रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (15:07 IST)

डेंग्यूः चमत्कार, एका बॅक्टेरियामुळे डेंग्यू नष्ट होणार?

- जेम्स गॅलाघर
डेंग्यूमुळे जगातील सर्वच देश त्रस्त आहेत. भारतातही विशेषतः महाराष्ट्रातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात.
 
पण डेंग्यूमुळे त्रस्त असणाऱ्या देशांसाठी आता एक चांगली बातमी आहे, एका प्रयोगाच्या चाचणीला यश आलं असून त्याप्रयोगात वापरलेल्या डासांमुळे डेंग्यूच्या प्रसारात घट झाल्याचं दिसलं आहे. म्हणजे या डासांची डेंग्यू पसरवण्याची शक्ती कमी करण्यात यश आलं आहे. एरव्ही या डासांनी जितका डेंग्यू पसरवला असता त्यापेक्षा कमी ते पसरवू शकले आहेत.
 
इंडोनेशियातल्या योग्यकार्ता इथं हा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे डेंग्यूचा विषाणू समूळ नष्ट करण्याच्या दिशेने आशादायक पावलं पडत असल्याचं दिसत आहे. जगभरातील डेंग्यूवर हा उपाय चालू शकेल असं वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रामच्या सदस्यांनी सांगितलं आहे.
 
50 वर्षांपूर्वी डेंग्यूचं नावही लोकांनी फारसं ऐकलं नव्हतं. परंतु त्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली.
 
1970 साली 9 देशांमध्य़े डेंग्यूची मोठी साथ पसरलेली होती ता मात्र जगभरात दरवर्षी 40 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असल्याचं दिसतं.
 
डेंग्यूला 'ब्रेकबोन फिवर' असं म्हटलं जातं. या आजारात स्नायू दुखतात आणि हाडांमध्येही तीव्र वेदना जाणवतात.
 
ही चाचणी वोल्बाचिया नावाचे बॅक्टेरिया सोडलेल्या डासांच्या मदतीने करण्यात आली. हा एक निसर्गाचा चमत्कार असल्याचं डॉ. केटी अँडर्स हे संशोधक सांगतात.
 
वोल्बाचिया बॅक्टेरियामुळे हे डासांना इजा होत नाही पण त्यांच्या ज्या अवयवांमध्ये डेंग्यूचे विषाणू पोहोचलेले असतात तिथंपर्यंत ते जातात. मग हे बॅक्टेरिया डेंग्यूच्या विषाणूंची रसद तोडतात. त्यामुळे डेंग्यूच्या विषाणूंची संख्याच वाढत नाही. त्यामुळेच असे डास चावले तरी त्यांच्याकडून डेंग्यू होण्याची शक्यता कमी झालेली असते.
 
वोल्बाचिया सोडलेली डासांची 50 लाख अंडी प्रयोगात वापरली होती. ही अंडी शहरामध्ये प्रत्येक दोन आठवड्यांनी बादलीत ठेवण्यात आली. त्यांच्यापासून वोल्बाचियाग्रस्त डासांची प्रजा तयार होण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला.
 
योग्यकार्ताचे 24 विभागांत विभाजन करण्यात आले. त्यातल्या निम्म्याच भागांमध्ये हे डास सोडण्यात आले. या प्रयोगाची निरीक्षणं न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार डेंग्यूच्या रुग्णसंख्येत 77 टक्के घट दिसली तसेच रुग्णालयात दाखल होण्याच्या घटनांमध्ये 86 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसलं. 'हे फारच उत्साहवर्धक आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आमच्या अपेक्षेपेक्षा हे फारच चांगलं आहे', असं डॉ. अँडर्स यांनी बीबीसीला सांगितलं.
 
आता या शहरानंतर आजूबाजूच्या भागातही हा प्रयोग राबवला जाणार आहे. वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रॅमच्या प्रभाव मूल्यमापन विभागाच्या संचालक डॉ. अँडर्स म्हणतात, "हे निश्चितच अभूतपूर्व आहे. मोठ्या शहरात याचा आणखी चांगला प्रभाव दिसून येईल."
 
वोल्बाचिया डासांच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्येही जाऊ शकतात. एकदा का वोल्बाचियाने डासांमध्ये प्रवेश केला की ते दीर्घकाळ त्यांच्यामध्ये राहातील आणि आपलं डेंग्यूपासून रक्षण होत राहिल.
 
या प्रयोगाबाबत बोलताना योग्यकार्ता शहरात रोगप्रतिबंध विभागाच्या अध्यक्षा डॉ. युदिरिया अमेलिया म्हणाल्या, "या प्रयोगामुळे आम्ही आनंदीत झालो आहोत. संपूर्ण योग्यकार्ता आणि नंतर इंडोनेशियातील सर्व शहरांमध्ये ही पद्धती वापरली जाईल अशी आम्हाला आशा आहे."
 
एडिस इजिप्ती हा डास डेंग्यू पसरवतो त्यावर नियंत्रम आणण्यासाठी वोल्बाचियाचा उपयोग होईल. डेंग्यूनिवारण अभ्यासातील हा एक मैलाचा दगड म्हणावा लागेल. डेंग्यू समूळ नष्ट करण्यासाठी वोल्बाचिया पुरेसा ठरू शकतो असं भाकीत डिसिज मॉडेलिंग स्टडिजनेही वर्तवलं आहे. बोस्टन विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ अँड मेडिसिन विभागाचे प्रमुख डेव्हिड हॅमर म्हणतात, "या प्रक्रियेत झिका, पिवळा ताप, चिकनगुनियासारखे आजारही पळवून लावण्याची संभाव्य ताकद आहे."