शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (10:58 IST)

देवाच्या प्रसादातून सायनाईड; दीड वर्षात 10 खून - सीरियल किलरचा थरार

आंध्र प्रदेशातल्या तीन जिल्ह्यांमध्ये 20 महिन्यांच्या कालावधीमध्ये 10 खून करणाऱ्या एका सीरियल किलरच्या विरोधात आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिम्हाद्री ऊर्फ सिवा असं या माणसाचं नाव आहे.
 
खून करण्यात आलेल्या या 10 जणांपैकी 3 महिला आहेत. या माणसाने त्याला कर्ज देणाऱ्या व्यक्तींचे खून केले आहेत. यामध्ये त्याचे नातेवाईक, घरमालक, मित्र आणि इतरांचा समावेश आहे.
 
यापैकी फक्त चारच मृत्यूंची नोंद संशयास्पद मृत्यू म्हणून करण्यात आली तर इतर मृत्यू नैसर्गिक असल्याचं मानण्यात आलं.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने खून झालेल्या सगळ्यांना प्रसादात सायनाईड मिसळून दिलं होतं. यामुळे खुनाचा कोणताही पुरावा पोलिसांसाठी वा कुटुंबासाठी मागे राहिला नाही. त्यानंतर सिवा या लोकांजवळच्या वस्तू चोरत असे.
 
ऑक्टोबर 2019 मध्ये काटी नागराजू या शारीरिक शिक्षकाच्या मृत्यूची नोंद एलुरू पोलीस स्टेशनमध्ये संशयास्पद मृत्यू म्हणून करण्यात आली, आणि हे प्रकरण उघडकीला आलं.
 
सिम्हाद्री ऊर्फ सिवाने वेगवेगळे कामधंदे करत आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आल्याने लोकांचा खून करून त्यांचा पैसा मिळवण्याचा मार्ग त्याने पत्करल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
प्रकरण उघडकीला कसं आलं?
खून झालेल्या नागराजू यांचा भाऊ श्रीनिवास राव यांनी त्यांना भावाच्या मृत्यूचा संशय येण्यामागची कारणं सांगितली. ते गुन्हे शाखेमध्ये इन्स्पेक्टर आहेत.
 
आपण बँकेमध्ये 1,90,400 रुपयांची रक्कम जमा करायला जात असल्याचं नागराजू यांनी 16 ऑक्टोबर 2019ला सांगितलं होतं. 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही त्यांनी सोबत घेतले होते. पण नागराजू घरी परतलेच नाहीत.
 
'राईस पुलिंग कॉईन' ( तांदळाचे दाणे आकर्षित करू शकणारं दुर्मिळ धातूंचं नाणं) चं आमिष दाखवून सिम्हद्री यांनी काटी नागराजू यांना पैसे आणायला सांगितले. नागराजू सिम्हाद्रीना भेटले तेव्हा आपण देवाची पूजा केल्याचं सांगत सिम्हाद्रीने त्यांना सायनाईड घातलेला प्रसाद खायला दिला.
 
"या प्रसादाचं सेवन केल्यानंतर माझ्या भावाने काही अंतर कापलं आणि नंतर हृदयक्रिया बंद झाल्याने एलुरूच्या बस स्टँड जवळच्या रस्त्याच्या कडेला तो कोसळला. आसपासच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं."
 
पेशाने शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक असलेल्या नागराजू यांची तब्येत चांगली होती.
 
पण ते बँकेत जाणं अपेक्षित असताना ते दूरवरच्या जागी कोसळल्याने शंका उपस्थित झाल्या.
 
नागराजू यांच्या शरीराचा रंग बदललेला होता आणि ते घेऊन गेलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने संशय वाढला. आणि म्हणूनच कुटुंबाने या मृत्यूविषयी तक्रार दाखल केल्याचं श्रीनिवास राव सांगतात.
 
पहिल्यांदाच तक्रार दाखल झाल्यानंतर तपास योग्य रीतीने करण्यात आला असता तर इतर खून टाळता आले असते, असं त्यांचं मत आहे.
 
यापूर्वी सिम्हाद्री यांनी केलेल्या तीन खुनांची नोंद संशयास्पद मृत्यू म्हणून करण्यात येऊनही पोलिसांना संशयिताचा माग काढता आला नाही, असं श्रीनिवास सांगतात.
 
एलुरू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि या साखळी खुनांमागच्या माणसाला शोधून काढलं.
 
पण या सगळ्यात आपण भाऊ गमावल्याचं श्रीनिवास साश्रुनयनांनी सांगतात.
 
तपास कसा झाला?
पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवदीप सिंग ग्रेवाल यांनी बीबीसी न्यूज तेलुगूला याविषयी माहिती दिली.
 
नागराजूंच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास केल्याचं ते सांगतात.
 
नागराजूंच्या मोबाईलचा कॉल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला.
 
एका सोसायटीच्या वॉचमनचं काम करणाऱ्या सिम्हाद्री यांना नागराजूंनी अनेक फोन केल्याचं आणि शेवटाचा कॉलही याच व्यक्तीला करण्यात आल्याचं पोलिसांना आढळलं.
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिम्हाद्री यांना चौकशीसाठी बोलावलं आणि त्यांनी गेल्या 20 महिन्यांत आणखी 9 जणांचा खून केल्याचं उघडकीला आलं.
 
ज्यांना मारायचं आहे त्यांना प्रसादामध्ये सायनाईड मिसळून सिम्हाद्री हा प्रसाद लोकांना सेवन करायला देत असे.
 
खून झालेल्यांपैकी अनेकांच्या कुटुंबियांना आपल्या माणसाचा मृत्यू हा हृदयक्रिया बंद पडल्याने झाल्याचं वाटल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती.
 
यामुळेच सिम्हाद्री यांना आणखी खून करण्याची संधी मिळाली.
 
लोकांना भेटून त्यांची कमजोरी जाणून घेऊन त्यानुसार त्यांना अडकवण्याची त्यांची हातोटी होती.
 
पण काहीजण या जाळ्यातून निसटल्याचं पोलीस सांगतात.
 
आपण 'राईस पुलिंग कॉईन' मिळवून देऊ शकतो, असं आमिष सिम्हाद्री लोकांना देत असे. हे दुर्मिळ नाणं विकत घेण्यासाठी ते लोकांना पैसे जमा करायला सांगत आणि नंतर त्यांना निर्जन ठिकाणी घेऊन जाई.
 
प्रसादाचं निमित्त करत त्यांना सायनाईड देऊन ठार करत आणि मग त्यांच्या जवळचे पैसे आणि दागिने लुटत, असं पोलिसांनी सांगितलं.
 
कोण आहे सिम्हाद्री
 
एलुरूमधल्या एका सोसायटीचा वॉचमन म्हणून सिम्हाद्री काम करत असे.
 
लोकांची कमजोरी ओळखून त्यांन लक्ष्य करत असे आणि त्यांना दुर्मिळ नाणं मिळवून देण्याचं, पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत असे.
 
असं करण्यासाठी आपल्याला काही पूजा करण्याची गरज असल्याचं तो त्यांना पटवून देई आणि मग सायनाईड घातलेला प्रसाद खायला देई. ज्यामुळे शेवटी या लोकांचा मृत्यू होई.
 
मेलेल्या व्यक्तीचे पैसे आणि दागिने चोरून तो तिथून चुपचाप निघून जाईल.
 
चोरलेल्या या पैशांनी त्यांनी एलुरूमध्ये घर बांधल्याचं पोलीस सांगतात.
 
कोण बळी पडलं?
15 फेब्रुवारी 2018ला आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातल्या वल्लभनेनी उमा महेश्वर राव यांचा खून झाला. हा पहिला खून होता.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दुर्मिळ नाण्याचं आमिष दाखवून शेतात नेण्यात आलं आणि मग सायनाईड देण्यात आलं. या दुर्मिळ नाण्यासाठी त्यांना पैसे आणायला सांगण्यात आले होते.
 
राव यांच्याकडून सिम्हाद्री यांनी चार लाख रुपये आणि चांदीची अंगठी चोरली. हा सगळा कार्डिअॅक अरेस्टचा प्रकार असल्याचं भासवण्यात आलं.
 
त्यानंतर 2 मार्च 2018ला सिम्हाद्री यांनी पुलुपू तवितय्या यांचा खून केला. पैसे दुप्पट करतो असं सांगत त्यांच्याकडून 8 लाख रुपये घेण्यात आले. त्यांचा खून करून त्यांच्या गोष्टी चोरण्यात आल्या.
 
मग वीसच दिवसांच्या कालावधीत सिम्हाद्री यांनी विजयवाड्यातल्या गंदीकोटा वेंकटा भास्कर नावाच्या आणखी एका व्यक्तीचा अशाच प्रकारे खून केला. पैसे दुप्पट करण्याचं सांगत त्यांच्याकडून 1.7 लाख रुपये घेण्यात आले.
 
हे तीनही मृत्यू नैसर्गिक भासवण्यात आल्याने त्यांच्याबद्दल पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नाही.
 
कृष्णा जिल्ह्यातल्या मुस्ताबादमधल्या कडियम बाला वेंकटेश्वरा यांनी सिम्हाद्रीकडून आपल्या 2.9लाख रुपयांच्या परतफेडीची मागणी केली तेव्हा सिम्हाद्री यांनी त्यांनाही सायनाईड देत त्यांचाही काटा काढला. पोलिसांनी या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू म्हणून केली.
 
14 एप्रिल 2018ला पाचवा खून झाला.
 
एलुरू जिल्ह्यातील वंगायागुडेममधल्या फायनान्स कंपनीमध्ये कारकुनाचं काम करणारे चोदावारापू सूर्यनारायण हे सिम्हाद्री यांच्या आमिषाला भुलले आणि पैस दुप्पट करण्यासाठी त्यांनी 5 लाख दिले.
 
इतरांप्रमाणेच त्यांचाही अंत झाला. पोलिसांनी याही मृत्यूची नोंद संशयास्पद म्हणून केली.
 
28 एप्रिलला पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रामकृष्णानंद यांचा आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने खून करण्यात आला.
 
पण या मृत्यूसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
 
सिम्हाद्रीच्या नात्यात असणाऱ्या कोटापल्ली राघवम्मा नावाच्या महिलेचाही असाच अंत झाला. त्यांना मधुमेह नियंत्रणाखाली आणणारं औषध देण्याचं निमित्त करत सायनाईड देण्यात आलं.
 
सिम्हाद्रीने त्यांच्या शरीरावरचं 24 ग्रॅम सोनं चोरल्याचं पोलीस सांगतात. पण या मृत्यूचीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
 
समंताकुर्ती नागमणी नावाच्या आणखी एका नातेवाईकाचा 12 जानेवारी 2019 ला खून झाला. त्याच्याकडून 5 लाखांची रक्कम, 20 ग्रॅम सोनं लुटण्यात आलं. या मृत्यूची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद झाली.
 
2019च्या ऑगस्टमध्ये सिम्हाद्री यांनी त्यांची घरमालक असणाऱ्या रामुलम्मा यांचा खून केला.
 
या महिलेकडून त्यांनी 1 लाखांची रक्कम आणि 40 ग्रॅम सोनं चोरलं.
 
सिम्हाद्रीने आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
 
सायनाईड कुठून मिळालं?
शेख अमीनुल्ला बाबू या विजयवाड्यातल्या एका माणसाकडून सिम्हाद्री यांनी सायनाईड मिळवलं.
 
या व्यक्तीने चेन्नईमधल्या एका परवाधारक विक्रेत्याकडून सायनाईड घेतल्याचं एलुरू पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अनासुरी श्रीनिवास राव यांनी बीबीसीला सांगितलं.
 
अमीनुल्ला यांचा भाऊ अनेकदा आपल्या इलेक्ट्रो निकेल प्लेट वर्कशॉपसाठी हे सायनाईड घ्यायचा आणि अमीनुल्ला त्यांच्यासोबत असे.
 
या माणसाशी ओळख काढत सिम्हाद्रीने त्यांच्याकडून सायनाईड मिळवलं.
 
या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
राईस पुलिंग कॉईन काय आहे?
राईस पुलिंग कॉईन म्हणजे तांबं आणि इतर दुर्मिळ धातूंपासून बनवण्यात आलेलं असं एक नाणं ज्यामध्ये तांदळाचे दाणे आकर्षित करून घेण्याची शक्ती असते. या चुंबकीय शक्तीमुळे हे नाणं मौल्यवान ठवतं, असं सांगितलं जातं.
 
पण या नाण्यामध्ये संपत्ती आकर्षित करण्याची शक्ती असल्याचा अपप्रचार केला जात असल्याने त्याची किंमत 100 कोटींपर्यंत जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.