शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (18:55 IST)

कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर पुढे काय करायचं?

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे ही कोरोनाची लक्षणं आहेत. पूर्वी ही लक्षणांची यादी फक्त फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच होती.
 
WHO ने त्यांच्या वेबसाईटवर कोरोना व्हायरसमुळे जाणवणाऱ्या 13 लक्षणांची यादी दिली आहे. यातली सर्वसामान्य लक्षणं आपण याआधी वर पाहिली आहेत. पण, आता जगभरातल्या काही रुग्णांमध्ये पुढे दिसून आलेली लक्षणं ही नविन आहेत. कंजंक्टीवायटीस (डोळे येणे), त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे, हातापायांच्या बोटांवर, तळव्यांवर चट्टे उठणे, अतिसार किंवा हगवण लागणे, अंगदुखी, गंभीर लक्षणं, छाती दुखणे, छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे, वाचा जाणे, शरीराची हालचाल थांबणे ही लक्षणं कोरोनाबाधितांमध्ये दिसून येतात.
 
ही लक्षणं दिसल्यावर काय कराल?
वरील लक्षणं आपल्यात दिसून आल्यांतर आणि कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. असं झाल्यानंतर लगेच आपल्याला काहीतरी होईल या भीतीने घाबरून जाणं टाळायला हवं. तुम्हाला दिसत असलेल्या वरच्या कोणत्याही लक्षणाची गंभीरता आधी पाहा. जर, अगदीच असह्य होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. पण, फार गंभीर लक्षणं नसतील तर विचार करून न घाबरता कुटुंबीयांच्या सल्ल्याने पुढची पावलं टाका.
 
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर पुढील 10 मुद्यांच्या आधारे तुम्ही योग्य ती पावलं टाकू शकता...
 
1) रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आपण देशातल्या सगळ्या लोकांसाठी असलेल्या कोव्हिड-19 हेल्पलाईनला प्रथम संपर्क करा. या राष्ट्रीय हेल्पलाईनचा नंबर आहे +91-11-23978046 (मोबाईलवरून लावताना 011 डायल करावा). या हेल्पलाईनवर कॉल केल्यावर आपण आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती द्यावी. ते आपली माहिती लिहून घेतात आणि आपल्याला आपण देशातल्या ज्या जिल्ह्यांत, तालुक्यात राहतो तिथल्या जिल्हा आरोग्य कार्यालयाशी जोडून देतात. जोडून देताना फोन लागला नाही, तर तिथला नंबर आपल्याला देतात. तसंच, जर तुमची परिस्थिती गंभीर असेल तर ते आपण असलेल्या जिल्ह्याच्या कोव्हिड अतिदक्षता केंद्राला जोडून देतात. या जोडून दिलेल्या नंबरवर आपण आपली माहिती दिली की आपल्याला कुठे आणि कसे उपचार मिळतील किंवा कुठे अॅडमीट व्हावं लागेल याची माहिती लगेच दिली जाते. तसेच त्या आरोग्य केंद्राकडेही आपली नोंद होते आणि त्यांच्याकडूनही आपल्याला फोन येऊ शकतो. बीबीसी मराठीने स्वतः या नंबरवर फोन करून ही माहिती मिळवलेली आहे.
 
2) वरचा हेल्पलाईन नंबर हा राष्ट्रीय असून आपण राज्यासाठीच्या असलेल्या या हेल्पलाईन नंबरवर 020-26127394 कॉल करू शकता. दोन्ही पैकी कोणत्याही एका नंबरवर फोन केला तरी आपल्याला मदत मिळेल. आम्ही राज्याच्या हेल्पलाईनवर वारंवार फोन केला, मात्र तो व्यस्त लागला. पण, हा नंबर चुकीचा नसून तो योग्य आहे हे नक्की.
 
3) केंद्र सरकारने एक व्हॉट्सअप चॅटबॉटही तयार केला असून तो आपल्याला आपल्या प्रश्नांची थेट उत्तरं देतो. हा व्हॉट्सअप चॅटबॉट MyGov Corona Helpdesk आहे. +91 90131 51515 या नंबरवर आपण टेक्स्ट मेसेज पाठवून त्यावरचं उत्तर मिळवू शकता.
 
4) सध्या संपूर्ण राज्यात मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिकेची ही लिंक http://stopcoronavirus.mcgm.gov.in/ माहित असणं आवश्यक आहे. मुंबईकर रुग्णांना या लिंकवरूनही मुंबईत कुठे बेड उपलब्ध आहेत. तसेच, मुंबईत कुठल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात याची यादी मिळेल. यासाठी तुम्ही मुंबईच्या कोणत्या वॉर्डमध्ये राहता हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. कारण, या वेबसाईटवर वॉर्डनिहाय याद्या दिलेल्या आहेत. तसेच, मुंबईत कुठे-कुठे फिव्हर क्लिनिक आहेत याची माहितीही इथे दिलेली आहे.
 
5) जर आपण मुंबईबाहेर राज्यात इतर ठिकाणी राहत असाल तर वर दिलेल्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय हेल्पलाईनवर कॉल करू शकता. तिथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात / तालुक्यात कुठे उपचार घ्यायचे याची माहिती मिळेल.तसंच, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या या लिंकवर आपल्याला योग्य ती माहिती मिळेल.
 
6) आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अशावेळी असायला हरकत नाही. हे अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती नसली तरी केंद्र सरकारने हे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करावे अशी विनंती केली आहे. या अॅपमध्ये आपण सेल्फ असेसवर किंवा आपण कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याच्या ऑप्शनवर क्लिक करावे. इथे आपण कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याची माहिती द्यावी. जेणेकरून सरकारला आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळेल.
 
7) कोरोना बाधित झालेला आहात आणि दुर्दैवाने आपल्याकडचे सरकारी आरोग्य केंद्र पूर्णपणे भरलेले असेल तरीही घाबरून जाऊ नका. आपल्याला त्या सरकारी केंद्रातूनच कोणत्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार मिळतात याची माहिती मिळू शकेल. तशी माहिती त्या आरोग्य केंद्राने देणं हे त्यांना बंधनकारक आहे. त्यामाहितीच्या आधारे आपण खासगी हॉस्पिटलमध्येही भरती होऊ शकता.
 
8) त्याचबरोबर केंद्र सरकारच्या https://www.mygov.in/covid-19 या पोर्टलवर जाऊन लाईव्ह हेल्प डेस्कवरून जाऊन आपण कुठून उपचार मिळवायचे याची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
 
9) तसंच आपण देशातल्या कंटेनमेंट झोनमध्ये राहत असाल आणि आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असेल तर आपण त्या कंटेनमेंट झोनमधून यापूर्वी उपचार मिळवलेल्या रुग्णांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून उपचाराचा योग्य मार्ग जाणून घेऊ शकता. तसेच, कंटेनमेंट झोन असला तर त्या विभागात पोलिसांची सततची उपस्थिती असते किंवा त्यांची गस्त सुरू असते. आपण, त्या पोलिसांना कळवूनही पुढील उपचारांची माहिती घेऊ शकता.
 
10) कोरोना बाधित म्हणून न्यूनगंड बाळगून किंवा घाबरून जाण्यापेक्षा वर उल्लेखिलेल्या उपायांचा वापर केलात तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि आपण लवकर उपचार घेऊ शकाल.