुमेहींनी त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवलं पाहिजे."
 
शुगर अचानक कमी करू नका
डॉ. पाटणकर म्हणतात, "आजाराच्या भीतीने गेल्या 2-3 महिन्यात अचानक शुगर कंट्रोल करून चालणार नाही. या रुग्णांनाही जास्त त्रास होण्याची शक्यता असते. डायबेटिस नियंत्रणात आला, आता आपल्याला आजाराचा धोका नाही, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली असं समजून चालणार नाही. शरीरातील साखरेच्या प्रमाणावर वर्षोनुवर्ष नियंत्रण ठेवलं पाहिजे. यासाठी पौष्टीक अन्न, व्यायाम आणि योग्य वेळी औषधं घेण्यावर भर दिला पाहिजे."
 
तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड-19 व्हायरस श्वसन नलिकेत शिरल्यानंतर Angiotensin Receptors ला बाइंड होतो. ज्यामुळे व्हायरसला वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे फुफ्फुसांना इजा होते.
 
अमेरिकन डायबेटीस असोसिएशनच्या माहितीनुसार, चीनमध्ये मधुमेह असलेल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या सामान्य रुग्णांपेक्षा जास्त होती. मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह नियंत्रणात असला तर, कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी असते. ज्या रुग्णांना मधुमेहामुळे इतर आरोग्याशी संबंधित त्रास असतात त्यांना कोरोना झाल्यास धोका जास्त असतो.
 
भारतात मधुमेहींची संख्या
इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या माहितीनुसार, भारतात 2019 साली 7.29 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त होते.
 
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतात 5.8 टक्के महिला आणि 8 टक्के पुरुष मधुमेहाने ग्रस्त होते. तर, द लॅन्सेटच्या माहितीनुसार, 2030 पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या 98 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशातील मधुमेहींच्या संख्येतील 8 ते 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
 
बीबीसीशी बोलताना, नागपुरचे डायबेटोलॉजिस्ट, डॉ. शैलेश पितळे म्हणतात, "डायबेटिसग्रस्त रुग्णांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आतील भागात जखम झालेली असते. जर अशा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तर रक्तवाहिन्यांना जखम होण्याची (ज्याला वैद्यकीय भाषेत Inflamation असं म्हणतात) शक्यता जास्त वाढते. शरीराच्या ज्या भागातील अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. त्या अवयवाला हानी होण्याचा धोका जास्त वाढतो."
 
"मधुमेह असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता सामान्य रुग्णांपेक्षा जास्त असते. कारण, डायबेटिसमुळे इतर अवयवांची क्षमता कमी झालेली असते," असं डॉ. पितळे म्हणतात.