शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

IPL 2019 : 'ऋषभ पंतमुळे दिल्ली विजयी, तो वर्ल्डकपमध्ये नसणं ही भारताची चूक'

जयूपरमध्ये सोमवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने यजमान राजस्थान रॉयल्सला 6 विकेटनी हरवलं. या पराभवाने राजस्थान रॉयल्सचे सुपर फोरमध्ये पोहोचण्याचे जवळपास सर्व मार्ग आता बंद झाले आहेत.
 
दिल्लीच्या समोर विजयासाठी 193 धावांचं मोठं लक्ष्य होतं. सलामीचे बॅटसमन शिखर धवन (54), पृथ्वी शॉ (42) यांनी भक्कम पाया रचल्यानंतर ऋषभ पंतने 78 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला हा सामना 19.2 ओव्हरमध्ये फक्त चार विकेट गमावत जिंकता आला.
 
पंतने 36 बॉलमध्ये 78 धावा केल्या. त्याने 6 षटकार आणि 4 चौकार लगावले. यजमान राजस्थानकडून अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली. पण ती व्यर्थ ठरली. राजस्थान रॉयल्सच्या वतीने रहाणेने 105 तर स्टीव्ह स्मिथने 50 धावा केल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 191 धावा केल्या. घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभी करूनही जर एखादा संघ पराभूत होत असेल तर जिंकणाऱ्या संघाकडे नक्कीच काहीतरी विशेष असलं पाहिजे. दिल्ली कॅपिटल्सची सलामीची जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉने 7.3 ओव्हरमध्ये 72 धावांची भागीदारी केली. शिखर धवनने 27 बॉलमध्ये आठ चौकार आणि दोन षटकार लगावत 54 धावा केल्या. पृथ्वी शॉने बऱ्याच दिवसांनंतर चांगली खेळी करत 39 धावा केल्या.
 
पंतची कमाल
कालचा दिवस ऋषभ पंतचा होता. मॅच संपल्यानंतर तो म्हणाला, "मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. विजयी खेळी करू शकलो याचं समाधान आहे." गेले काही दिवस चांगली खेळी करण्यात अपयश येत असतानाही संघाने पाठबळ दिल्याबद्दल त्याने आभार मानले. दिल्लीने एकूण 11 सामने खेळले असून त्यात 7 विजयांसह 14 गुण मिळवले आहेत. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा बॅटिंग कोच रिकी पॉटिंगनेही पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतला वर्ल्डकप संघात न घेऊन भारताने फार मोठी चूक केली आहे, असं रिकी पॉटिंग म्हणाला. इंग्लंडमध्ये पंत उपयुक्त ठरू शकतो, असं मत पॉटिंगने पूर्वीही व्यक्त केलं आहे.
 
रहाणे आणि स्मिथ यांची खेळी
थोडी चर्चा रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याबद्दलही करू. राजस्थान रॉयल्सने सततच्या पराभवानंतर कर्णधारपद अजिंक्यकडून काढून घेत स्टीव्ह स्मिथकडे दिलं. गेल्या सामन्यात स्मिथच्या नेतृत्वात राजस्थाने कोलकता नाईट रायडर्सला 9 विकेटनी हरवलं. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या रहाणेने या मॅचमध्ये शतक झळकावलं. पण सोमवारचा पराभव हा राजस्थानचा 7 पराभव असून हा संघ आता 7व्या क्रमांकावर गेला आहे. तर या IPLमध्ये पंतचे हे दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात त्याने 46 आणि पंजाबच्या विरोधात 39 धावा केल्या. सोमवारी मात्र त्याने अशी खेळी केली ज्याच्या शोधात दिल्ली कॅपिटल्स अनेक दिवस होती. तर शिखर धवननेही स्वतःचं अपयश धुतलं आहे. 
 
आता याला काय म्हणायचं? राजस्थानने कर्णधार बदलला पण नशीब बदलता आलं नाही. तर दिल्लीने नाव बदललं आणि भाग्यही. आता दिल्ली विरोधकांसाठी जुनी दिल्ली डेअरडेव्हिल्स ठरू लागली आहे.